मुंबई : भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि पाकिस्तानी माजी क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून बिनसल्याची चर्चा सुरु होती. सानियाच्या एका पोस्टमुळे अनेक दिवस त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या येत होत्या. मात्र, या गोष्टीला पुष्टी मिळत नव्हती. आज अखेर शोएबचा त्याच्या दुसर्या पत्नीसोबत लग्नाचा फोटो समोर आल्याने सानियासोबत त्याने घटस्फोट घेतला असल्याचे पक्के झाले आहे.
शोएब मलिक पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत (Sana Javed) लग्नबंधनात अडकला आहे. आज सकाळीच त्याने आपल्या लग्नाचा फोटो शेअर केला. दोन दिवसांपूर्वीच सानिया मिर्झाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये तिने लिहिले होते की, घटस्फोट घेणे खूप कठीण आहे आणि लग्न करणे देखील खूप कठीण आहे. त्यानंतर कदाचित शोएब मलिक आणि सानिया मिर्झाचा घटस्फोट झाला असल्याचे संकेत मिळत होते. गेल्या एक वर्षापासून अशा अफवा सुरू होत्या की, दोघांमध्ये काही ठीक नाही आणि ते वेगळे होऊ शकतात, ज्याला आता पुष्टी मिळाली आहे.
शोएब मलिक आणि सानिया मिर्झाचे लग्न १२ एप्रिल २०१० रोजी झाले होते, तेव्हा भारतात या मुद्द्यावरून बराच वाद झाला होता. या दोघांचे लग्न हैदराबादमध्ये झाले होते आणि त्यांना २०१८ साली एक मुलगाही झाला होता. पण कोरोनानंतर दोघांमध्ये तणाव निर्माण झाला आणि दोघेही वेगळे राहत होते. काही काळापूर्वी सानिया आणि शोएबने एकत्र पाकिस्तानी शो देखील होस्ट केला होता. यानंतर आता शोएबने दुसरे लग्न केले आहे.