Sunday, July 14, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलOxygen : प्राणवायू

Oxygen : प्राणवायू

  • कथा : प्रा. देवबा पाटील

ऑक्सिजनशिवाय सजीव जगूच शकत नाहीत. ऑक्सिजन नसला, तर सजीवांचा प्राण गुदमरू लागतो, जीव कासावीस होतो व अशा वेळी ऑक्सिजनच सजीवांचे प्राण वाचवू शकतो. प्राण वाचवणारा म्हणून त्यास ‘प्राणवायू’ असे म्हणतात.

रोज तास संपत असल्यामुळे देशमुख सर आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकवत असलेले “आपल्या पृथ्वीचे वातावरण” हे प्रकरण अपूर्णच राहत होते. अर्थात सर सर्व वैज्ञानिक बाबी मुलांना सहज समजेल, अशा सोप्या भाषेत सांगत होते. प्रत्येक गोष्ट ते सविस्तरपणे स्पष्ट करून व नीट समजावून सांगत होते. म्हणूनच त्यांना ते प्रकरण पूर्ण करण्यास वेळ लागत होता. त्या दिवशी सर नेहमीसारखे वर्गात आले. सारे विद्यार्थी उत्साहाने सरांकडे लक्ष ठेवून बसले. सरांची हजेरी घेऊन होताबरोबर…

“हे वायू कोठून येतात सर?” योगेंद्राने विचारले.

सर सांगू लागले, “पृथ्वीवर होणाऱ्या ज्वालामुखींतून बाहेर पडणाऱ्या तप्त शिलारसासोबत अमोनिया, कार्बन डायऑक्साईड, वाफ, मिथेन, क्लोरीन व हायड्रोजन हे वायू बाहेर पडतात. हायड्रोजन, मिथेन, अमोनिया, निऑन, अर्गान हे निष्क्रिय वायू असून अतिशय हलके असल्याने ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर निघून जातात व पृथ्वीवर वातावरणात ऑक्सिजन व नायट्रोजनच शिल्लक राहतात.”

“सर हवेला वजन असते का?” वृंदाने प्रश्न केला.

“हो. हवेला वजन असते. हवेमध्ये जे वायू असतात ते सर्व परमाणूंच्या रूपात असतात आणि परमाणूंना वजन असते. म्हणूनच हवेलाही वजन असते.” सरांनी सांगितले.

“सर, ऑक्सिजनला प्राणवायू का म्हणतात?” जितेंद्राने विचारले.

सर म्हणाले, “ऑक्सिजन नसला, तर सजीवांचा प्राण गुदमरू लागतो, जीव कासावीस होतो व अशा वेळी ऑक्सिजनच सजीवांचे प्राण वाचवू शकतो. प्राण वाचवणारा म्हणून त्यास प्राणवायू असे म्हणतात. त्याशिवाय सजीव जगूच शकत नाहीत.”

“निसर्गात हा प्राणवायू कसा तयार होतो सर?” नरेंद्रने प्रश्न केला.

“निसर्गात सूर्यप्रकाशामध्ये कर्बवायू व पाणी या दोघांपासून प्राणवायू तयार होतो. तसेच वनस्पती प्रकाशसंश्लेषण या क्रियेत प्राणवायू बाहेर सोडतात. असा हा प्राणवायू हवेमध्ये एकवीस टक्के असतो.” सर म्हणाले.

“त्याची विशेषत: काय आहे सर?” मंदा बोलली.

“तो रंगहीन, रुचीहीन व वासरहित आहे. तो हवेपेक्षा जड असून पाण्यात विरघळतो. त्याच्यासोबत धातूंना तापविल्यास त्या धातूंची अनेक वेगवेगळी संयुगे बनतात. त्याच्या रासायनिक क्रियांमध्ये उष्णता निर्माण होते व त्या उष्णतेतून प्रकाश निर्माण होतो. तो स्वत: जळत नाही पण पदार्थांच्या ज्वलनास मात्र मदत करतो.” सरांनी स्पष्ट केले.

“मग त्याचे आणखी काय उपयोग असतात सर?” नंदाने माहिती विचारली. “त्याचे खूपच उपयोग आहेत.” सर सांगू लागले, “तो आपल्या रक्ताचे शुद्धीकरण करतो. म्हणूनच सकाळच्या मोकळ्या हवेत बाहेर निसर्गात फिरायला जाणे आरोग्यास हितावह असते, कारण सकाळच्या वातावरणात त्याचे प्रमाण पुरेपूर असते. तसेच तो आपल्या शरीरातील अन्नाचे ज्वलन करण्यास मदत करतो. अन्न आणि प्राणवायू मिळून आपल्या शरीराला शक्ती मिळते. पाण्यात राहणारे मासे किंवा इतर जलचर प्राणी पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन त्यांच्या श्वसनासाठी वापरतात.” सरांनी सांगितले.

“सर, मी दवाखान्यात एका रुग्णाच्या नाका-तोंडाला ऑक्सिजनची नळी लावलेली बघितली होती. ती का लावतात सर?” प्रियंवदाने विचारले.

सर सांगू लागले, “गुदमरलेल्या रोग्यांना कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्याच्या तो कामी येतो. त्यामुळे अशा रुग्णांचा श्वासोच्छवास सुरळीत सुरू राहतो व ते वाचण्याची शक्यता वाढते. असाच समुद्रातील पाणबुड्यांसाठी, विमानातील प्रवाशांना, गिर्यारोहकांनासुद्धा तो खूपच उपयोगी आहे. समुद्रात जसेजसे खोलखोल जावे तसतसे व पृथ्वीवरील पर्वतांच्या उंचीवर जसजसे उंच जावे, तसतसे ऑक्सिजनचे प्रमाण कमी कमी होत जाते. त्यामुळे श्वसनास खूप त्रास होतो. म्हणून पाणबुडे व गिर्यारोहक प्राणवायूचे नळकांडे नेहमी सोबत ठेवत असतात.” एवढ्यात तास संपल्याची घंटी वाजल्यामुळे त्या दिवशीही ते प्रकरण अधुरेच सोडून सरांना वर्गाबाहेर जावे लागले. त्यांचे शिकवणे जीव तोडून ऐकत असलेली सारी मुले-मुली हिरमुसली. पण सरांनाही दुसऱ्या वर्गावर तास घ्यायला जावे लागते, हे माहीत असल्यामुळे ते उद्याची वाट बघत, त्यावेळी त्यांच्या पुढील तासाची तयारी करू लागली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -