रवींद्र तांबे
दीपावली सुट्टीनंतर शाळा तसेच महाविद्यालये नियमित सुरू झाली आहेत. तेव्हा पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना जोमाने अभ्यासाला लागले पाहिजे. विशेषत: बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी दीपावलीच्या सुट्टीत काही उपक्रम राबविले असतील, तर ते बाजूला सारून अभ्यासाकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. त्यात चार दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस व गारपीट पडल्यामुळे वातावरणात बदल झालेला दिसतो. याचा परिणाम आपल्या आरोग्यावर सुद्धा होत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याकडेसुद्धा लक्ष दिले पाहिजे. जर तब्बेत बरी वाटत नसेल तर आपल्या ओळखीच्या डॉक्टरजवळ जाऊन आरोग्याची तपासणी करावी. म्हणजे योग्यवेळी आरोग्याची काळजी घेतलेली बरी. कारण आता वेळ अतिशय महत्त्वाचा आहे.
त्यात पुन्हा नाताळची सुट्टी आणि नवीन वर्षाचे स्वागत, नंतर वार्षिक परीक्षा. तेव्हा परीक्षेला हसत हसत सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी नाताळ सुट्टीत अभ्यासाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. तर नवीन वर्षाचे स्वागत घरगुती करावे. मित्रांबरोबर समुद्रकाठी किंवा सार्वजनिक ठिकाणी जावून शक्यतो करू नये. यात अधिक वेळ जातो. त्याचप्रमाणे बाहेरचे खाल्ल्याने तब्बेत बिघडण्याची शक्यता असते. वार्षिक परीक्षेचे महत्त्व लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी नवीन वर्षाच्या स्वागतापासून दूर राहिले पाहिजे. तसेच बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांप्रमाणे इतर विद्यार्थ्यांनीसुद्धा सुट्टीत वेळ घालवू नये. विद्यार्थ्यांनी आपल्या भवितव्याचे बघावे.
एकदा गेलेली वेळ परत येत नाही. तेव्हा वेळेचा विचार करून विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये. बरेच विद्यार्थी मित्रांबरोबर फिरण्याच्या नादात गप्पागोष्टी करण्यात अधिक वेळ घालविताना दिसतात. तेव्हा अशा सवयींना विद्यार्थीदशेत आळा घातला पाहिजे. मित्रांसोबत गप्पागोष्टी केल्याने मन मोकळे होत असले तरी त्यात जास्त वेळ घालवू नये. असा वेळेचा दुरुपयोग केल्याने अभ्यासाकडे दुर्लक्ष होते. नंतर परीक्षा जवळ आली की मन चलबिचल होते. अभ्यास न झाल्याने आता नेमका कोणत्या विषयाचा अभ्यास करावा, यात विद्यार्थ्यांचा संभ्रम निर्माण होतो. आज या विषयाचा अभ्यास करू की, दुसऱ्या विषयाचा असे प्रश्न मनात निर्माण होत असतात. याचा परिणाम विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता असते. यासाठी दररोज अभ्यास महत्त्वाचा असतो. जे विद्यार्थी वेळेचे नियोजन करून नियमित अभ्यास करतात ते आनंदाने परीक्षेला सामोरे जातात. साहजिकच अभ्यास केल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढलेला असतो. कोणत्याही प्रकारचा ताणतणाव निर्माण होत नाही. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आत्मविश्वास निर्माण करावा लागतो. वर्षभर जो काही अभ्यास त्यांनी केलेला असेल, तो विद्यार्थ्यांचा परीक्षेतील उत्साह वाढवत असतो.
आता दीपावलीच्या सुट्टीत आपण काय केले? मित्रांबरोबर जुन्या आठवणींना उजाळा दिल्याने दिवस कसे गेले हे समजले नसतील कदाचित? तेव्हा जागे व्हा, अभ्यासाला लागा. अजून वेळ गेलेली नाही. त्यामुळे निराश होण्याचा प्रश्नच येत नाही. आता खरी अभ्यासाची कसोटी आहे. इतर गोष्टी डोक्यातून काढून अभ्यासाकडे लक्ष द्यावे. काही विद्यार्थी अक्षरश: आळशी असतात. आई-वडील सांगतात म्हणून शाळेत जायचे म्हणून जायचे, आता उद्यापासून अभ्यास करूया अशात उद्या उजाडत नाही आणि काही दिवसांवर परीक्षा येते. नंतर काय करावे तेच त्यांना सुचत नाही. त्यात घरच्यांचे बोलणे, त्याला उत्तर काय द्यायचे हा त्यांच्या पुढे पडलेला प्रश्न? अशा अनेक कारणांमुळे काय करावे अशा द्विधा स्थितीत ते असतात.
तेव्हा अशी वेळ परीक्षा कालावधीत येऊ नये म्हणून आतापासून परीक्षा संपेपर्यंत नियमित अभ्यास केला पाहिजे. काही विद्यार्थ्यांचे वडिलोपार्जित घरगुती उद्योगधंदे असल्याने शेवटी कितीही शिकलो तरी आपला धंदा चालवायचा आहे, म्हणून अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे असे विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांनासुद्धा आपल्यासारखे करतात. त्यामुळे अशा विद्यार्थ्याच्या नादाला लागू नये. यात आपले नुकसान करून घ्याल. तेव्हा असे विद्यार्थी काय करतात यापासून अलिप्त राहिले पाहिजे. त्यांनी शिक्षण घेतले काय, नाही घेतले काय त्याचा त्यांच्यावर काहीच फरक पडत नाही. आपल्याला मात्र शून्यातून विश्व निर्माण करायचे आहे. कारण आपल्यावर अजून अनेकजण अवलंबून आहेत. अशा विद्यार्थ्यांनी आपली जबाबदारी ओळखून अभ्यास करावा.
आता जरी वर्षाचा शेवटचा महिना असला तरी बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झाला असेल. बऱ्याच प्रमाणात नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अभ्यासक्रम शिकवून पूर्ण केला जातो. त्यानंतर परीक्षा होईपर्यंत प्रत्येक विषयाची उजळणी व सराव परीक्षेवर शिक्षक भर देत असतात. जेणेकरून आपल्या विद्यालयाचा निकाल चांगला लागावा म्हणून प्रयत्न करीत असतात. यात शाळा प्रशासक तसेच शिक्षकवर्ग प्रयत्न करीत असले तरी विद्यार्थ्यांचे कर्तव्य आहे की, आपणसुद्धा प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे. बऱ्याच प्रमाणात अध्यापकवर्ग जीव तोडून अध्ययन करीत असतात. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना घेता आला पाहिजे. त्यासाठी परिश्रम जास्त महत्त्वाचे असतात. जो विद्यार्थी मन लावून अभ्यास करण्यासाठी परिश्रम घेतो, त्याला त्याचे निश्चित फळ मिळते. त्यासाठी विशेषत: बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी आतापासून जोमाने अभ्यासाला लागले पाहिजे. यातच त्यांचे खरे यश दडून बसले आहे.