शहडोल : “दाई” म्हणून ओळखल्या जाणार्या पारंपारिक प्रसूती सेवकाने दीड महिन्याच्या बाळाला उपचार म्हणून लोखंडी सळी तापवून ४० पेक्षा जास्त चटके दिले. या घटनेत ते बाळ गंभीर जखमी झाले आहे. ही घटना मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यातील हर्डी गावात घडली. बाळाला न्यूमोनिया (Pneumonia) झाला होता.
त्याची प्रकृती बिघडल्याने स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी कुटुंबीयांना रुग्णालयात जाऊन वैद्यकीय मदत घेण्यास सांगण्यात आले होते. मात्र, कुटुंबीयांनी पारंपरीक आणि चुकीच्या उपचार पद्धतीचा मार्ग अवलंबला. त्यातून ही भयावह घटना घडली.
बाळ आजारी असल्याने त्यांनी त्याला गावातील बुटी बाई बायगा नावाच्या ‘दाई’कडे नेले. जी पारंपारिक प्रसूती सेवक म्हणून ओळखली जाते. तिने बालकाला ४ नोव्हेंबर रोजी लोखंडी सळीने चटके देत डागले. यानंतर बाळाची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्याला पुन्हा डॉक्टरांकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी केलेल्या वैद्यकीय तपासणीत मुलाच्या मानेवर, पोटावर आणि शरीराच्या इतर भागांवर ४० हून अधिक चट्टे आढळून आले. क्रूर आणि अपरंपरागत उपचारामुळे बाळाला गंभीर दुखापत झाली असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले.
बाळाला चटके दिल्याचे पुढे येताच तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात आली. या प्रकरणात बुटीबाई बेगा, मुलाची आई बेटलवती बेगा आणि आजोबा रजनी बेगा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.