- करिअर : सुरेश वांदिले
करिअर करण्यासाठी किंवा घडवण्यासाठी कोणत्या मार्गांनी जायचे हे १०वीमध्ये ठरवल्यानंतर १२ वीनंतर दिशा स्पष्ट होऊ शकते. काहींच्या बाबतीत पदवी किंवा पदव्युत्तर पदवीनंतरही ही बाब साध्य होते. त्यामुळे ज्या विषयात गती, आवड आणि कल असेल, असेच विषय १२वीनंतर घ्यायला हवेत.
भौतिकशास्त्र आणि गणित यथातथाच असेल तर अभियांत्रिकी शाखेत प्रवेश मिळत असूनही पुढे फार प्रगती होईल याची खात्री देता येत नाही. इंग्रजी/मराठी भाषेवर प्रभुत्व नसेल, तर माध्यमांमध्ये फारशी चमक दाखवणे जवळपास दुरापास्त आहे. प्रयोगशाळेत मन रमत नसेल तर विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन काहीच उपयोग नाही. १०वीपर्यंतच्या मूलभूत गणितात फारशी प्रगती नसेल, तर पुढे वाणिज्य शाखेत उंच उडी घेणे शक्य होत नाही. तार्किक विचार करण्याची क्षमता, संवाद कौशल्य आणि भाषेवर प्रभुत्व नसल्यास विधि शाखेत प्रगती होणे नाही. शारीरिक क्षमता वाढवण्याचा कंटाळा येत असेल, तर सैन्यभरतीमध्येही मागेच राहणार, हे सांगायला ज्योतिषाची गरज भासू नये.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन, इंडियन मेरिटाइन युनिव्हर्सिटी, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, सेंट्रल युनिव्हर्सिटी, नॅशनल डिफेन्स ॲकॅडेमी, इंडियन इन्स्टिट्यॅट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च, रिजन एज्युकेशन इन्स्टिट्यूट, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योग अशासारख्या राष्ट्रीय संस्थांमधील प्रवेशासाठी महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी कसून प्रयत्न करायला हवेत. बहुतेक सर्व संस्थांचा दर्जा आणि गुणवत्ता उत्कृष्ट असून या संस्थांची शैक्षणिक कामगिरी लक्षात घेऊन संबंधित क्षेत्रातील उद्योग, कंपन्या, व्यावसायिक, स्टार्टअप हे प्लेसमेंटसाठी सहभागी होतात. याचा अर्थ अभ्यासक्रमांच्या कालावधीत उत्तम शैक्षणिक कामगिरी आणि व्यक्तिमत्वाचा चौफेर विकास केलेल्या सर्वच विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना नोकरी/रोजगार मिळतो. अर्थातच प्रत्येकाच्या कुवतीनुसार पॅकेजही मिळते.
करिअरच्या विविध संधी देणाऱ्या राष्ट्रीय संस्थांमधील अभ्यासक्रमांमध्ये प्रत्येकास प्रवेश मिळू शकत नाही. त्यामुळे आपल्या राज्यातील व देशातील इतर राज्यातील इतर शासकीय किंवा नामवंत खाजगी शैक्षणिक संस्थांमधील इच्छूक अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थी व पालकांनी प्रवेश घेण्याचा विचार करायला हवा. गुणवत्तेचे सर्वेक्षण खासगी व शासकीय संस्थांची गुणवत्ता तपासण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयामार्फत दरवर्षी केले जाणारे शैक्षणिक दर्जाचे सर्वेक्षण निश्चित दिशा देण्यासाठी मार्गदर्शक व उपयुक्त ठरू शकते. हे सर्वेक्षण, नॅशनल इन्स्टिट्यूट रॅकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) या नावाने सर्वांसाठी प्रकाशित केले जाते.
हे सर्वेक्षण https://www.nirfindia.org/ या केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाते. या संस्थांमधील पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा, ग्रंथालय, संशोधनाची संधी , प्राध्यापकांचा दर्जा आणि गुणवत्ता, संशोधनात्मक शोध निबंधांची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी, वेगळे उपक्रम, इतर शैक्षणिक संस्थांसोबत शैक्षणिक सहकार्य, उद्योग/व्यवसाय/कार्पोरेट यांच्यासोबत संबंध, इंटर्नशीपची सुविधा, अभ्यासक्रमातील बदलांबाबतची लवचिकता, विद्यार्थ्यांच्या चौफेर विकासाठीचे प्रयत्न, प्लेसमेंट, विद्यार्थ्यांची संस्थेबद्दलची धारणा अशा अनेक बाबी लक्षात घेऊन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये संस्थांचे गुणांकण केले जाते. सध्या २०२१ सालातील सर्वेक्षण संकेतस्थळावर उपलब्ध आहे. २०२२ च्या सर्वेक्षणाचे कार्य सुरु आहे. हे सर्वेक्षण बघणे अथवा अभ्यासणे फारसे कठीण नाही. त्यामुळे आपणास ज्या खाजगी अथवा शासकीय संस्थांमध्ये प्रवेश घ्यावासा वाटतो, त्याबद्दलची वस्तुनिष्ठ माहिती या ठिकाणी उपलब्ध होते. काही खासगी संस्थांची क्रमवारी ही शासकीय संस्थांपेक्षा वरची असल्याचेही दिसून येते. तेव्हा अशा संस्थांमध्ये प्रवेश घ्यावासा वाटल्यास किंवा संबंधित संस्थेच्या प्रवेश प्रकियेतून प्रवेश मिळत असल्यास त्याबाबत सकारात्मक विचार करण्यास हरकत नाही. एनआरआयएफ सर्वेक्षणात सामील न झालेल्या काही संस्था आपल्या शहरात किंवा नजीकच्या परिसरात असतील व त्यामध्ये प्रवेश घ्यावा. मात्र त्याआधी एनआरआयएफमध्ये संस्थेची गुणवत्ता तपासण्यासाठी जे निकष लावले जातात, त्यांची यादी करुन पालक व विद्यार्थ्यांनी अशा संस्थांचे स्वत: पुरते गुणांकन करावे. ते त्यांना समाधानक वाटल्यासच पुढचा रस्ता पकडावा. कारण तीन/चार वर्षे ,भरपूर शैक्षणिक शुल्क देऊन जर पदरात काहीच पडणार नसेल तर अशा संस्थांमध्ये केवळ समाधानासाठी प्रवेश घेण्यात काय हशील?
उत्तम करिअरमुळे स्वत:च्या प्रगतीसोबतच देशाच्याही प्रगतीत हातभार लावण्याची संधी प्रत्येकालाच मिळू शकते. मात्र त्यासाठी आपल्या बौद्धिक कुवतीनुसार प्रामाणिकपणे अभ्यासक्रमाची निवड करणे गरजेचे आहे.अशी प्रामाणिकता जे विद्यार्थी दाखवतात आणि जे पालक त्यांना पाठिंबा देतात, त्यांना निश्चितपणे यश मिळते.