Tuesday, July 16, 2024
Homeब्रेकिंग न्यूजMaratha Reservation : जाळपोळ, तोडफोड करणारे मराठा नव्हतेच! आमदार प्रकाश सोळंके यांचा...

Maratha Reservation : जाळपोळ, तोडफोड करणारे मराठा नव्हतेच! आमदार प्रकाश सोळंके यांचा दावा

मुंबई : “माझ्या घरासमोर मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मागणी करणा-या मराठा आंदोलकांनी निदर्शने केली हे खरे असले तरी जाळपोळ, तोडफोड करणारे मात्र मराठा नव्हते. जमावामध्ये मराठा समाजाव्यतिरिक्त इतर जाती-जमातीचे लोक होते. यासोबतच काळाबाजार करणारे लोक देखील होते. माझे ३० वर्षांपासूनचे राजकीय विरोधक होते. यासोबतच त्यांच्या संस्थेत काम करणारे शिक्षक देखील होते. जे ३०० जण आले होते ते तयारीने आले होते. त्यांच्याकडे शस्त्र होते. मोठे दगड होते. पेट्रोल बॉम्ब होते. हे सर्वजण प्लॅनिंग करून माझ्या जीविताला हानी करण्याच्या हेतूने आले होते. मात्र काही मराठ्यांनी माझा जीव वाचवला”, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेस मधील अजित पवार गटाचे बीडचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केला.

घराची जाळपोळ आणि गाड्यांची तोडफोड केल्यानंतर प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. आंदोलकांनी दोन दिवसापूर्वी बीडमधील (Beed) माजलगावमध्ये (Majalgaon) प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक केली होती. तसेच, सोळंकेंच्या बंगल्याच्या आवारात उभ्या असलेल्या गाड्याही पेटवल्या होत्या. याबाबत प्रकाश सोळंके यांनी त्या दिवशी काय काय घडले हे मुंबईतील पत्रकार परिषदेत सविस्तर सांगितले.

गेल्या २ महिन्यापासून मराठा आरक्षण विषय सुरू आहे. देशात आणि राज्यात आंदोलन होत आहेत. बीड जिल्ह्यात वातावरण गंभीर आहे. २०११ पासून जरांगे आरक्षण विषयावर काम करत आहेत. संपूर्ण मराठा समाज त्यांच्या नेतृत्वात एकवटला आहे. अतिशय प्रामाणिक आणि अभ्यासपूर्ण व्यक्ती म्हणून ते पुढे येत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत. मी या आंदोलनात मागील २ महिन्यांपासून सहभागी आहे.

मी माजलगाव मतदारसंघाचा आमदार आहे. आमदार होण्यापूर्वी पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य देखील होतो. माझे वडिल जिल्हा परिषद अध्यक्ष होते. १९६७ ते ८० दरम्यान ते राज्यमंत्री, मंत्री देखील होते. मी राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे.

१९८७ ते २०२३ माजलगाव मतदारसंघात आमदार म्हणून माझा ३६ वर्षाचा अनुभव आहे. काम करण्याची संधी मिळाली.

३० ऑक्टोबरला मी घरातच होतो. माजलगाव बंद करण्यात आले होते त्यावेळी ५ हजार तरुण आले होते. साडे दहा वाजता काही तरुण आले आणि त्यांनी मला हा सर्व जमाव माझ्या घरावर येणार आहे अशी माहिती दिली. मी तरीदेखील तिथेच थांबलो. मी त्यांच्याशी बातचीत करावी यासाठी मी थांबलो. पण काही क्षणातच माझ्या घरावर जोरदार दगडफेक करण्यात आली. ते तयारीने आले होते. त्यांच्याकडे शस्त्र होते. मोठे दगड होते. पेट्रोल बॉम्ब होते. हे सर्वजण प्लॅनिंग करून माझ्या जीविताला हानी करण्याच्या हेतूने आले होते.

माझं एवढंच मत आहे की ३०० लोकं हे अवैध धंदा करणारे, काळाबाजार करणारे आणि माझे विरोधक होते. मी पोलिसांना सीसीटिव्ही फुटेज दिले आहेत. मी पोलिसांकडे मागणी केली आहे की केवळ दोषींवर कारवाई करा. सरसकट कारवाई नको. हल्ला करणारे आहेत हे कुठल्या पक्षाचे आहेत हे माहिती नाही. आतापर्यंत २१ लोकांना अटक झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजचा आधार आहेच. यातील ८ आरोपी मराठा आंदोलकांव्यतिरिक्त आहेत. ऑफिस आणि घराचं संपूर्णपणे नुकसान झालंय. पण मी अजूनही तक्रार दिली नाही, असे ते म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -