Sunday, May 11, 2025

महाराष्ट्रमनोरंजनताज्या घडामोडी

IFFI: गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी 'या' ३ मराठी चित्रपटांची घोषणा

IFFI: गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी 'या' ३ मराठी चित्रपटांची घोषणा

मुंबई : गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार विभागासाठी (International Film Festival of India) यावर्षी महाराष्ट्र सरकारकडून तीन मराठी चित्रपटांची (Marathi Movie) घोषणा करण्यात आली आहे. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा देशातील सर्वात जुना तसेच सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी याबद्दल माहिती दिली.


गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार विभागासाठी महाराष्ट्र शासनाकडून ‘ग्लोबल आडगाव’ (Global Aadgaon), ‘गिरकी’ (Girki) ‘बटरफ्लाय’ (Butterfly) या तीन मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबद्दल माहिती दिली.


गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘फिल्म बाजार ‘ या गटात प्रत्येकवर्षी मराठी चित्रपट महाराष्ट्र शासनाकडून पाठवले जात असतात. या चित्रपटाची निवड करण्यासाठी ५ सदस्यांची तज्ज्ञ समिती नेमण्यात आली होती. या समितीने केलेल्या शिफारसीनुसार ग्लोबल आडगाव, गिरकी आणि बटरफ्लाय हे तीन मराठी सिनेमे निवडण्यात आले आहेत. या तीनही चित्रपटाला प्रत्येकी एक प्रतिनिधी शासनातर्फे गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म मार्केट विभागासाठी सहभागी होण्याकरता चित्रपटाबरोबर पाठविण्यात येणार आहे.


शासनाने महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जाहिरातीद्वारे गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ‘फिल्म बाजार’ या विभागात राज्य सरकारकडून पाठविण्याकरता इच्छुक चित्रपटाचे प्रवेश मागविले होते. त्यानुसार एकूण २९ मराठी चित्रपटांचे प्रस्ताव मिळाले होते. यामध्ये किशोरी शहाणे, प्रसाद नामजोशी, हर्षित अभिराज, समीर आठल्ये आणि संदीप पाटील यांच्या समितीने परीक्षणाअंती त्यापैकी ‘ग्लोबल आडगाव’, ‘गिरकी’ आणि ‘बटरफ्लाय’ या तीन मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे.


दरम्यान यावर्षीच्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सिनेप्रेमी मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत. अद्याप या वर्षीचा महोत्सव नेमकं कधी सुरू होणार याची माहिती समोर आलेली नाही.

Comments
Add Comment