Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडीNitesh Rane : उद्धव ठाकरे आज तरी खरं बोलतील का?

Nitesh Rane : उद्धव ठाकरे आज तरी खरं बोलतील का?

८ आणि १३ जून २०२० ला तुमचा मुलगा कुठे होता?

उद्धव ठाकरे स्वतःच्या पायावर उभे राहणार आहेत की नाही?

आमदार नितेश राणे यांचा प्रश्नांचा भडिमार

मुंबई : दसर्‍याच्या (Dussehra) निमित्ताने मोहन भागवतजींच्या (Mohan Bhagwat) भाषणातून देशाला एक विचार संस्कार देण्याचं काम दरवर्षी होतं. पण आज विजयादशमीच्या निमित्ताने एक दहातोंडी रावण शिवतीर्थावर भारताच्या आणि हिंदूंच्या (Hinduism)विरोधात बोलणार आहे, अशी खरमरीत टीका भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधत केली. सोबतच आजच्या दिवशी तरी खरं बोला, असं एक खुलं आव्हान नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे.

नितेश राणे म्हणाले, संजय राऊत (Sanjay Raut) सकाळी म्हणाला की आज खरं बोलण्याचा दिवस आहे, त्यामुळे मी उद्धव ठाकरेंना आवाहन करेन की, शिवतीर्थावर उभं राहून जिथे बाळासाहेबांनी इतिहास घडवला तिथे तुम्ही आज खरं बोलूनच टाका की नेमकं तुमच्या मुलाने दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूतचा खून केला होता का? या खुनामागे त्याचा हात होता का? ८ तारखेच्या पार्टीमध्ये ड्रग्ज वापरले गेले होते का? तुमच्यात खरं बोलण्याची हिंमत असेल तर ८ जून आणि १३ जून २०२० ला तुमचा मुलगा कुठे होता हे सांगा, असं खुलं आव्हान नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे.

तुमचा कामगार रोज सकाळी ड्रग्जमुक्त महाराष्ट्रावर बोलतो, मणिपूरमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचारांविषयी बोलतो पण तुमच्या मुलाने दिशा सालियन नावाच्या महिलेवर झालेल्या अत्याचारांमध्ये सहभाग घेतला असं जे सांगितलं जातं त्याबाबतीत तो निर्दोष आहे का हे सांगण्याची हिंमत दाखवा. उगाच इतरांवर टिकाटिप्पणी करण्यापेक्षा, इतिहास काढण्यापेक्षा संजय राऊतला सांगेन की तुझ्या इतिहासाबद्दल थोडी माहिती दे. जनसंघ, आणीबाणीचा काळ, अडवाणीसाहेब या सगळ्यांबद्दल बोलताना आणीबाणीच्या काळात आधी तू शिवसेनेसोबत होतास का, की शिवसेनेच्या विरोधात लिहित होतास हेदेखील सांग, असं नितेश राणे म्हणाले.

…तर शिवतीर्थावर डरकाळी आली असती

संजय राऊत यांना उद्देशून नितेश राणे म्हणाले, नपुंसकांना कांदे लागतात असं तू जे म्हणालास, मग तुझ्या घरामध्ये कदाचित जास्त कांदे खात असतील. म्हणूनच तू त्या डॉक्टर महिलेच्या घरात जाऊन बसतोस का? आणि तुला जर कांदे जास्त झाले असतील तर तुझ्या मालकाला आणि त्याच्या मुलाला थोडे पाठव. म्हणजे ‘मला वाघ म्हणा’ असं म्हणावं लागणार नाही, थोडे जास्त कांदे खाल्ले असते तर शिवतीर्थावर डरकाळी आली असती, असं आदित्य ठाकरेंच्या आवाजाची नक्कल करत नितेश राणे म्हणाले.

तुम्हाला सांभाळण्यासाठी महाराष्ट्र जगतो आहे का?

ज्या शिवतीर्थावर बाळासाहेबांनी लाखो लोकांना जमवून सभा घेतल्या, त्या शिवतीर्थावर आज दोन हजार खुर्च्या देखील लागलेल्या नाहीत. हिंमत असेल तर मोजून दाखवा. ओढूनताणून तुम्ही दोन हजार खुर्च्या जमवल्या आहेत, आणि भाषण करताना तुम्ही खोटं सांगणार की केवढं मैदान ओसंडून वाहत आहे. तुमच्या टीझरमध्ये देखील तुम्हाला बाळासाहेबांचा शेवटचा व्हिडीओ दाखवावा लागतो की माझ्या उद्धव आणि आदित्यला सांभाळा, तुम्हाला सांभाळण्यासाठी महाराष्ट्र जगतो आहे का? ते कधी स्वतःच्या पायावर उभे राहणार आहेत की नाही? उद्धव शिवसैनिकांना कधी सांभाळणार? असा खडा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.

उद्धव ठाकरे नावाच्या रावणाचं दहन करणार

आज शिवतीर्थावर उभा राहणारा दहातोंडी रावण जो हमासचं समर्थन करतो, सनातन आणि हिंदू धर्माचा द्वेष करतो, जिहाद्यांचा साथीदार आहे त्या रावणाला दहन करण्याची वेळ आली आहे. येणार्‍या २०२४ ला या दहातोंडी उद्धव ठाकरे नावाच्या रावणाचं आमचं महायुतीचं सरकार निश्चितपणे दहन करेल, असा विश्वास मी यानिमित्ताने व्यक्त करतो, असं नितेश राणे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -