Friday, July 19, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखचाकरमान्यांचे हाल संपणार कधी?

चाकरमान्यांचे हाल संपणार कधी?

गौरी-गणपतीसाठी या वर्षी कोकणात आपापल्या गावी गेलेल्या लक्षावधी चाकरमान्यांचे मुंबईहून जाताना हाल झालेच. पण पाच दिवसांचे गणपती विसर्जन झाल्यावर मुंबईला परतणाऱ्यांचे प्रचंड हाल झाले. दरवर्षी गणपतीला जाताना व येताना अगोदर आरक्षण करूनही कोकणवासीयांचे हाल होत आहेत. कितीही रेल्वे गाड्या सोडा, कितीही एसटीच्या बसेस सोडा, गर्दी आटोक्यात येत नाही. अधल्या मधल्या स्टेशनवर बसायला काय पण गाडीत घुसायला मिळत नाही. मग यावर तोडगा काय? या प्रश्नांचे उत्तर प्रवाशांनाही सांगता येत नाही आणि रेल्वे – एसटी प्रशासनालाही देता येत नाही.

दरवर्षी कोकणात गणपती, होळी आणि एप्रिल महिन्यांच्या सुट्टीत मुंबईहून जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी वाढतच आहे. वर्षभर मुंबईत लोकलमध्ये गर्दीत प्रवास करून धक्के खात रोज कामावर वेळेवर पोहोचायचे आणि गणपतीलाही खचाखच गर्दीतून कोकणात आपल्या गावी जायचे हे आता नेहमीचे झाले आहे. मग कोकणी माणसाने सदैव मुंबईत असो वा कोकणात जाता-येताना खचाखच गर्दीतूनच जीव मुठीत धरून वावरायचे का? रेल्वेचे तिकीट परवडणारे असते म्हणून कोकणवासीय आपल्या कुटुंबीयांसह गणपतीला कोकणात जातात. रेल्वेचे आरक्षण अतिशय कमी वेळात फुल्ल होते हा दरवर्षीचा अनुभव आहे. मग बसने प्रवास हाच पर्याय उरतो. एसटी बसचे भाडे पाचशे – साडेपाचशे असेल, तर खासगी वा आरामदायी बसचे भाडे पंधराशे ते तीन हजारांपर्यंत मोजावे लागते. परिवहन खात्याने कितीही बडगा उगारला तरी त्यात कधीच काही फरक पडत नाही. खासगी प्रवासी कंपन्यांना कोकणात व गोव्याला जाणाऱ्या प्रवशांना मोठे भाडे आकारायला मिळणे ही गणपतीच्या निमित्ताने त्यांना पर्वणी वाटते. पण लुटमार करणाऱ्या खासगी बस कंपन्यांना सरकार कधीच वेसण घालू शकलेले नाही. त्यांना जरब बसविण्यात अडचण कोणती आहे, याचा शोध घेतला तर ‘भ्रष्टाचार’ या एका शब्दात उत्तर सापडेल. राज्यात सरकार कोणाचेही असो, खासगी प्रवासी कंपन्यांची गणपती, दिवाळी, एप्रिल-मे महिन्यात लुटमार ही चालूच असते व बिचारे कोकणवासीय त्याला बळी पडतात, कारण त्यांना पर्यायच नसतो. यंदाच्या वर्षी गणपतीसाठी जाताना चाकरमान्यांचे कसे हाल झाले, यावर वृत्तपत्रांत रकानेच्या रकाने भरून आले, काही वृत्तपत्रांनी अग्रलेख लिहून सरकारचे लक्ष वेधू घेण्याचा प्रयत्न केला.

निदान पाच दिवसांच्या गणपतीनंतर मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांना सुखाने प्रवास उपलब्ध करून देणे हे केसरकरांचे काम नाही का? सरकारने ठरवले तर वाट्टेल ते करता येते. मुंबईतून यावर्षी नेमके किती चाकरमानी कुटुंबीयांसह कोकणात गेले, याचा निश्चित आकडा सांगता येत नाही. खासगी मोटारीने हजारो चाकरमानी कोकणात गेले आहेत. तरीही सहा ते सात लाख लोक कोकणात गेले असावेत, असा ढोबळ अंदाज आहे. यातले बहुतेक हे मुंबईत मतदार आहेत. मग आपल्या मतदारांची काळजी सरकारने घ्यायला नको का? माजी खासदार निलेश राणे यांनी ‘मोदी एक्स्प्रेस’ रेल्वे मुंबईहून कोकणातील गणेश भक्तांसाठी सोडली. आमदार नितेश राणे यांनीही आणखी विशेष गाडी कोकणवासीयांसाठी सोडली. राणे कुटुंबीय गेली अकरा-बारा वर्षे गणपतीसाठी मुंबईहून कोकणात विशेष गाडी सोडत आहेत. रेल्वे प्रशासनानेही कोकणातील प्रवाशांची गरज ओळखून आणखी गाड्या सोडणे आवश्यक आहे. एसटीने सहा – सात हजार बसेस कोकणासाठी उपलब्ध करून दिल्या, पण त्याही अपुऱ्या पडल्या हे खचाखच गर्दींमुळे दिसून आले. पाच दिवसांचे गणपती विसर्जन झाल्यावर चाकरमानी बायका – मुलांसह मुंबईला परत निघाले. खेड-चिपळूणला अफाट गर्दी उसळलेली बघून रेल्वे डब्यांचे दरवाजेही उघडले गेले नाहीत. गर्दीला आवरायचे की प्रवाशांना रेल्वे डब्याचे दरवाजे उघडून द्यायचे, अशा पेचात रेल्वे पोलीस सापडले. राजापूरवरून १३० बसेस परतीसाठी निघाल्या. पण त्याही कमीच पडल्या. ज्यांना रेल्वे किंवा एसटी बस मिळाली नाही ते प्रवासी शेवटी नाईलाजाने खासगी ट्रॅव्हल कंपन्यांकडे वळले. खासगी बसवाल्यांकडे प्रवाशांचे लोंढे गेल्यावर काय होणार, हे वेगळे सांगायला नको.

मुंबई-गोवा रस्ता रुंद व चांगला कधी होणार याची तारीख नेमकी कोणी सांगत नाही. मुंबई – नागपूर समृद्धी मार्ग कालबद्ध वेळेत होतो. मग मुंबई – गोवा महामार्ग किती वर्षे रेंगाळणार? बिचारे कोकणवासीय खड्डे चुकवत, खराब रस्त्यांवरून वर्षानुवर्षे प्रवास करीत आहेत. त्यांच्यासमोर भावनिक भाषणे करून मते मागितली जातात. पण मुंबई – गोवा रस्ता कालबद्ध वेळेत चांगला तयार होत नाही, हे मोठे दुर्दैव आहे. गेल्या दोन दिवसांत म्हणजेच शनिवारी – रविवारी या महामार्गावर वीस-वीस किमी लांबलचक रांगा लागल्या होत्या. ट्रॅफिक जामचा फटका लाखो प्रवाशांना बसला. रेल्वेत तुफान गर्दी व बसेस तुडुंब भरलेल्या. खासगी बसेस अवाच्या सव्वा भाडे आकारतात. खासगी मोटारीही हजारोंच्या संख्येने खराब रस्त्यावर ट्रॅफिक जाममध्ये अडकलेल्या. या सर्व चक्रातून कोकणवासीयांची सुटका कधी होणार? २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी आहे. नंतर शुक्रवार, शनिवार व रविवार आहे. तेव्हाही मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांची प्रचंड गर्दी रेल्वे व बसेसना असणार आहे. पाच दिवसांच्या गणपती विसर्जनानंतरचा अनुभव लक्षात घेऊन अनंत चतुर्थीनंतर परतणाऱ्या कोकणवासीयांना सुखाने मुंबईत परतता यावे एवढीच रेल्वे-एसटी व राज्य प्रशासनाकडून अपेक्षा आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -