
चेंबूर : गेली कित्येक वर्षे लोकमान्य शिक्षण संस्थेतील शरद आचार्य क्रीडा केंद्र श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन चेंबूर येथे ॲक्रोबेटिक्स जिम्नॅस्टिक्स (Acrobatics Gymnastics) हा खेळ सातत्याने खेळला जात होता. या खेळाने अनेक शिवछत्रपती पुरस्कार, जिल्हा क्रीडा पुरस्कार विजेते खेळाडू घडविले. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या महाराष्ट्राचे, भारताचे प्रतिनिधित्व केले आणि सुवर्ण, रौप्य, कांस्य पदकांची लयलूट केली.
मात्र १५ ते २० वर्षे सातत्याने सराव करूनही हा खेळ भारतीय राष्ट्रीय खेळांमध्ये नसल्याने खेळाडूंना ओळख मिळत नव्हती. त्यांची दखल घेतली जात नव्हती. परंतु 'सातत्याने प्रयत्न केले की त्याचे फळ मिळतेच' या उक्तीप्रमाणे हे खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक सातत्याने सराव करत राहिले आणि इतक्या दिवसांच्या अथक परिश्रमा नंतर ॲक्रोबेटिक्स जिम्नॅस्टिक्स हा खेळ इंडियन नॅशनल गेम्स/ इंडियन ऑलिम्पिक्स (Indian National Games/ Indian Olympics) मध्ये समाविष्ट झाला.
बालेवाडी शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे २४ सप्टेंबर २०२३ रोजी याची निवड प्रक्रिया पार पडली व श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन शाळेतील सराव करणाऱ्या १३ खेळाडूंची यात निवड झाली. अक्षता ढोकळे, सोनाली बोराडे, अर्णा पाटील, प्रीती येखंडे, ऋतुजा जगदाळे, आचल गुरव, कुणाल कोठेकर, प्रशांत गोरे, नमन महावर, रितेश बोराडे, आकाश गोसावी, आदित्य कासासे, आशुतोष रेनवकर इत्यादी खेळाडूंची निवड झाली आहे. राहुल ससाणे, सुनील रणपिसे, रमेश सकट, योगेश पवार या प्रशिक्षकांनी या खेळाडूंना मार्गदर्शन केले. इतकंच नव्हे तर ऑक्टोबर मध्ये उसबेकिस्तान येथे होणार्या आशियायी स्पर्धेत हेच खेळाडू आपल्या भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.