Friday, June 20, 2025

Accident : अहमदनगर-कल्याण महामार्गावरील भीषण अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी

Accident : अहमदनगर-कल्याण महामार्गावरील भीषण अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी

पुणे : अहमदनगर -कल्याण महामार्गावरील ओतूर परिसरात झालेल्या भीषण अपघातात(accident) दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक व्यक्ती यात गंभीर जखमी झाला आहे. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास हा अपघात घडला. या घटनेमुळे ओतूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


बुधवारी सायंकाळच्या सुमारास या मार्गावर ओतूर परिसरात वेगाने जाणाऱ्या पिकअप गाडीने चालत जाणाऱ्या युवतीसह एका टूव्हीलर गाडीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की या अपघातात पायी चालणारी मुलगी आणि दुचाकीवरील महिला या दोघींचा जागीच मृत्यू झाला. तर बाईकस्वार यात गंभीर जखमी झाला आहे.


ऋतुजा अशोक डुंबरे (वय १९ वर्ष) आणि सविता गीताराम तांबे (वय ४५ वर्ष) अशी या अपघातात मृत महिलांची नावे आहेत तर या अपघातात गीताराम नामदेव तांबे (वय ५२ वर्षे) हे गंभीर जखमी झाले. ऋतुजा ही या रस्त्याने आपल्या घरी पायी चालत जात होती. तर सविता आणि गीताराम हे टू व्हीलरवर होते. यावेळी भरधाव पिकअप व्हॅनने दोघांनाही जोरदार धडक दिली. काही समजण्याच्या आतच हा भीषण अपघात घडला.


त्यानंतर ही पिकअप व्हॅन दुसऱ्या बाजूला जावून उलटली. या अपघातानंतर पिकअपच्या ड्रायव्हरने तेथून पळ काढला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून फरार ड्रायव्हरचाही शोध घेतला जात आहे.

Comments
Add Comment