Sunday, July 21, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यहत्ती हटाव... शेती, बागायत बचाव...!

हत्ती हटाव… शेती, बागायत बचाव…!

माझे कोकण: संतोष वायंगणकर

कोकणातील जंगलामध्ये वाघ, हत्ती, गवारेडा, रानडुक्कर, माकड, वानर फार पूर्वीपासूनच होते. या सर्व वन्यप्राण्यांचा जंगलचा झलाका आपणच त्यांच्यावर आक्रमण करून, मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून खऱ्याअर्थाने त्यांना उघड्यावर आणले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जंगलतोड करताना आपण त्याचा साधा विचारही केला नाही की या जंगलांमध्ये राहणाऱ्या वन्यप्राण्यांनी जायचं कुठे? त्यांनी खायचं काय? या आपल्या अविचाराने आता वन्यप्राणी मनुष्यवस्तीकडे येऊ लागले आहेत. कोकणातील काही भागांमध्ये रानटी हत्तींचा त्रास आहे. विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात रानटी हत्तींनी शेतकऱ्यांचं जगणचं मुश्कील करून ठेवलंय. सामान्य शेतकऱ्यांनी कष्टाने उभी केलेली शेती बागायत हत्तींनी पायदळी तुडवली आहे. पंधरा-वीस, पंचवीस वर्षे ज्या कष्टाने बागायत उभी करायची आणि वन्यप्राण्यांच्या एका फिरस्तीने ती उद्धवस्त व्हावी हे रानटी हत्तींच्या बाबतीत तरी घडत आहे. हत्तींना हटवण्यासंदर्भात आतापर्यंत राज्य सरकारकडून अनेक मोहिमा राबवल्या गेल्या.

‘हत्ती गो-बॅक’ मिशन महाराष्ट्राचे वन विभागाचे प्रधान सचिव अशोक खोत असताना राबविण्यात आले. लाखो रुपये या मोहिमेवर खर्च झाले; परंतु हत्तींना परतवण्यात यश आले नाही. त्यानंतर हत्तींना पकडण्याचाही प्रयत्न झाला; परंतु ती मोहीमही यशस्वी झाली नाही. हत्तींच्या संदर्भाने मोहीम राबवताना हत्ती कर्नाटकच्या जंगलामध्ये परतवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सर्व मोहिमा आजपर्यंत तरी अयशस्वी झाल्या आहेत. अपयशाचे नेमके कारण काय आहे याचा अभ्यास प्रथम राज्य शासनाच्या वनविभागाने करण्याची आवश्यकता आहे. सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी सतत रानटी हत्तींचा बंदोबस्त करा म्हणून मागणी करतात. हत्तींचा शेतकऱ्यांना नेहमीचा होणारा उपद्रव हा काही राजकीय ‘इश्यू’ नाही. तर तो सामाजिक प्रश्न आहे. रानटी हत्तींच्या वस्तीतील वावराने शेतकऱ्यांने काय करायचे हा प्रश्न आहे. माड-पोफळी, केळींच्या बागायती हत्तींनी उद्धवस्त करून गेल्या. वीस-पंचवीस वर्षे शेतकरी हवालदिल झाला आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनात कोकणातील हत्तींच्या प्रादुर्भावाचा विषय अनेकवेळा चर्चेला आला आहे. मंत्र्यांच्या दालनात अनेक बैठका पार पडल्या आहेत. त्यावर गांभीर्यपूर्वक चर्चा होऊनही हत्तींचा हा विषय पुन्हा बैठका आणि चर्चा या गुऱ्हाळातच अडकलेला असतो.

आता तर कोकणात केवळ हत्तींचा विषय जितका महत्त्वाचा झालेला आहे तितकाच गवारेडे, माकड यांचा लोकवस्तीत वाढलेला वावर फार मोठ्या चिंतेचा विषय आहे. एकिकडे कोकणातील शेतकरी ऋतुचक्राच्या अनियमिततेमध्ये कोणत्या फळपिकाचं काय होईल हे ठरवणं शेतकऱ्याला मुश्कील झालं आहे. यातच नारळ बागायत, आंबे या सर्वांवर माकडांनी केव्हाचाच कब्जा केला आहे. कोवळे नारळ तोडून उद्धवस्त करणारे माकडांचे कळप गावो-गावी फिरत आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्याचा शेतकऱ्यांनी आपापल्या पद्धतीने प्रयत्न केला; परंतु त्यात कोणत्याही प्रकारे यश आलेले नाही. शेती बागायतीतला जसा माकडांचा वावर वाढला आहे तसा तो गवारेड्यांचाही अनेक गावांतून मुक्तसंचार सुरू आहे. शेती बागायती फार मोठ्या कष्टाने उभी करायची त्यासाठी दहा-वीस वर्षे मेहनत घ्यायची आणि एखाद्या वन्यप्राण्यांच्या कळपाने एका तासात वीस वर्षांच्या परिश्रमाची माती होऊन जाताना पाहावी लागते. यामुळे कोणत्याच शेतीत नव्याने येणारा तरुण शेतकरीही चिंतेने हैराण आहे. या प्राण्यांचा कसा बंदोबस्त करावा. शेती कशी वाचवावी हा प्रश्न आजच्या घडीला सर्वांसमोरचा आहे. हत्तींच्या बंदोबस्ताचा विषय ऐरणीवरचा आज झालेला आहे. तसाच उद्याला गवारेडा, माकड या प्राण्यांच्या वाढत्या संचाराचा विषयही भविष्यात नाही, तर आताच गंभीर बनला आहे. भविष्यात तो आणखीनच गंभीर होणारा आहे. या वन्य प्राण्यांच्या वस्तीतील शेती, बागायतीतील वावराला कसा आळा घालायचा हाच खरंतर यक्षप्रश्न आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -