Saturday, May 16, 2026

मुंबईतील दहीहंडीत शिस्त अन् जल्लोष...

मुंबईतील दहीहंडीत शिस्त अन् जल्लोष...

विविधतेतून एकतेचा व्यापक आविष्कार जगाला दाखिवणारा असा आपला देश आहे. त्याप्रमाणेच आपली संस्कृतीही विविध सण, उत्सवांनी अविरत नटलेली अशी आहे. कित्येक वर्षांपासून आपल्या देशात अनेक जाती, धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. यावेळी एकमेकांच्या रूढी-परंपरांचा मान ठेवला जातो, त्यात सहभाग नोंदवून त्यांचा मनमुराद आस्वादही घेतला जातो. त्यात कुठेही भेदभावाला जागा नसते. अशा या सण-उत्सवांपैकी प्रामुख्याने गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्रोत्सव असे काही सण हे सर्वचजण एखाद्या मोठ्या उत्सवाप्रमाणे साजरे करतात. त्यात मुंबई म्हणजे छोटा भारतच. शेजारी ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, पुढे पुणे येथेही आता मुंबईचेच प्रतिबिंब दिसू लागले आहे. देशातील विविध राज्यांतील लोकं येऊन या सर्व ठिकाणी स्थायिक झाले आहेत व येथील परंपरांशी एकरूप झाले आहेत. त्यामुळेच एखादा मोठा सण आला की सर्वजण तो सण एकत्र येऊन साजरा करताना दिसतात.

दिवस बदलत गेले तसे या सणांचे स्वरूपही आता खूपच बदललेले दिसत आहे. या सण-उत्सवांमधील भाव आता गायब होत चालला आहे आणि त्याची जागा उत्सवांनी घेतली आहे. उत्सवी स्वरूप आले की, पैशांचा वारेमाप वापर हा आलाच, तर यंदा मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह महामुंबईचा परिसर आणि राज्यभरात दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. राज्यभरात अनेक ठिकाणी गोविंदा पथकांनी थरावर थर लावत सलामी दिली. मुंबईसह ठाणे आणि पुणे अशा मोठ्या शहरांतही दहीहंडीचा जल्लोष पाहायला मिळाला. या उत्साहाच्या दरम्यान काही ठिकाणी गालबोटही लागल्याचे दिसून आले. उत्साहाच्या भरात उंच मानवी मनोरे उभारताना काही दुर्घटना घडून गोविंदा जखमी होण्याच्या घटना घडण्याची शक्यता ध्यानी घेऊन या गोविंदांवर तातडीने उपचार करण्यासाठी महापालिकेने शहरातील रुग्णालयांमध्ये १२५ खाटा राखीव ठेवल्या होत्या. दहीहंडी उत्सवानिमित्ताने महानगरपालिकेची सर्व रुग्णालये अॅक्शन मोडवर होती. मुंबईत दहीहंडी उत्सवामध्ये मानवी मनोरे रचताना काही दुर्घटना किंवा अपघात घडल्याने तब्बल १९५ गोविंदा जखमी झाले असून त्यापैकी १४ गोविंदाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे, तर १७७ गोविंदाना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. यंदा सरकारने गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा एक चांगला निर्णय घेतला व त्याचा नक्कीच फायदा झाला. सरकारने काही सुरक्षा उपाय करण्याच्या सूचनाही केल्या होत्या. त्यामुळे गोविंदांना प्राणास मुकावे लागल्याची घटना घडलेली नाही हे विशेष.

मच गया शोर सारी नगरी रे, गोविंदा रे गोपाळा, जय जय श्रीराम अशा एक ना अनेक गाण्यांवर गोविंदा पथकांसह मंडळाचे पदाधिकारी, नागरिकांनी ठेका धरला होता. यावेळी सर्वात समाधानकारक बाब म्हणजे महिनाभरापासून दडी देऊन बसलेल्या पावसाने ऐनवेळी लावलेली हजेरी. पावसाची अगदी पहाटेपासूनच एंट्री झाल्याने गोविंदा पथकांसह नागरिकांचा उत्साह द्विगुणित झाला. दहीहंडी उत्सवाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात आठ बड्या राजकीय आयोजकांनी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. यामध्ये शिवसेना, मनसे व भाजप या पक्षांचा समावेश होता. या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे या राजकीय नेत्यांनी आणि सिनेकलाकारांनी हजेरी लावत गोविंदाचा उत्साह वाढवला होता. लावणी नृत्यांगणा गौतमी पाटीलने मुंबईतील मागठाणे येथील दहीहंडी उत्सवात सहभाग नोंदवला. तिने प्रकाश सुर्वे यांच्या मागाठाणे येथील दहीहंडी कार्यक्रमात हजेरी लावून ठेका धरला. त्यातच चाळीतील गल्लींपासून ते राजकीय पक्षांनी आयोजित केलेल्या लाखोंच्या कार्यक्रमात गोविंदांचा उत्साह ओसंडून वाहत होता. मुंबईत यंदा भाजपच्या वतीने विक्रमी ४०० दहीहंडींचे आयोजन करण्यात आले होते. लालबागमध्ये भाजपने बदलाची दहीहंडी उभारली, तर वरळीत परिवर्तनाच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते.

मुंबईसह ठाणे, कल्याण आणि परिसरात अनेक पथकांनी चित्तथरारक मानवी मनोरे उभे करून दहीहंडी उत्सव साजरा केला. ठाण्यातल्या नौपाड्यात मनसेच्या दहीहंडीची चर्चा जोरात होती. नौपाड्यामध्ये १० थर रचून दहीहंडीचा विक्रम करण्याच्या तयारीमध्ये अनेक गोविंदा पथके होती आहेत. पण जय जवान पथकाने नऊ थर रचले. जय जवान गोविंदा पथक स्वतःचा विक्रम मोडून दहाव्या थरापर्यंत मजल मारू शकेल, अशी शक्यता वाटत होती. मुंबई-ठाण्यात दहीहंडींमुळे सर्वत्र वाहनांची चांगलीच कोंडी जालेली दिसत होते. मुख्य चौकांमधील वाहतूक पर्यायी मार्गांनी वळवण्यात आली होती. तसेच बेस्ट, परिवहन बसेसच्या मार्गांमध्येही बदल करण्यात आले होते. गोविंदा पथकांच्या वाहनांना शहरातील अंतर्गत रस्त्यांवर बंदी घालण्यात आली असली तरी या पथकांनी त्यांची वाहने पूर्व द्रुतगती महामार्गाच्या सेवा रस्त्यांवर उभी केली होती. दहीहंडी उत्सवामुळे मुख्य चौक आणि रस्ते बंद करण्यात आले होते. त्यातच गोविंदाचे ट्रक, टेम्पो, कार व दुचाकींमुळे शहरांतील रस्ते, महामार्गावर सायंकाळी उशिरापर्यंत मोठी कोंडी झाली होती. त्याचा त्रास सामान्यजनांना झाला हे निश्चित. एकूणच सण, उत्सवांमधील प्राणावर बेततील अशा घटना घडू नयेत, याची सर्वतोपरी काळजी घेतली किंवा बिभत्सपणा टाळला, तर हे उत्सव सामाजिक एकोपा टिकविण्यास खूपच मदतकारक ठरतील. त्यातून समाजमनाचा विकास घडून येईल, ही बाब महत्त्वाची.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment