दृष्टिक्षेप: अनघा निकम-मगदूम
पाऊस सध्या गायब झाला आहे. कधी नव्हे तर ऑगस्ट महिन्यात चक्क मार्च महिन्यासारखा उकाडा बहुतांश ठिकाणी अनुभवला जात आहे. त्यामुळे जरी परिस्थिती हैराण करणारी असली तरीही सध्या संपूर्ण महाराष्ट्रात एका गोष्टीची जास्त चर्चा आहे ती म्हणजे मंगळगौर खेळाची. तसं म्हटलं तर हा खेळ जुना, विशेषतः कोकणातला आणि परंपरेने चालत आलेला पण ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट काय आला आणि या खेळाला ग्लोबल रूप प्राप्त झालं. यंदा तर अनेक ठिकाणी मंगळागौर स्पेशल इव्हेन्ट आयोजित केले जात असून त्यानिमित्ताने महिला आनंदाने, सजून नटून बाहेर पडत आहेत. यानिमित्ताने परंपरेला उजाळा दिला आहे.
खरं तर मंगळागौर या खेळाला मोठी परंपरा आहे, त्याची एक पद्धत आहे. ती शिव पार्वतीची नववधूने करायची पूजा आहे. पण संपूर्ण परंपरा या इव्हेन्टमध्ये जपली जातं नसली तरीही त्यानिमित्ताने महिला एकत्र येतात, ही मोठी गोष्ट आहे.
मंगळागौरबद्दल बोलायचं, तर श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित स्त्रीने पहिली पाच वर्षे पूजण्याचा हा सण असतो. यात शिव आणि गणपतीसह गौरीची पूजा लग्नाला पाच वर्षे पूर्ण होईपर्यंत प्रत्येक श्रावणातील मंगळावारी मंगळागौरीची पूजा करण्यात येते. नवविवाहित आणि सौभाग्यवती महिलांना बोलावून हा सण एकत्रितपणे साजरा करण्यात येतो आणि पूजा झाल्यावर रात्री जागरण करण्यात येते.
ही पूजा करताना सुवासिनी पारंपरिक पोशाख म्हणजेच साडी किंवा नऊवारी नेसून या व्रताचा पूजा विधी करतात. वेगवेगळ्या झाडांच्या पत्री (पाने) व फुले या पूजेत वापरली जातात. ही झाडे औषधीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची म्हणून आयुर्वेदात मानली गेली आहेत. अर्जुनसादडा, आघाडा, कण्हेर, चमेली, जाई, डाळिंब, डोरली, तुळस, दुर्वा, धोत्रा, बेल, बोर, माका, मोगरा, रुई, विष्णूक्रांता, शमी, शेवंती वगैरे झाडांची पाने या कामाला येतात. पूजा करतांना १६ प्रकारच्या पत्र देवीला अर्पण केल्या जातात. पहिल्या वर्षी तिच्या माहेरी हे व्रत करण्याची प्रथा आहे. हे व्रत विशेषकरून महाराष्ट्रीय ब्राह्मण स्त्री वर्गात आचरले जाते. बरोबरीच्या विवाहित मैत्रिणी एकत्र जमून मंगळागौर रात्रभर जागवितात. सध्या पूजेबद्दल जास्त बोललं जात नाही. पण जागरणाला जे खेळ खेळले जातात. त्याचं मोठं अप्रूप सर्वांनाच आहे. कारण तो महिलांच्या शारीरिक क्षमतेचा कस लावणारा प्रकार आहे. मंगळागौरीमध्ये निरनिराळे खेळ, फुगडी, गाणी, उखाणे इत्यादींनी मजेत रात्र घालवितात व दुसरे दिवशी पहाटे पूजा-आरती करून या व्रताचे उद्यापन करतात.
जागरणाच्या वेळी, विविध खेळ खेळण्याचा प्रघात आहे. खेळांमध्ये परंपरागत चालत आलेली गाणीही म्हणतात – लाट्या बाई लाट्या सारंगी लाट्या, अठूडं केलं गठूडं केलं आदी गाणे म्हणण्यात येतात. वटवाघूळ फुगडी, बस फुगडी, तवा फुगडी, फिंगरी फुगडी, वाकडी फुगडी, आगोटापागोटा, साळुंकी, गाठोडे, लाटा बाई लाटा, घोडा हाट, करवंटी झिम्मा, टिपऱ्या, गोफ, सासू-सून भांडण, अडवळ घुम पडवळ घुम, सवतीचे भांडण, दिंड, घोडा इत्यादी असे साधारणतः ११० प्रकारचे खेळ यात खेळले जातात. यात सुमारे २१ प्रकारच्या फुगड्या, ६ प्रकार आगोटा पागोट्याचे असतात. या सर्व खेळ प्रकारांमुळे शरीराच्या विविध अवयवांना व्यायाम होतो, हा हे खेळ खेळण्याचा मुख्य उपयोग सांगता येईल. पूर्वीच्या काळी केवळ घरातील कामे करणाऱ्या महिलांना या खेळातून आनंदही मिळे. हे खेळ खेळताना महिला त्या जोडीने गाणीही म्हणतात.
आता महिलांना पूर्वीसारखी बंधने अजिबात नाहीत. त्या बाहेर पडू शकतात, नोकरी-व्यवसाय करू शकतात. मित्र मैत्रिणी जमवू शकतात. पूर्वी सणवार हेच महिलांसाठी भेटीगाठीचे, संवाद साधण्याचे क्षण होते. तेव्हा त्याचं अप्रूप अधिक होतं. पण म्हणून नव्या काळात या प्रथा परंपराचं महत्त्व अजिबात कमी होतं नाही. उलट महिला जितक्या ग्लोबली विचार करू लागल्या, वागू लागल्या, स्पर्धांना समोऱ्या जाऊ लागल्या तितका त्यांच्याभोवतीचा कोष वाढू लागला आहे. अशा वेळी अशा परंपरा नव्या रूपात आणि नव्या थाटात जर पुन्हा नव्याने सुरू होतं असतील, तर नक्कीच महिलांसाठी ती आनंदाची गोष्ट आहे. यातूनच महिलांना ऊर्जा मिळते, आनंद मिळतो, उत्साह मिळत असतो. त्यातूनच त्यांचं बाईपण सोपं होऊन जातं, त्यांचं आयुष्य सुसह्य होऊन जातं.