Sunday, July 14, 2024
Homeसाप्ताहिककोलाजSparrow chick : चिऊताईचं बाळ

Sparrow chick : चिऊताईचं बाळ

  • कथा : रमेश तांबे

एक होती चिमणी. ती तिच्या बाळासह एका सुंदर घरट्यात राहायची. एक दिवस काय झालं, बराच वेळ झाला तरी चिऊताईचं बाळ उठलंच नाही. मग तिने आपल्या घरट्यात डोकावून बघितलं, तर बाळ झोपलेलंच होतं. बाळाच्या अंगावरून हळुवारपणे आपले पंख फिरवत बाळाला म्हणाली, “काय रे, काय झालं? अजून का झोपलास, बरं नाही वाटत का?” तसे अळोखे-पिळोखे देत चिऊताईचं बाळ म्हणालं, “आई गं माझं ना डोकं खूपच दुखतंय. आई गं माझ्या पोटात ना आज खूपच दुखतंय अन् आई गं माझी मान आणि डोळे पण दुखतात आणि मला ना कसंतरीच होतंय बघ! मला औषध दे ना काहीतरी.” मग चिमणी बाहेर गेली अन् दोन-चार पानं खुडून आणली एका झाडाची आणि म्हणाली, “बाळा हा घे औषधी पाला, थोडासा कडू आहे पण खा, बरं वाटेल तुला.” मग तोंड वेडंवाकडं करत बाळाने ती दोन्ही पानं संपवली. घोटभर पाणी प्यायले आणि झोपून राहिले.

दुपार झाली तरी चिऊताईचे बाळ काही उठले नाही. मग मात्र चिऊताईला काळजी वाटू लागली. काय बरं झालं असेल आपल्या बाळाला? त्याला डॉक्टरांकडे न्यायलाच हवे. कुठे बरं जावं? मग तिला आठवलं आपल्या जवळच राहतात डॉक्टर कावळे, त्यांना तरी विचारून येऊ. मग डॉ. कावळ्यांकडे चिऊताई गेली. चिमणी त्यांना म्हणाली, “डॉ. कावळे, माझ्या बाळाला बरं नाही वाटत.” डॉक्टर म्हणाले, “काय झालं सांगा.” “अहो त्याचं डोकं, मान, पोट, डोळे दुखतात आणि त्याला कसंतरीच होतंय.” “असं होय पण एवढ्या सगळ्या आजारांवर माझ्याकडे नाही बाबा औषध! तुम्ही असं करा, तुम्ही डॉक्टर पोपटरावांकडे जा तेच बघतील काहीतरी!” मग चिमणी गेली डॉक्टर पोपटरावांच्या दवाखान्यात. एवढ्या आजारांची नावे ऐकून डॉ. पोपटराव पण म्हणाले, “चिऊताई तू त्या डॉ. हरीणताईंकडे जा बरं!” मग चिऊताई गेली डॉ. हरिणताईंकडे. पण बाळाचं नाव ऐकताच डॉ. हरीणताई म्हणाली, “मी छोट्या मुलांना देत नाही औषध. तुम्ही असं करा डॉ. हत्तींकडे जा तेच तुम्हाला मदत करतील.”

मग डॉ. हत्तींच्या दवाखान्यात चिऊताई शिरली. डॉ. हत्ती तेव्हा जिराफाला तपासत होते. मग डॉ. हत्तीने चिमणीकडे पाहिलं आणि म्हणाले, “काय चिऊताई, काय झालं?” चिमणी म्हणाली, “अहो माझं बाळ आजारी आहे म्हणून मी आले आहे.” बरं काय झालं तुमच्या बाळाला? “अहो, त्याचं डोकं, मान, डोळे अन् पोटसुद्धा दुखते आणि त्याला कसंतरीच होतंय!”

डॉक्टर हत्ती म्हणाले, “काय गं चिऊताई तुझ्या बाळाला कसंतरी होतंय ना! माझ्याकडे औषध आहे बरं का! पण मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर दे बरं! बाळ सकाळी किती वाजता उठतं. काय काय करते ते सर्व सांग.” चिऊताई म्हणाली, “हे बघा डाॅक्टर बाळ सकाळी १० वाजता उठतं आणि नंतर मोबाइल बघतं. नंतर अंघोळीला जातं. अंघोळीला जातानासुद्धा मोबाइल बरोबर घेऊन जातं. मोबाइल बघत बघत नाष्टा करतं. जेवतानासुद्धा मोबाइल लागतो त्याला! मग कार्टून बघतं. स्वतःचे, इतरांचे फोटो काढतं, ते मित्र-मैत्रिणींना पाठवतं, रात्री मोबाइल बघायचा म्हणून खूप उशिरा झोपतं. असं सगळं ते करत असतं. मी किती त्याला सांगते, अरे बघू नको मोबाइल तुझे डोळे दुखतील. अरे बघू नको तुझं डोकं दुखेल, अरे नीट जेव नाहीतर तुझं पोट दुखेल. जास्त बघत बसशील तर तुझी मान दुखेल पण ते ऐकतच नाही. आता पडले आजारी! पण त्याला कोणच औषध देत नाही. मी सगळ्यांकडे जाऊन आले!
डॉक्टर हत्ती हसले आणि म्हणाले, “चिऊताई घाबरू नकोस. मी सांगतो त्या गोळ्या दे आणि एक काम कर. सगळ्यात पहिलं त्याच्या जवळचा तो मोबाइल काढून घे बरं. १० दिवस त्याला मोबाइल देऊ नकोस. आणि या गोळ्या दे. या आहेत खडीसाखरेच्या गोळ्या गोड गोड. याचा औषधाशी काही संबंध नाही बरं का! तुझ्या बाळाला काही झालं नाही. झालाय तो मोबाइलचा आजार! मोबाइल जास्त वेळ बघितल्याने डोळे दुखतात, मान दुखते. खूप हलणारी चित्रं बघितली की डोकंही दुखतं आणि मोबाइल बघताना नीट जेवत नाही म्हणून पोटही दुखतं आणि या सगळ्यामुळे त्याला कसंतरीच होतंय. आलं का लक्षात तुझ्या? चिमणीला आता पटलं म्हणाली, “खरंच उत्तर माझ्याकडेच होतं पण मीच त्याला बोलले नाही की मोबाइल दे म्हणून!”

चिमणी आली घरी तेव्हा बाळ झोपलं होतं. चिमणीने बाळाला औषध दिलं आणि म्हणाली, “डॉक्टर म्हणाले तुला मोबाइलचा आजार झाला आहे. उद्या डॉ. हत्ती तुला भेटायला येणार आहेत. तुझा मोबाइल माझ्याकडे देऊन टाक!” डॉक्टर हत्तींचे नाव ऐकताच घाबरून बाळाने मोबाइल देऊन टाकला. दोनच दिवसांत चिऊताईचे बाळ बरे झाले आणि मित्रांबरोबर हसत हसत खेळायला गेले!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -