
दादर येथील महादेवाच्या मंदिरात साजरी झाली नागपंचमी... पाहा खास व्हिडीओ
मुंबई : श्रावण महिना (Shrawan Month) म्हणजे सणांची रेलचेल. नागपंचमी (Nagpanchami) हा त्यापैकीच एक सण. नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे. या दिवशी घरोघरी नाग देवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे. वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. काही ठिकाणी मातीचा नाग आणून किंवा नागाच्या छायाचित्राची पूजा करतात, तर काही ठिकाणी वारूळाची पूजादेखील केली जाते.
आजच्या या नागपंचमीच्या सणादिवशी विशेषत: गव्हाची खीर आणि चण्याची डाळ, गूळ यांपासून बनवलेल्या उकडीची पुरणाची दिंड तयार केली जाते. नागदेवताची पूजा करून त्याला दूध, साखर, उकडीची पुरणाची दिंड करून नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी काही कापणे किंवा चिरणे वर्ज्य मानले जाते. मुंबईसारख्या ठिकाणी बायका महादेवाच्या मंदिरात जाऊन नागाच्या प्रतिमेची अथवा मूर्तीची पूजा करतात.
आज दादरच्या शिवकृपा येथील महादेवाच्या मंदिरात महिलांनी नागाची व शंकराच्या पिंडीची पूजा केली. नागाला दुधाचा अभिषेक घालण्यात आला. या पूजेची काही खास दृश्ये टिपली आहेत आमचे छायाचित्रकार अरुण पाटील यांनी...