भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) चे अध्यक्ष असलेल्या जय शहा यांनी भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांची मियामीमध्ये अचानक भेट घेतली. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट संघ मियामी मधील एका हॉटेलमध्ये थांबला असतानाच वैयक्तिक कामाच्या निमित्ताने परदेशात गेलेल्या जय शहा यांनी राहुल द्रविड यांना अचानकपणे भेटण्यासाठी बोलावले. दोघांमध्ये जवळपास दोन तास चर्चा झाल्याची वार्ता यातून पुढे आली आहे. ज्यामध्ये, येत्या काळात क्रिकेटच्या विश्वातील दोन महत्त्वपूर्ण सामने असलेल्या आशिया चषक आणि विश्वचषक या सामन्यांबद्दल संघाची भूमिका आणि एकंदरच त्यासाठीची रणनीती यावर चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या काही वर्षातील भारतीय क्रिकेट संघाची आयसीसीसीमधील निराशाजनक कामगिरी आणि भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी-२० मालिकेतील अपयश पाहता भारतीय क्रिकेट संघावर चहूबाजूंनी टीका होत असतानाच, जय शहा आणि राहुल द्रविड यांच्यातील भेटीमुळे सध्या क्रिकेट विश्वात चर्चांना उधाण आले आहे.