शरद पोंक्षे यांची घोषणा
मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) हे त्यांच्या कट्टर हिंदुत्ववादी भूमिकेमुळे कायम चर्चेत असतात. ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ (Mi Nathuram Godse boltoy) या नाटकामुळेही त्यांना अनेक टीकांना सामोरे जावे लागले. मात्र बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे ते या नाटकाचे ५००च्या वर प्रयोग करु शकले. काही काळापूर्वी ते आजारपणानंतर ‘हिमालयाची सावली’ या नाटकातून पुन्हा रंगभूमीवर आले होते. यानंतर ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक तब्बल साडेपाच वर्षांनी ते पुन्हा रंगभूमीवर आणणार आहेत. आजच्या स्वातंत्र्यदिनी (Independence Day) सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी ही घोषणा केली आहे.
शरद पोंक्षे यांनी ११ मार्च २०१८ ला ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाचा शेवटचा प्रयोग केला होता. यानंतर त्यांनी पुन्हा हे नाटक न करण्याचा निश्चय केला होता. त्यामुळे साडेपाच वर्षे या नाटकाचा प्रयोग होऊ शकला नाही. मात्र लोकांच्या विनंतीनुसार हे नाटक पुन्हा आणण्याचं पोंक्षे यांनी ठरवलं आहे. या नाटकाचं दिग्दर्शन दिवंगत अभिनेते व दिग्दर्शक विनय आपटे यांनी केलं होतं. हे नाटक पुन्हा येत असलं तरी केवळ ५० प्रयोगांपुरतं मर्यादित राहणार आहे.
शरद पोंक्षे म्हणतात…
या नाटकात नथुराम गोडसेंची भूमिका साकारणारे शरद पोंक्षे यांनी पोस्टद्वारे स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत म्हटलं आहे की, मी तुम्हाला आज एक अतिशय आनंदाची बातमी देणार आहे. मी ११ मार्च २०१८ ला ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाचा शेवटचा प्रयोग केला. त्यानंतर जाहीर केलं की मी यापुढे रंगभूमीवर नथुरामच्या भूमिकेत कधीही दिसणार नाही. मी त्या शब्दाशी प्रामाणिक राहिलो. गेली साडेपाच वर्षे मी हे नाटक केलं नाही. पण गेली पाच वर्ष महाराष्ट्रात व्याख्यानाच्या निमित्ताने फिरत असताना अनेकांनी मला या नाटकाचे प्रयोग करा, असे सांगितले. आमच्या पुढच्या पिढ्यांना हे नाटक पाहायचं आहे, थोडे तरी प्रयोग करा, असे वारंवार लोक मला सांगत होते.
View this post on Instagram
शरद पोंक्षे पुढे म्हणतात, त्यानंतर मग मी विचार केला की, एकंदरीत माझं वय आणि नथुराम गोडसेचं वय लक्षात घेता आता जर मी हे नाटक केलं नाही तर अजून चार-पाच वर्षांनी मला ते करता येणार नाही. त्यामुळेच मग फक्त ५० प्रयोगांसाठी ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक करण्याचा निर्णय घेतलाय. ऑक्टोबर २०२३ मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मी या नाटकाचे प्रयोग करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra