Tuesday, December 10, 2024
Homeताज्या घडामोडीRashtravadi whip : लोकसभेत राष्ट्रवादीच्या दोन गटांचे परस्परविरोधी व्हीप जारी

Rashtravadi whip : लोकसभेत राष्ट्रवादीच्या दोन गटांचे परस्परविरोधी व्हीप जारी

कोणाला मिळणार मान्यता?

नवी दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह यांची मागणी करणारे पत्र निवडणूक आयोगाला पाठवल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून राष्ट्रवादीत कुठलीही फूट नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तसेच अजित पवारांच्या याचिकेमुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत, हे सिद्ध होत नाही असं शरद पवार गटाकडून सांगण्यात आलं. मात्र त्यांनतर दोनच दिवसांनी लोकसभेत विरोधकांकडून मोदी सरकारविरुद्ध काढण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या नेत्यांनी आपापला परस्परविरोधी व्हीप जाहीर केला आहे, त्यामुळे राष्ट्रवादीत ही उभी फूटच पडल्याचे दिसून येत आहे.

लोकसभेत अविश्वास ठरावावर (No confiedence Motion) चर्चा सुरु असून आज चर्चेचा शेवटचा दिवस आहे. आज मतदान होऊन निकालही लागणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून व्हीप जाहीर करण्यात आल्याने त्यांच्यातील फुटीचे चित्र पुन्हा एकदा वर आले आहे. अजित पवार गटाकडून खासदार सुनिल तटकरे यांनी तर शरद पवार यांच्या गटाकडून मोहम्मद फैजल यांनी व्हीप जारी केला आहे.

शरद पवार यांच्या गटाकडून खासदार मोहम्मद फैजल यांनी व्हीप बजावला आहे. शरद पवार यांच्या गटात लोकसभेत सप्रिया सुळे, अमोल कोल्हे, श्रीनिवास पाटील, मोहम्मद फैजल हे सदस्य आहेत. या व्हीपमध्ये मोदी सरकार विरोधात मतदान करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर अजित पवार यांच्या गटात सुनिल तटकरे हे एकच सदस्य आहेत. तटकरे यांनी काढलेल्या व्हीपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने मतदान करण्याची सूचना देण्यात आली आहे. आता लोकसभा अध्यक्ष कोणत्या गटाचा व्हीप अधिकृत असल्याची मान्यता देतात यावर सर्व अवलंबून आहे. मात्र हे दोन गट एकमेकांच्या विरोधात असल्याचे दिसत आहे.

फूट पडल्याचे कोणतेही पुरावे नाहीत

शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, अजित पवारांच्या याचिकेतून राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. राष्ट्रवादीत कुठला वाद आहे हे सिद्ध करण्यास ते प्राथमिकदृष्ट्या सक्षम नाहीत. प्रथम दर्शनी निवडणूक आयोगानेही राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षात आणि अजित पवार गटात वाद असल्याचे सिद्ध केले नाही. १ जुलै २०२३ च्या आधी अजित पवारांनी शरद पवारांविरोधात कुठली तक्रार दिली नव्हती. राष्ट्रवादीच्या कुठल्याही बैठकीत त्यांनी पवारांना विरोध केला नव्हता. मात्र, आता दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात व्हीप काढल्यामुळे लढाई तीव्र होण्याची शक्यता आहे. मतदानावेळी परिस्थिती स्पष्ट होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -