Monday, July 15, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलInside the spacecraft : यानातील वातावरण

Inside the spacecraft : यानातील वातावरण

  • कथा : प्रा. देवबा पाटील

अवकाशयानात काही बाबतीत जवळपास पृथ्वीवरील वातावरणासारखेच वातावरण ठेवलेले असते. अवकाशयानातील वातावरणात ऑक्सिजन, नायट्रोजन व कार्बन डायऑक्साईड यांचे योग्य प्रमाणात मिश्रण असते.

दीपा व संदीप हे दोघे भाऊ-बहीण यक्षाच्या यानातून अंतराळ प्रवासाचा आनंद घेत असताना यक्षाला अनेक प्रश्न विचारत होते. यक्षही आनंदाने त्यांना सारी माहिती देत होता. “अवकाशयानात वातावरण कसे असते?” संदीपने शंका काढली.

यक्ष म्हणाला, “अवकाश यानातील वातावरण हे यानामध्ये अवकाशवीरांना सुखरूप होईल असेच राखलेले असते. अवकाशयानात तंतोतंत तर नाही. पण काही बाबतीत जवळपास पृथ्वीवरील वातावरणासारखेच वातावरण ठेवलेले असते. अवकाशयानातील वातावरणात ऑक्सिजन, नायट्रोजन व कार्बन डायऑक्साईड यांचे योग्य प्रमाणात मिश्रण असते. यानातील वातावरणाचा दाब नि यानाचे तापमान हेसुद्धा सुयोग्य व प्रमाणशीरच असावे लागते.”

“अंतराळवीरांना अवकाशयानात ही वजनरहित अवस्था कशी काय येते? ते आपणास टीव्हीवर बघताना यानात तरंगताना का दिसतात?” दीपाने प्रश्न केले.

यक्ष सांगू लागला, “वजनरहित अवस्था म्हणजे वजनशून्य होणे नव्हे. आपणास जमिनीवर असताना वजनरहितता जाणवत नाही त्याचे कारण असे की, आपण जमिनीच्या संपर्कात असल्याने आपणावर जमिनीचे संपर्कबल कार्य करीत असते. हे संपर्कबल पृथ्वीच्या गुरुत्वबलाला विरोध करीत असते नि ते आपणाला वर ढकलत असते. म्हणून जमिनीवर आपणास सतत वजनाची जाणीव होत राहते. ज्यावेळी अवकाशयात्री हे अवकाश यानात असतात त्यावेळी ते वजनरहित म्हणजे भाररहित अवस्थेत असतात. अवकाशयान हे अवकाशात प्रवास करताना किंवा त्याच्या कक्षेत फिरताना पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण हे अंतरिक्षवीरावर कार्य करत नसून ते केवळ अंतराळयानावर कार्य करीत असते. अंतराळयान हेसुद्धा विरुद्ध दिशेने त्याच परिणामाचे बल कार्यान्वित करते. या विरोधी बलाने गुरुत्वाकर्षणाचे बल संतुलित होते. त्यामुळे गुरुत्वबलाचा परिणाम शून्य होतो व त्या आतील अंतराळवीरास वजनविरहितता भासते व तो अवकाशयानात तरंगतांना दिसतो. म्हणूनच तुम्ही टीव्हीवर त्यांना यानात तरंगतांना पाहतात.” “अंतराळवीरांचा पोषाख विशिष्ट का असतो?” संदीपने पुन्हा विचारले.

“अवकाशात जाण्यासाठी ते साध्या कपड्यांत जात नाहीत, तर त्यांच्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा पोषाख असतो. त्याला अवकाश पोषाख म्हणजेच स्पेस सूट म्हणतात. हा पोषाख एका विशिष्ट प्रकारच्या कृत्रिम तंतूपासून अतिशय काळजीपूर्वक बनवतात. त्यावर कितीही प्रखर उष्णतेचा वा कडक थंडीचा परिणाम होत नाही. त्याला जोडून एक टोपीही असते. या स्पेस सूटमध्ये मानवाला आवश्यक असलेले पृथ्वीसारखे तापमान, आर्द्रता, वातावरण, हवेचा दाब या सा­या गोष्टी कृत्रिमरीत्या निर्माण केलेल्या असतात. विशिष्ट दाबाखाली ऑक्सिजन असतो. इतर सा­ऱ्या सुविधाही त्यात असतात. अंतराळवीराची पूर्ण सुरक्षा व्हावी, अशी योजनाही त्यात केलेली असते. अशा सर्व साधनसामग्री व सुविधांसह अंतराळवीर अवकाशयानात जात असतो,” यक्षाने सांगितले. “शास्त्रज्ञ अंतराळात किती काळ राहू शकतात?” दीपाने माहिती विचारली. यक्ष म्हणाला, “अंतराळयानात जरी सुरक्षित वातावरण केलेले असते तरी शास्त्रज्ञ तेथे जास्त काळ राहू शकत नाही. कारण आपल्या शरीराच्या सा­ऱ्या क्रियांवर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव असतो. आपले रक्ताभिसरण, पचन गुरुत्वाकर्षणावरच अवलंबून असते. ठरावीक मर्यादेपेक्षा जास्त काळ अंतराळात राहिल्याने हृदयाचे ठोके अनियमित होतात. पचन बिघडते, मलमूत्र विसर्जनची परिस्थिती बदलते. स्नायू कमकुवत होतात. हाडांचाही ­ऱ्हास होतो. मेंदूवरही परिणाम होतो. मानसिक तणावही वाढतात. स्मरणशक्तीही कमी होते. आकलनशक्ती मंदावते. थोडक्यात म्हणजे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडते. म्हणून अंतराळात शास्त्रज्ञ अतिशय मर्यादित काळासाठीच राहतात. पण दररोजच्या नवनवीन तंत्रप्रणालीच्या शोधांच्या उपयोगाने हा कालावधी दिवसेंदिवस थोडा थोडा वाढत आहे.” अशा प्रकारे ते आपले ज्ञानार्जनाचे कार्यही उत्तम प्रकारे पार पाडीत होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -