
खड्डेमुक्त महामार्गासाठी मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे पाऊल
ठाणे : राज्यभरात पावसामुळे होणारी वाहतूक कोंडी (Traffic jam) आणि रस्त्यांवरील खड्ड्यांचा (Potholes) प्रश्न विरोधकांकडून उचलून धरला जात आहे. अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे अनेक दुर्घटना होत आहेत. याबाबत मुंबई-गोवा, वसई-पालघर-अहमदाबाद या महामार्गांसोबतच मुंबई–नाशिक महामार्गाच्या कामाला गती द्या, वाडा-भिवंडी रस्ता खड्डे मुक्त करा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कालच्या मंत्रालयात झालेल्या बैठकीत निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांनी आज स्वतः ठाणे ते खारेगाव तसेच ठाणे- नाशिक महामार्गाच्या (Thane Nashik Highway) परिस्थितीची त्या ठिकाणी जात पाहणी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्ता दुरुस्तीबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. ज्या ठिकाणी खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी होत आहे अशा सगळ्या ठिकाणचे खड्डे तात्काळ बुजविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. काही अनावश्यक क्रॉसिंगवर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत, यामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होईल असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह, पोलीस उपायुक्त (वाहतूक) विनयकुमार राठोड यांचेसह भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
वाहतूक नियंत्रणासाठी शंभर ते दीडशे पोलिस आणि ट्रॉफिक वॉर्डन
रस्त्यावर पडलले खड्डे डांबराने बुजवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्याचे काम मुंबईकडून सुरू झालं आहे. तसेच पूर्ण रस्ता खड्डेमुक्त करण्यात येईल आणि त्यासाठी काम सुरू झालं आहे. जिथे शक्य आहे तिथे रस्ता दुरुस्ती करून अतिरिक्त मार्गिका सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सांगितले. महामार्गावरील वाहतुक सुरळीत राहावी यासाठी शंभर ते दीडशे पोलिस आणि ट्रॉफिक वॉर्डन उपलब्ध करून दिले आहेत, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी विशिष्ट वेळ ठरवून द्यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी वाहतूक पोलीस विभागाला दिल्या.
जनतेला होणारा त्रास तात्काळ दूर करा
ठाण्याकडून भिवंडीकडे जाताना मुंबई महापालिकेच्या जलवाहिनी मार्गावरील सर्व खड्डे बुजवून हा मार्ग गर्दीच्या वेळी वापरण्याच्या सूचना देखील दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. रांजनोली पुलाखालून अवजड वाहनांना गाड्या फिरवून घेता याव्यात यासाठी अतिरिक्त जागा तयार करण्याचे निर्देश दिले. तसेच कोणते काम कुणाच्या अखत्यारित आहे याचा विचार न करता जनतेला होणारा त्रास तात्काळ दूर करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशाही सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.