
गावाकडे जाणारा रस्ताच खचला...
रत्नागिरी : मुसळधार पावसाने (Heavy rainfall) राज्यात अनेक ठिकाणी हाहाकार माजवला असून आतापर्यंत मोठं नुकसान झालं आहे. इर्शाळवाडीत दरड कोसळल्याने (Irshalwadi Landslide) अख्खं गाव उद्ध्वस्त झालं. या घटनेनंतर पावसाच्या जोरामुळे भूस्खलनाच्या व दरडी कोसळण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. कोकणात पावसाने चांगलाच जोर धरला असून रत्नागिरी जिल्ह्यातदेखील भूस्खलनाची (Ratnagiri Landslide) घटना घडली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवरुख कोंढरण या भागात गुरुवारी २७ जुलैला दुपारी ३ च्या सुमारास भूस्खलन झाले आहे. जमिनीला आणि इथल्या काही घरांनादेखील भेगा पडल्या आहेत. एका घरावर दरड कोसळली आहे. जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अमृता साबळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. कोंढरण गावातील ५० घरांतील ८० रहिवाशांचं तुळसणी हायस्कूलमध्ये तात्पुरतं स्थलांतर करण्यात आलं आहे.
घरांचे झाले नुकसान
कोंढरण येथील सचिन केशव शिंदे यांच्या घराशेजारी पाण्याच्या धारा लागल्या असुन मोठी भेग पडली आहे व त्या घराला धोका आहे. तर विनीत रामचंद्र शिंदे यांचे इंदिरा आवास योजनेतील घर पूर्णपणे दरडी खाली गेले आहे. विनित शिंदे यांनी हे घर नुकतेच बांधून पूर्ण केले होते. मात्र त्या घरात कोणी राहत नसल्यामुळे ते व त्यांचे कुटुंब या घटनेतून वाचले आहेत. दरड कोसळल्याची घटना समजताच तहसीलदार अमृता साबळे, मंडळ अधिकारी डि. के. फुलोरे, तलाठी एम. एल. जादगार, देवरुख पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, माजी आमदार सुभाष बने यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
गावाकडे जाणारा रस्ता खचला
पावसामुळे कोंढरण एस टी स्टॉप पासुन ५००मीटर पर्यंत रस्ता देखील खचला आहे. ठिकठिकाणी भेगा पडत आहेत. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर आणखी प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे. आज पासुन गावात जाण्यासाठी मज्जाव केला आहे तर दुसरीकडे या गावात जाणारा डांबरी रस्ताच भूस्खलनामुळे खचला आहे. सध्या कोंढरण गावातील नागरिक तुळसणी हायस्कूलच्या ठिकाणी थांबले असून ते पावसाचा जोर कमी होण्याच्या प्रतिक्षेत आहेत तर काही कुटुंबे आपल्या नातेवाईकांकडे अन्य गावी स्थलांतरीत होत आहेत.