
यंदाचा अधिक लय भारी; अधिक मासातील आज पहिला सोमवार
मुंबई : एखादा विशिष्ट महिना अधिकमास आला की १९ वर्षांनंतर तोच महिना अधिकमास म्हणून येतो. यंदाच्या वर्षी १९ वर्षांनंतरचा हाच दुर्मीळ योग आला आहे. त्यामुळे अधिक मासाला 'अधिक' महत्त्व प्राप्त झाले आहे.
शिवाय या वर्षी अधिक महिना असल्याने श्रावण (Shrawan) महिन्यात चार ऐवजी ८ श्रावणी सोमवारचे व्रत केले जाणार आहेत. सोमवार २४ जुलै रोजी अधिक मासातील पहिला सोमवार आहे.
अधिक मासचा पहिला सोमवार हा विशेष मानला जातो. या दिवशी उपवास करून भोलेनाथाची पूजा-अर्चा केल्यास त्यांचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात, असे मानले जाते.

सूर्याधारित पंचांग पाळणाऱ्या आसाम, ओरिसा, केरळ, तमिळनाडु, पश्चिम बंगाल या राज्यांत अधिक महिना नसतो. तो फक्त चांद्र पंचांग वापरणाऱ्या आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशांसारख्या राज्यांत पाळला जातो. चैत्रापासून आश्विन महिन्यांपर्यंतचा कोणताही एक महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो. कारण या महिन्यांतच सूर्यांची गती मंद असते व त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला जास्त वेळ लागतो. क्वचित कार्तिक ते फाल्गुन महिन्यातही अधिक मास येतो. त्या वर्षी एकाच नावाचे दोन चांद्र महिने असतात, अगोदरचा अधिकमास आणि नंतर लगेच येणारा महिना हा निजमास.

शिवलिंगाची पूजा कशी करावी?
श्री शंकर देव हे त्रिमूर्तींपैकी एक आहेत. श्री शंकराची पूजा ही शिवलिंग आणि मूर्तीच्या रुपात केली जाते. शिवलिंगाची पूजा करताना अनेक गोष्टींचा वापर केला जातो. श्री शंकराची नियमित पूजा केल्यास दारिद्र्य दूर होते, आरोग्य नीट राहते, स्वभाव शांत राहतो, समाजातला मान सन्मान वाढतो आणि यश प्राप्ती होते.

शिव शंकराची पूजा करताना...
१) पाणी- शंकराला पाणी खूप आवडते. ओम नम: शिवाय हा मंत्र बोलताना हळूहळू शिवलिंगावर पाणी वाहिल्यास तुमचा स्वभाव शांत होतो.
२) केशर- पाण्याप्रमाणे शंकराला केशर ही तितकीच प्रिय आहे. दर सोमवारी शिवलिंगावर केशरचे दूध वाहिल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि लग्न लवकर होते.
३) साखर- महादेवाला अभिषेक करायचा झाल्यास शिवलिंगावर साखर वाहायची, असे केल्यास धन लाभ होतो.
४) दूध - शिवलिंगावर दूध वाहावे. त्याने आरोग्य नीट राहते आणि कोणतेच आजार होत नाहीत.
५) दही - पाणी, केशरप्रमाणे शंकराला दही देखील खूप आवडते. शंकराला दही वाहिल्यास जीवनात असलेले सर्व त्रास निघून जातात.
६) चंदन - शिवलिंगावर चंदन वाहिल्यास व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल दिसून येतात. तसेच समाजात देखील त्या व्यक्तिला मान सन्मान प्राप्त होतो.
७) मध - मध हे गोड असते. शिवलिंगावर मध वाहिल्यास व्यक्तीच्या वाणीत गोडवा निर्माण होतो.
८) गाईचे तूप - गाईच्या दूधापासून तयार केलेले तूप शंकरावर वाहावे. तूप वाहिल्यास जीवनात प्रगती होते.
९ ) भांग - शंकराला भांग खूप प्रिय आहे. शिवलिंगावर भांगचे लेप किंवा भांगाची पाने वाहू शकता. असे केल्यास जीवनातून नकारात्मकता आणि वाईट सावली निघून जाते.