
मंदिर समिती व पोलिसांविरोधात घोषणाबाजी
भाविकांना दर्शनासाठी विलंब नको म्हणून मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न
पंढरपूर : भाविकांना दर्शनासाठी अडचण नको (ashadi ekadashi) यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणताही लवाजमा सोबत न नेता अगदी साध्या पद्धतीने विठुरायाचे दर्शन घेतले. शासकीय पूजेच्या वेळी मुखदर्शन चालू ठेवण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. केवळ सहा ते सात मंत्र्यांच्या उपस्थितीत शासकीय पूजा पार पडली. त्यानंतर सत्कार कार्यक्रमात देखील मानपान न पाहता मुख्यमंत्र्यांनी थेट स्वतः भाषण करून कार्यक्रम अर्धा वेळेतच संपवला. मात्र, त्यानंतरही मंदिर समितीकडून दर्शनाचा वेग वाढवण्यात न आल्याने संतप्त वारक-यांनी विठ्ठल मंदिर समिती आणि बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली.
मुख्यमंत्र्यांच्या शासकीय महापूजेनंतर व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे दर्शन रांग गतीने पुढे सरकल असे अपेक्षित होते. असे असताना देखील दर्शन रांग पुढे सरकत नसल्याने भाविकांचा संताप वाढत गेला. यातच काही तरुणांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यातील काही भाविकांनी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांना याबाबत जाब विचारला. काही भाविकांनी मंदिर समितीच्या विरोधात घोषणाबाजीला सुरुवात केली. यानंतर पोलिसांनी प्रसंगावधान राखून सर्वांना शांत केले.