जळगाव: महाराष्ट्राच्या राजकारण एकीकडे गढुळ झालं असताना काही भावुक क्षण सर्वांनाच हळवं करतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सायंकाळी केलेली एक भावनिक पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. जळगाव दौऱ्यावर असताना एका दिव्यांग तरुणीने फडणवीसांच्या कपाळावर पायाने टिळा लावला. तसेच पायाच्याच बोटांत थाळी अडकवून त्यांचे औक्षणही केले. या प्रसंगामुळे फडणवीस चांगलेच भावूक झाले. त्यांनी या तरुणीला तिच्या प्रत्येक प्रसंगात साथ देण्याचे आश्वासन दिले.
देवेंद्र फडणवीस मंगळवारी जळगावच्या दौऱ्यावर होते. तिथे त्यांनी दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या दीपस्तंभ फाउंडेशनला भेट दिली. यावेळी एका दिव्यांग तरुणीने पायाने टिळा लावून त्यांचे स्वागत केले. या मुलीला दोन्ही हात नव्हते. त्यामुळे पायानेच तिने उपमुख्यमंत्र्यांचे औक्षण केले.
देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ ट्विट केला. त्यात ते म्हणाले – आजवर कितीतरी माता-भगिनींनी मला ओवाळलं. कपाळावर आशीर्वादाचा गंध लावला. आजही त्याच भावनेनं अंगठा कपाळाला टेकला पण तो पायाचा… हाताचा नव्हे. आयुष्यात असे हे क्षण येतात आणि आतून-बाहेरून मन थरारतं. अंगावर रोमांच उभे राहतात. डोळ्यांच्या कडा ओलावतात पण क्षणभरच.
कारण पायाच्या अंगठ्यानं टिळा लावणाऱ्या, त्याचं पायानं आरतीचं तबक ओवाळणाऱ्या, त्या दिव्यांग भगिनीच्या चेहऱ्यावर हास्य फुललेलं होतं. तिच्या नजरेतली चमक आणि धमक जणू नियतीला आव्हान देत म्हणत होती की “तू काय मला हरवणार? मला कोणाची सहानुभूती नको, दया नको. मी खंबीर आहे.”
ते पाहून मी इतकंच म्हणालो, “ताई, तू लढत राहा. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत.” या भगिनीकडून ऊर्जा आणि प्रेरणा घेताना कुसुमाग्रज आठवले – “अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!”स्वागतानंतर उपमुख्यमंत्र्यांनी मुलीचे हात जोडून आभार मानले.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…