मुंबई : अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या पावसाने अखेरीस मुंबईत हजेरी लावली. हवामान विभागाच्या (Weather Department) अंदाजानुसार २९ जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे. तसेच पुढील ४८ तासांत मुंबईत मान्सून (Monsoon) सक्रिय होण्याची शक्यता आहे. म्हणजेच २६ जून रोजी मान्सून मुंबईत दाखल होऊ शकेल. हा अंदाज खरा ठरल्यास आतापर्यंतचा मुंबईत सर्वात उशिरा दाखल होणारा मान्सून, अशी याची नोंद होईल. याआधी २०१९ मध्ये २५ जून रोजी मान्सून दाखल झाला होता. दरम्यान, कोकणसह पालघर, ठाणे, पुणे व पूर्व विदर्भातही मान्सूनचे आगमन झाले.
मुंबईत आज रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली. रात्री चांगला पाऊस झाल्यानंतर सकाळपासूनही मुंबईतील विविध भागात जोरदार पाऊस पाहायला मिळाला. अंधेरी, कुर्ला, दादर, वांद्रे, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, लालबाग, परळ, भायखळा, विलेपार्ले या परिसरात जोरदार पाऊस पडला. यामुळे मुंबईत मान्सून दाखल होण्याचे निकष आजच पूर्ण झाल्यास हवामान विभागाकडून मान्सून सक्रिय झाल्याची घोषणा होऊ शकेल.
याचबरोबर नवी मुंबईसह ठाणे परिसरात देखील पावसाने हजेरी लावली. कळवा आणि मुंब्र्यातही पावसाची संततधार सुरु होती. अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर भागातही पावसाने हजेरी लावली. कल्याण डोंबिवलीतही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. पुण्यातल्या काही भागात पावसाला सुरुवात झाली असून सिंहगड रोड, कात्रज, कोंडवा आणि कार्जेमध्ये रिमझिम पाऊस कोसळला. कोल्हापुरसह ग्रामीण भागातही पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी, रोडा, कणकवली, मालवण तालुक्यातही पाऊस पडला. आज सकाळी बुलढाणा शहरात धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली, यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.
पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून रिमझिम पाऊस सुरु आहे. पावसाने यंदा बऱ्याच विश्रांतीनंतर हजेरी लावल्याने जगाचा पोशिंदा शेतकरी आनंदला आहे. पाऊस सुरु झाल्याने पालघरमधील वातावरणात गारवा निर्माण झाला. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यात संपूर्ण राज्यात पावसाचं चित्र स्पष्ट होऊ शकेल.
रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांत काल दुपारपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आणि नंतर मुसळधार पाऊस पडायला लागला. कोकणात मान्सूनच्या आगमनाची तारीख साधारण ७ जून असते. मात्र ती बरीच पुढे गेल्याने शेतीची कामे काहीशी हलली आहेत.
विदर्भात गेले कित्येक दिवस अवकाळी पावसाने पछाडले होते. आज पूर्व विदर्भात मान्सूनचे आगमन झाले असून आज मान्सून विदर्भ व्यापण्याची शक्यता आहे. २५ जूनपर्यंत विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मात्र पश्चिम विदर्भात आणखी एक ते दोन दिवस मान्सूनची प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. पुढील ६० तासांत संपूर्ण विदर्भात मान्सून पोहोचण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा मान्सूनने व्यापला आहे. नागपूर, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यात काल पडलेल्या पावसामुळे कापूस लागवडीला वेग येण्याची शक्यता आहे. पाऊस उशिरा आल्याने लांबलेल्या पेरण्या उरकण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु होईल. तसेच पावसामुळे विदर्भाच्या बऱ्याच भागात खरीप पेरणीला गती मिळणार आहे.
विदर्भाच्या बऱ्याच भागात २५ ते २८ जूनदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज नागपूर हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं मान्सूनची वाटचाल जोरात सुरु आहे. राज्यात विदर्भासह कोकण आणि मुंबई परिसरात पावसानं चांगली हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना देखील काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम आहे.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…