लसीच्या राजकारणावरुन देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
कराड : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी (Narendra Modi) लस तयार केली, या वक्तव्यावर राजकारण तापल्याचे चित्र आहे. यावरुन देवेंद्र फडणवीस व उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात वार-पलटवार सुरु आहेत. आज कराड येथे झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरेंच्या टीकेवर देवेंद्र फडणवीसांनीदेखील जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘मोदींनी या देशामध्ये कोरोनोची लस (Corona vaccine) तयार केली, असं मी म्हटलं, तर उद्धवजींना ते फार झोंबलं. मग उद्धवजी रोज सांगायचे मी राज्य चालवतो तेव्हा ते काय घोडा हाकत होते की बैलबंडी?’ अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी तर म्हणेन होय मोदींनी लस तयार केली. त्याचं कारण असं की जगात पाच देश लस तयार करु शकले. त्यात मोदींच्या संबंधामुळे आपल्याला रॉ मटेरियल (Raw Material) मिळालं. मोदी यांनीच लस तयार केली, कारण जे शास्त्रज्ञ लस तयार करत होते त्यांच्याकडे जाऊन मोदीजींनी त्यांना १८०० कोटी रुपये दिले. त्यामुळे कोरोनाची लस तयार झाली. त्यानंतर मोदीजींनी भारतातील १४० कोटी लोकांना साडेसतरा कोटी मोफत लसी देण्याचे काम केले.
पुढे ते म्हणाले, कोरोनाची लस मोदींनी दिली नसती तर आपण इथं बसू शकलो असतो का? आपण अमेरिका आणि रशियापुढे कटोरा घेऊन उभे राहिलो असतो आणि आम्हाला लस द्या, आम्हाला लस द्या असं म्हटलं असतं. त्या देशांनी आपल्याला थांबा, आधी आमच्या लोकांना देतो, असं म्हटलं असतं. परिणामी आपल्या देशात प्रेतांचा खच पडला असता. पण या देशाला दूरदर्शी पंतप्रधान मिळाले. त्यांनी हिंमतीने कोरोनाचा सामना केला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.