मुंबई : महाराष्ट्रात रखडलेला मान्सून आता लवकरच वेग घेणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून (Current Weather) देण्यात आली आहे. मोसमी वाऱ्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी सध्या पोषक स्थिती निर्माण झाली आहे. अशात चक्रीवादळही पुढे सरकल्यामुळे मान्सूनचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे राज्यात पुढच्या ३ दिवसांमध्ये मान्सून दाखल होईल असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या मुंबई आणि नागपूर केंद्राने यासंबंधी माहिती दिली आहे. तर भारतीय हवामानशास्त्र पुणे विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनीही यासंबंधी ट्वीट केले आहे. त्यामध्ये त्यांनी लिहीले आहे की, ‘२३ जूनपासून कोकणातील काही भागांत, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर २४-२५ जूनपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, मराठवाडामधील काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.’
दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मराठवाडा व विदर्भात २२ ते २३ जूननंतर पावसाला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे २५ जूननंतर सर्वत्र चांगल्या पावसाला शक्यता आहे, असेही औंधकर यांनी सांगितले. खरंतर, पावसाच्या उशिरा दाखल होण्यामुळे पेरण्या खोंळबल्या आहेत. पण आता जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मान्सून सर्वत्र दाखल होईल.
इतकेच नाहीतर नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, बीड, सोलापूर, लातूर, नांदेड, जालना, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, वाशिम आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मात्र आज तीव्र उष्णतेच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागतील. या ठिकाणी आज हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराच्या बाहेर पडताना हवामान खात्याचा अंदाज जाणून घेतच घराबाहेर पडा अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.