
कोकण रेल्वे मार्गावर उद्या तीन तासांचा मेगाब्लॉक
जाणून घ्या वेळापत्रक...
रत्नागिरी : चाकरमान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय असणा-या कोकण रेल्वेच्या (Kokan Railway) देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी उद्या २१ जूनला रत्नागिरी (Ratnagiri) ते वैभववाडी (Vaibhavwadi) दरम्यान सकाळी ७:३० ते १०:३० या कालावधीत तीन तासांचा मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय कोकण रेल्वेकडून घेण्यात आला आहे. मालमत्तेच्या देखभालीच्या कामासाठी मेगाब्लॉक (Megablock) घेतला जाणार असल्याचं रेल्वे प्रशासनानं सांगितलं आहे.
मेगाब्लॉकमुळे गाडी क्र. ११००३ दादर - सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेस (Tutari Express), गाडी क्र. १०१०६ सावंतवाडी रोड - दिवा एक्स्प्रेस (sawanytvadi - diva Express), नेत्रावती एक्सप्रेस (Netravati Express), कोकण कन्या एक्सप्रेस (Konkan Kanya Express) व मांडवी एक्स्प्रेस (Mandovi Express) अशा गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
दरम्यान, प्रवाशांना प्रवास करताना होणाऱ्या अडथळ्यांमुळे आणि गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच कोकण रेल्वे मार्गानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी वेळापत्रक पाहावं आणि गाड्यांमध्ये होणाऱ्या बदलाची नोंद घ्यावी, असं आवाहनही कोकण रेल्वे प्रशासनाने केलं आहे.
काय बदल होणार?
गाडी क्र. ११००३ दादर - सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेस रोहा ते रत्नागिरी दरम्यान अडीच तास रोखून ठेवली जाणार आहे. उडुपी - कणकवली विभागादरम्यान गाडी क्र. १६३४६ तिरुवनंतपुरम सेंट्रल - लोकमान्य टिळक नेत्रावती एक्सप्रेस तीन तासांसाठी थांबवून ठेवली जाणार आहे. ही गाडी २० जून रोजी सुटणार आहे. तसेच गाडी क्र.१०१०६ सावंतवाडी रोड - दिवा एक्स्प्रेसला सावंतवाडी रोड - कणकवली विभागादरम्यान अर्ध्या तासासाठी थांबवण्यात येणार आहे. कोकण कन्या एक्सप्रेस व मांडवी एक्स्प्रेस याही गाड्या थांबवल्या जातील.