Saturday, July 13, 2024
Homeसंपादकीयरविवार मंथनQueen of Jhansi : क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता वीरांगणा : झाशीची राणी

Queen of Jhansi : क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता वीरांगणा : झाशीची राणी

विशेष : लता गुठे, विलेपार्ले, मुंबई.

इतिहासाच्या पुस्तकामध्ये सुवर्णाक्षरांनी ज्यांची नावे लिहितात, तेच अजरामर होऊन कायम एक मिसाल बनून भूतकाळाचा रस्ता दाखवतात, वर्तमानात तेवत राहतात. याचं कारण म्हणजे त्यांनी असं काही अद्भुत कार्य केलेलं असतं, त्या कार्याची प्रेरणा समाजात प्रेरक ठरते. अशाच कर्तृत्ववान महिलेची एक रोमहर्षक अलौकिक कहाणी मी आज आपल्याला सांगणार आहे, याचं कारण म्हणजे ज्या दिवशी त्या शहीद झाल्या, तो दिवस होता १८ जून १८५७. तेव्हा त्या जेमतेम २३ वर्षांच्या होत्या.

आपण सर्वांनीच झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याबद्दल ऐकलेलं आहे की, त्या इंग्रजांविरुद्ध लढल्या आणि शेवटच्या श्वासापर्यंत ‘मेरी झांसी नही दूंगी’ असे ठामपणे इंग्रज सरकारला ठणकावून सांगणारी झाशीची राणी एका छोट्या बाळाला पाठीला बांधून रणांगणामध्ये विजेसारखी चपळाईने लढली, तेही फक्त मूठभर सैन्याला बरोबर घेऊन. लढून शहीद झाली; परंतु हार नाही मानली. यावरून झाशीच्या राणीची हिम्मत, धाडस, आत्मविश्वास या गोष्टी आपल्या प्रत्ययाला येतात.

वाचलेल्या, ऐकलेल्या या गोष्टींमागचा इतिहास आपल्याला कधीतरी जाणून घ्यावासा वाटतो, तसा मलाही वाटला आणि मी झाशीच्या राणीच्या भूतकाळात त्यांच्या बालपणापर्यंत जाऊन पोहोचले. मला प्रश्न पडला होता की, असं कोणतं बाळकडू होतं जे झाशीच्या राणीला मिळालं असेल? ज्यामुळे इंग्रज सैनिकही त्यांना घाबरत होते. काय होतं असं या स्त्रीमध्ये? तर ती साक्षात दुर्गेचा आणि चंडिकेचा एकत्र अवतार होती. हे मला तेव्हा समजले, जेव्हा मी बारकाईने झाशीच्या राणीचा इतिहास समजून घेऊ लागले. त्यातील काही घटना आणि प्रसंग या लेखात उल्लेख करण्याचा प्रयत्न केला आहे. झाशीच्या राणीच्या साहसी बाळकडूची सुरुवात कशी झाली? चला तर मग पाहूयात…

दि. १९ नोव्हेंबर १८३५ साली झाशीच्या राणीचा ऊर्फ मणिकर्णिका यांचा जन्म मोरोपंत व भागीरथीबाईं तांबे यांच्या पोटी झाला. हे मूळ निवासी गुढे ग्राम, रत्नागिरी येथील होते. व्यवसायानिमित्ताने पुणे व सातारा येथे स्थायिक झाले. त्यांचे वडील त्यांना लाडाने छबीली म्हणत असत आणि आईची लाडकी मनू. मणिकर्णिकाच्या वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी मनूची आई मनूला सोडून देवाघरी गेली. मायेचे छत्र हरवले आणि मनू पोरकी झाली.

त्या कळात मणिकर्णिकाचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांकडे कामाला असल्यामुळे लहान मणिकर्णिकाचे बालपण बाजीराव पेशव्यांच्या मुलांसोबत गेले. मणिकर्णिकाच्या पुढील आयुष्याला कलाटणी देणारे अनेक प्रसंग इथेच घडले आणि पुढे त्या शूर क्षेत्राणी झाल्या. याचं कारण म्हणजे त्यांच्या आवडीनिवडी इतर मुलींपेक्षा खूप वेगळ्या होत्या. त्या भातुकलीमध्ये न रमता धनुर्विद्या, तलवारबाजी याकडे आकर्षित होऊ लागल्या आणि त्यांनी शिकण्याचा हट्ट केला. त्याकाळी मर्दानी खेळ फक्त पुरुषांनीच शिकायचे हा समज असलेल्या समाजात वावरणाऱ्या या छोट्या मनूने या खेळांमध्ये लहानपणीच नैपुण्य मिळविले आणि आत्मरक्षणाचे धडे गिरवले. त्याचे बाळकडू त्यांना पेशव्यांच्या दरबारात पेशव्यांच्या मुलांबरोबर मिळत होते आणि अतिशय आत्मविश्वासाने, आवडीने त्या शिकत होत्या. इतकंच नाही तर त्यांना कुस्ती, मल्लखांब यांसारखे व्यायामाच्या खेळांचीही विशेष आवड निर्माण झाली आणि त्यांनी या कला शिकण्याचा हट्ट धरला आणि तो त्यांनी पूर्णही करून घेतला.

वयाच्या १४व्या वर्षांपर्यंत त्या शस्त्रविद्येत पारंगत झाल्या. शिवाय त्या एक उत्तम घोडेस्वारही होत्या. त्या काळामध्ये कुठल्याही सर्वसामान्य मुलीने ज्या गोष्टींचा विचारही केला नसता त्या काळात मणिकर्णिकाने या गोष्टीत नैपुण्य मिळविले. ही पुढील काळातील भूतकाळातील काही घटनांची नांदी होती. झाशीच्या राणीचे बालपण पाहताना क्षणभर असे वाटते की, परमेश्वर प्रत्येकाला काहीतरी विशेष कार्यासाठी जन्माला घालतो आणि त्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची तयारी करून घेतो. असंच मणिकर्णिकाच्या बाबतीत झालं. राणी लक्ष्मीबाई या कोणत्याही राजघराण्यामध्ये जन्माला आल्या नव्हत्या; परंतु राजघराण्याशी त्यांचा खूप जवळून संबंध आला होता. संस्कारक्षम वयामध्ये त्यांच्यावर संस्कार झाले, ते पेशवे राजघराण्यातील काही मुत्सद्दी व्यक्तिमत्त्वांचे ते असे… त्या काळात संपूर्ण हिंदुस्थानात पेशव्यांनी दबदबा निर्माण केला होता.

श्रीमंत धोंडोपंत बाजीराव पेशवे व नानासाहेब पेशवे आणि जयाजी शिंदे व महाराणी लक्ष्मीबाई याशिवाय कोणीही अचूक अश्वपरीक्षा करणारा नव्हता. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाईंनी युद्धशास्त्रातही प्रावीण्य मिळविले. बाजीरावांच्या दरबारी बाळंभट देवधर नावाचे उत्तम कसरतपटू आणि कुस्तीगीर होते. त्यांनीच मल्लविद्येत पारंगत होण्यासाठी मल्लखांब नावाचा कसरतीचा वेगळा प्रकार शोधून काढला. मनाची एकाग्रता, विलक्षण चपळता, शरीराचा तोल सांभाळण्याचे पूर्ण कौशल्य, काटकपणा आणि चतुरस्त्र भान वृद्धिंगत करणाऱ्या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज झाल्या. मोठ-मोठे राजे देखील त्यांच्या घोडेस्वारीचं कौतुक करत असत. भालाफेक धनुर्विद्या, नेमबाजी, घोडेस्वारी या सर्व गोष्टीत रमलेल्या मणिकर्णिकाच्या जीवनात एक टर्निंग पॉइंट आला आणि या शूर सुंदर कुमारीकेला न्यायला तिचा राजकुमार आला आणि १९ मे इ.स. १८४२ मध्ये त्यांचा विवाह झाला, तेव्हा त्या अवघ्या चौदा वर्षांच्या होत्या. त्या मुलीला लग्नाचा अर्थही कळला नसेल, अशा सुकुमारीचे लग्न उत्तर भारतातील झाशीचे महाराज गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाले. मणिकर्णिकाचे लग्नानंतर नाव बदलून लक्ष्मीबाई नेवाळकर असे ठेवण्यात आले.

नेवाळकर मूळ निवासी कोट ग्राम, रत्नागिरी येथील होते. पेशव्यांनी त्यांना जळगावच्या पारोळा येथील जहागीर दिली व कालांतराने झाशी संस्थानची सुभेदारी दिली. इ.स. १८१८ नंतर इंग्रजांशी तह करून नेवाळकरांनी झाशी वंशपरंपरागत घेऊन ‘महाराजा’ ही पदवी धारण केली. अशा या राजघराण्यात राणी म्हणून शोभेल अशी मणिकर्णिका त्यांच्या नजरेस पडली आणि ती झाशीची राणी झाली. मुळातच हुशार बुद्धिचातुर्य असलेल्या मुलीचे मन घरात, संसारात रमणे अशक्य होते. त्यांना राज दरबारातील कामकाज, उलथापालथ खुणावू लागली; परंतु दरबाराचे कामकाज राणीने पाहणे गंगाधररावांस पसंत नसल्याने मिळालेल्या वेळेचा उपयोग राणी लक्ष्मीबाईंनी स्वत्त्व जपण्यासाठी केला. त्यांनी आपला रोजचा व्यायाम, कसरत, घोडेस्वारी, तलवारबाजी नियमित सुरू ठेवली.अशातच परमेश्वरने त्यांना मातृत्व बहाल केले १८५१ला त्यांना पहिले पुत्ररत्न प्राप्त झाले. आनंदाच्या झुल्यावर झुलत असतानाच नियतीने त्यांच्यावर आघात केला आणि ते मूल अवघ्या तीन महिन्यांतच मृत्यू पावले. राज घराण्याचा हा वारसा देवाने हिरावून घेतला. गादीला वारस हवा म्हणून पुढे त्यांनी वासुदेवराव नेवाळकर यांच्या आनंदराव नावाच्या मुलाला दत्तक घेऊन त्याचे नाव दामोदर असे ठेवले. २१ नोव्हेंबर इ.स. १८५३ मध्ये महाराज गंगाधररावांचे निधन झाले. या घटना एकापाठोपाठ एक घडत होत्या आणि त्या कोवळ्या सृजनशील; परंतु कणखर राणीवर आघातावर आघात होत होते. थकून, थांबून चालणार नाही हे राणीला माहीत होतं. संकटांवर मात करून पुन्हा त्या सावरल्या आणि दरबारातील नित्य कामांमध्ये रमल्या. एकदा का नियतीचा फेऱ्यांमध्ये अडकलं की ती वारंवार आघात करते. कारण, परमेश्वरालाही परीक्षा घ्यायची असते, हे पाहण्यासाठी की ती व्यक्ती किती सक्षम आहे. कारण, तो पुढील भविष्यात लढण्यासाठी तयार करतो. दुःखाच्या प्रसंगातूनच माणसाचे विचार दृढ होत राहतात. असंच काहीसं लक्ष्मीबाईंच्या बाबतीतही घडलं आणि काही काळातच महाराज गंगाधरराव नेवाळकर यांचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर समाजाने एका विधवा राणीला दुर्लक्षित करू नये, म्हणून राणीने पुरुषी पोषाखात समाजात जाऊन वेश बदलून समाजपयोगी कामांमध्ये लक्ष घातलं आणि झाशीला कसं सुरक्षित ठेवता येईल, याचाच विचार चारोप्रहर त्यांच्या मनात सुरू झाला. अठरा वर्षांच्या लक्ष्मीबाईंनी निश्चित ध्येय समोर ठेवले होते झाशीच्या त्या सम्राज्ञी होत्या. त्यांच्यातील जिद्द, चिकाटी, हुशारी, समाजकारण, राजकारणाचा अभ्यास, शूरपणा या सर्व गुणांमुळे राणी लक्ष्मीबाई झाशीच्या प्रमुख झाल्या. तो काळ होता इंग्रजी राजवटीचा. त्यांनी झाशीच्या राजदरबारातील सर्व सूत्रे हाती घेतली. लक्ष्मीबाईंच्या शौर्याचे कौतुक सर्वदूर पोहोचले, त्यामुळे इंग्रजांच्याही काळजात धडकी भरली होती.

१८५७च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील राणी लक्ष्मीबाई अग्रणी सेनानी होत्या. दामोदररावास पाठीशी बांधून किल्ल्यावरून खाली उडी मारून काल्पीला गेल्या. कोंच, काल्पी पराभवानंतर त्या रावसाहेब पेशव्यांबरोबर ३० मे १८५८ रोजी ग्वालियरला आल्या. तेथेही स्वस्थ न बसता लक्ष्मीबाईंनी आपल्या सैन्याची कवायत नियमित चालू ठेवली. सैन्यांमध्ये फिरून, सैनिकांची चौकशी करीत, इंग्रजांना रोखण्यासाठी कशा प्रकारे मोर्चेबांधणी करावी? याविषयी त्यांनी चर्चा केली. याच वेळी १७ जून इ.स. १८५८ रोजी सकाळीच ब्रिटिश अधिकारी स्मिथ सैन्यासह ग्वाल्हेरच्या अगदी जवळ कोटा येथे येऊन पोहोचला. त्याने त्वरित हल्ला चढवला. लक्ष्मीबाईंनी रणांगणात धाव घेतली. लक्ष्मीबाई तलवारीचे सपसप वार करीत समोर येणाऱ्या ब्रिटिश सैन्याला कापून काढत होत्या. आवेगाने, विजेसारख्या तळपणाऱ्या राणींकडे पाहून त्यांचे सैन्यही त्वेषाने लढले. इंग्रज अधिकारी स्मिथचे सैन्य मागे हटणारच होते, त्याच वेळी नव्या दमाची एक फौज बाजूच्या टेकडीवरून चालून आली. दोन्हींकडून आलेल्या सैन्यासमोर राणींचा निभाव लागला नाही. परिस्थिती ओळखून त्या काही स्वारांनिशी बाहेर पडल्या. थोडे पुढे जाताच एका ओढ्यापाशी त्यांचा घोडा अडला. नेहमीची सारंगी नावाची घोडी शेवटच्या लढाईत त्यांच्याबरोबर नव्हती. काही केल्या घोडा ओढा ओलांडत नव्हता. तिथे इंग्रजांशी लढत असताना राणी लक्ष्मीबाई रक्तबंबाळ होऊन घोड्यावरून खाली कोसळल्या. त्यांचा डाव्या कुशीतही तलवार घुसली; परंतु पुरुषी वेशात असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांना इंग्रज ओळखू शकले नाहीत. ते पुढे निघून गेले.

घायाळ झालेल्या राणी लक्ष्मीबाई यांना सेवक रामचंद्र देशमुखांनी फुलबाग येथील बाबा गंगादास यांच्या मठात आणले; परंतु त्यांची उपचार करण्याची इच्छा नव्हती. आपला देह क्रूर इंग्रजांच्या हाती लागू नये, अशी त्यांची इच्छा होती. फुलबाग येथे बाबा गंगादास यांच्या मठात तात्या टोपे, रामचंद्र राव देशमुख, काशीबाई कुनविन, गुलमोहम्मद, बांदा नवाब बहादूर अली द्वितीय आणि युवराज दामोदर राव यांनी मुखाग्नी दिली. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी वयाच्या तेविसाव्या वर्षी मरण स्वीकारले आणि अशा प्रकारे एका शूर राणीला रणांगणात वीरमरण आले. यांच्या शौर्याने कौतुक करताना त्यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले. एवढेच नाही, तर ब्रिटिशांनी राणी लक्ष्मीबाईचा उल्लेख ‘हिंदुस्थानची जोन ऑफ आर्क’ असा केला. तसेच वरिष्ठ ब्रिटिश आर्मी ऑफिसर त्याने राणीचे वर्णन ‘चाणाक्ष, सुंदर राणी असा उल्लेख केला. ही गोष्ट आजच्या प्रत्येक महिलेसाठी अतिशय प्रेरक अशी आहे.

धोरणी, चतुर, युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई धाडसी वीरांगणेला १८ जून १८५८ रोजी कोटा येथील सराईनजीक ग्वालियरमधल्या फुलबाग येथे वीरगती प्राप्त झाली. अशा या शूर महान सुंदर धैर्यशील राणीला मानाचा मुजरा. त्यांच्या स्मृतीस ही शब्दसुमनांची भेट अर्पण. – लता गुठे, विलेपार्ले, मुंबई

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -