Sunday, March 23, 2025
Homeसाप्ताहिककोलाज‘सिंहासनाधिश्वर’ : छत्रपतींची असामान्य गाथा रूपेरी पडद्यावर

‘सिंहासनाधिश्वर’ : छत्रपतींची असामान्य गाथा रूपेरी पडद्यावर

ऐकलंत का! : दीपक परब

‘शिवराज्याभिषेक’ म्हणजे पारतंत्र्याच्या जोखडातून रयतेला मुक्त करीत, अभिमानाने स्वातंत्र्याचा श्वास घेण्याची संधी मिळाली तो क्षण… माझ्या राजासारखा राज्यकर्ता असावा हे अभिमानाने, छाती फुगवून जगाला ओरडून सांगण्याचा क्षण… भारतीयांनाच नव्हे, तर सर्व जगाला अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळाली तो क्षण…… प्रतिकूल परिस्थितीतही आपण शत्रूशी सामना करू शकतो ही जिद्द निर्माण करणारा क्षण होय.

शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले, राज्याभिषेक करवून घेतला, अखंड हिंदुस्थानाला राजा मिळाला. या प्रेरणादायी इतिहासामुळेच पुढे कित्येक वर्षे राजा नसतानाही रयतेने धैर्याने संकटाचा मुकाबला केला. आताच्या शतकातही कित्येकांच्या आयुष्यात उमेद निर्माण करणाऱ्या या सुवर्णक्षणाला ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या वर्षी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला तिथीप्रमाणे २ जून रोजी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात शिवाजी महाराजांच्या दरबारात, राजसदरेवर शकील प्रॉडक्शन्स निर्मित ‘सिंहासनाधिश्वर’ या भव्य मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली. सोबत चित्रपटाच्या दिमाखदार पोस्टरचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. शिवाजी महाराजांनी केलेल्या पराक्रमाची आठवण आपापल्या स्वार्थासाठी, सोयीनुसार सगळ्यांनीच केली; परंतु महाराजांनी रयतेसाठी केलेल्या कार्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रेरणादायी प्रसंगातून आताच्या पिढीने नेमके काय घ्यावे हे मांडण्याचा प्रयत्न निर्माता आणि दिग्दर्शक ‘सिंहासनाधिश्वर’ चित्रपटातून करणार आहेत. ३५० वर्षांपूर्वीचा महाराजांचा भव्यदिव्य शिवराज्याभिषेक सोहळाही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील नामांकित निर्माते शकील खान यांची निर्मिती असलेला आणि विजय राणे दिग्दर्शन करीत असलेला ‘सिंहासनाधिश्वर’ हा चित्रपट जून २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या सोहळ्यास शिवराज्याभिषेक सोहळ्याचे कार्याध्यक्ष नितीन पावले, श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीचे अध्यक्ष सुनील पवार, दुर्गराज रायगड आणि पदाधिकारी उपस्थित होते.

हिंदी चित्रपट, अनेक मालिका आणि शॉर्ट फिल्म्सच्या निर्मितीनंतर शकील खान यांनी ‘सिंहासनाधिश्वर’ या मराठी चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. ‘राजा शिवछत्रपती’, ‘श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी’, अशा वेगवेगळ्या मालिका, ‘देव अवतारी बाळूमामा’, ‘पॉवर’, ‘रुदन’ यासारखे चित्रपट आणि असंख्य इव्हेंटच्या माध्यमातून विजय राणे यांनी आपली दिग्दर्शकीय चुणूक दाखविली असून आगामी ‘सिंहासनाधिश्वर’ या भव्य चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाची असामान्य गाथा रसिकांना पाहायला मिळणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -