Friday, July 12, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे मानले आभार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे मानले आभार

कोकण विकासासाठीच्या योजनांचा भूमीपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न

सावंतवाडी : आज सिंधुदुर्गामध्ये महाराष्ट्र शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’चा मोठा कार्यक्रम पार पडणार आहे. राज्यातील हा चौथा कार्यक्रम असणार आहे. या कार्यक्रमांतर्गत आखण्यात आलेल्या अनेक योजनांचा भूमीपूजन व लोकार्पण सोहळा आज सावंतवाडी येथे पार पडला. या सोहळ्याला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. तसेच केंद्रीय सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नारायण राणे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार भरत गोगावले अशी मंडळी उपस्थित होती. यादरम्यान केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी कोकण विकासासाठी राबवण्यात येणा-या अनेक योजनांचा आढावा घेतला.

या लोकार्पण सोहळ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे अभिनंदन केले व आभार मानले. काल नारायण राणेंसोबत मुख्यमंत्र्यांची सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योगांसंदर्भात तीन तास बैठक झाली. या उद्योगविभागांसाठी नारायण राणेंच्या एवढ्या योजना मी पाहिल्या की खर्‍या अर्थाने त्या घेण्यासाठी राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या अनेक योजना नारायण राणेंकडे आहेत. महिला व तरुणांना रोजगार मिळावा, यासाठी आखलेल्या अनेक योजनांची माहिती कालच्या बैठकीत नारायण राणेंनी दिली.

एखादी वस्तू तयार झाल्यानंतर त्याचं मार्केटिंग, ब्रॅण्डिंग होणं गरजेचं आहे. त्या वस्तूला बाजारपेठ उपलब्ध झाली पाहिजे याबाबतदेखील राणे साहेबांसोबत चर्चा झाली. यासाठीचे सर्व प्रयत्न राज्य व केंद्र सरकारकडून केले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे हात तयार करा आणि मी खात्रीपूर्वक सांगू शकतो की राणेसाहेबांच्या विभागाच्या माध्यमातून आपण हजारो, लाखो नोकरी देणारे हात निर्माण करु शकतो, असे नारायण राणेंबाबत मुख्यमंत्र्यांनी गौरवोद्गार काढले. याचबरोबर कुटुंबाचा चरितार्थ चालवताना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना केंद्र व राज्य सरकारकडून राबवण्यात येतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी दिला.

 

शॉपिंग व ड्रेसिंग सेंटरसाठी दीपक केसरकरांचे आभार

सावंतवाडीमध्ये आर्थिक विकासाला चालना देणारं शॉपिंग सेंटर विकसित करणं, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते रमाकांत आचरेकर यांच्या नावाचं ड्रेसिंग सेंटर उभारणं या कामांचं भूमीपूजन केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. अशा योजना आणल्याबाबत त्यांनी दीपक केसरकरांचे आभार मानले.

अंबोली हिल स्टेशनबाबत सरकार सकारात्मक

पर्यटन व्यवसायाला चालना देणारी ठिकाणं उभारणं हे राज्य सरकारचं कर्तव्यच आहे. अंबोली हिल स्टेशल उभारण्यासाठी राज्य सरकार योग्य ती मदत करेल. तसेच सिंधुरत्नच्या माध्यमातून अनेक योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचं नाव यांचं नाव देण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार

अनपेक्षित कोविड काळामुळे उडालेली तारांबळ पुन्हा उद्भवू नये यासाठी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच देशभरात सर्वात जास्त पायाभूत सुविधांचे प्रकल्प महाराष्ट्रात होत आहेत, याबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केला.

भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणण्यात मोदी सरकारचा मोठा वाटा

केंद्र सरकारला पाठवण्यात येणार्‍या प्रस्तावांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “नारायण राणेसाहेबांसमक्ष मी सांगतो की, केंद्र सरकारला पाठवलेले प्रस्ताव एकाही पैशाची कपात न करता मान्य होतात. ११० कोटींचा निधी एकत्र यापूर्वी कधीच मान्य झाला नाही जो या सरकारच्या काळात झाला. याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो, कारण संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना मोदीजींमुळे भारताची अर्थव्यवस्था अकरावरुन पाचव्या क्रमांकावर आली आहे.”

सर्वाधिक एफडीआय महाराष्ट्राकडे

सहकार क्षेत्र अडचणीत असल्याचं सांगितल्यानंतर दहा हजार कोटींचा इन्कम टॅक्स माफ करण्यात आला. मागील आठ ते नऊ महिन्यात सर्वाधिक एफडीआय महाराष्ट्राने आणला आहे, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

मुंबई-सिंधुदुर्ग एक्स्प्रेस वे होणार

पर्यटन प्रकल्पाची एकही संधी सोडणार नसून समृद्धीप्रमाणेच मुंबई-सिंधुदुर्ग एक्स्प्रेस वे होणार आहे, कारण वेगवान विकासात मोठा वाटा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी अधिक सांगितलं. एमएमआरडीएच्या धर्तीवर कोकण विकास प्राधिकरण करण्यात येणार, असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिलं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -