गांधीनगर : गुजरातमध्ये भाजप आमदार हीरा सोलंकी यांनी समुद्रात बुडणाऱ्या तीन तरुणांचे प्राण वाचवले. तरुणांना वाचवण्यासाठी आमदाराने स्वतः समुद्रात उडी घेतली. मात्र, या घटनेत एका तरुणाला वाचवता न आल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे.
हे चार तरुण राजुलाच्या पटवा गावात समुद्रकिनारी बांधलेल्या खाडीत पोहण्यासाठी गेले होते. जोरदार लाटेमुळे ते खोल पाण्यात गेले आणि बुडू लागले. त्यांनी मदतीसाठी हाक मारली. आवाज ऐकून लोक घटनास्थळी पोहोचले. घटनेच्या वेळी आमदार सोलंकी हेदेखील समुद्रकिनारी उपस्थित होते. तरुणांना वाचवण्यासाठी त्यांनी तत्काळ समुद्रात उडी घेतली. त्यांनी इतर काही लोकांच्या मदतीने तीन तरुणांना सुखरूप बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत चौथा तरुण बुडाला होता. बराच शोध घेतल्यानंतर बुधवारी सायंकाळी त्याचा मृतदेह सापडला.
कल्पेश शियाल, विजय गुजरिया, निकुल गुजरिया अशी वाचवण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत, तर त्यांचा मित्र जीवन गुजरिया याचा मृत्यू झाला आहे.
हीरा सोलंकी हे गुजरातमधील अमरेलीच्या राजुला येथील आमदार आहेत. २०१८ मध्येही त्यांनी एका बुडणाऱ्या तरुणाला वाचवण्यासाठी समुद्रात उडी घेतली होती. सोशल मीडियावर आमदार सोलंकी यांच्या धाडसाचे अनेकजण कौतुक करत आहेत.