
मनमाड: बिहारमधून महाराष्ट्रात तब्बल ५९ बालकांची तस्करी करण्याचा कट पोलिसांनी उधळून लावला. या बालकांची सुखरुप सुटका करुन त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली असून पाच जणांवर कलम ४७० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या लहान मुलांना पुणे किंवा सांगलीतील मदरशात नेण्याचा प्लॅन होता.
बिहारहून महाराष्ट्रात दानापूर-पुणे एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या ३० लहान मुलांना मनमाड रेल्वे स्थानकामधून तर २९ लहान मुलांना जळगाव रेल्वे स्थानकातून सोडवण्यात आलं. या मुलांची रवानगी जळगाव तसेच नाशिकच्या उंटवाडी परिसरातील बालसुधार गृहात करण्यात आली आहे. या मुलांना बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यामधून सांगली येथे आणून मदरशामध्ये तस्करीसाठी आणण्याचा हा डाव होता. भुसावळ रेल्वे सुरक्षा बल तसेच लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने हा डाव हाणून पाडला.
ही मुले ८ ते १५ वयोगटातील आहेत. सदर मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या मुलांच्या पालकांची माहिती काढली जात असून ओळख पटविल्यानंतर संबंधित बालकांना पुढील आठवड्यापर्यंत ताब्यात देण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.