कोकण रेल्वेच्या तिकीटांची दलाली करणा-यांची आता खैर नाही!

कोकणातल्या चाकरमान्यांसाठी अजित पवार आणि नारायण राणे सरसावले


मुंबई : गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण अवघ्या एका मिनिटात फुल्ल होत आहे. रेल्वे अधिकारी आणि तिकिट दलालांच्या अभद्र युतीमुळेच हे होत असून कोकण रेल्वे तिकीटांच्या आरक्षणाची दलाली करणाऱ्या रॅकेटची चौकशी करुन चाप लावण्याची मागणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.


सर्वसामान्य प्रवासी सण-उत्सवाला गावी जात असतात. नेमके त्यावेळीच दलालांकडून मोठ्या संख्येने रेल्वेच्या तिकिटांचे आरक्षण करुन नंतर चढ्या दराने त्याची विक्री करण्याचे रॅकेट सुरु आहे. यामध्ये कोणाकोणाचे हितसंबंध गुंतले आहेत, या गैरप्रकारात कोणकोण सामील आहे, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. या तिकीटाच्या आरक्षणांची मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेने चौकशी करावी, अशा रेल्वे दलालांवर नियंत्रण ठेवावे, तसेच कोकणच्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी गणेशोत्सव काळात अतिरिक्त रेल्वे गाड्या कोकणात सोडण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्राद्वारे केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे. तर केंद्रीय लघु, सुक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे हे स्वत: प्रत्यक्ष भेट घेऊन रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांना जाब विचारणार आहेत.


दर्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी बिष्णोई आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा आणि विशेषत: कोकणवासियांच्या अस्मितेचा, श्रद्धेचा, जिव्हाळ्याचा आणि संस्कृतीचा विषय आहे. गणेशोत्सवाची वाट प्रत्येक मराठी माणूस आणि विशेषत: कोकणवासीय वर्षभर बघत असतो. कामानिमित्त जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असला, कितीही अडचणी असल्या तरी कोकणवासीय चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या गावी जातोच. त्याची तयारी आणि नियोजन प्रत्येक चाकरमानी अगदी वर्षभरापासून करत असतो. गणेशोत्सव हा कोकणाचा मोलाचा ठेवा आणि सांस्कृतिक संचित आहे.


गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम अत्यंत संथगतीने सुरु आहे. तसेच या महामार्गाची अवस्था अत्यंत बिकट आहे. या महामार्गावरुन प्रवास करणे अत्यंत त्रासदायक आणि धोकादायक ठरत आहे. त्यामुळे रस्त्याने प्रवास करणे हा पर्याय सुद्धा व्यवहार्य ठरत नाही. कोकणाला जोडण्यासाठी तसेच कोकणवासीय चाकरमान्यांच्या सोयीसाठी महत्त्वाकांक्षी कोकण रेल्वेची निर्मिती करण्यात आली आहे. कोकण रेल्वे ही कोकणवासियांची जीवनवाहिनी आहे. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना आतापासूनच प्रतिक्षा यादींचे फलक लागले आहेत. मुंबईच्या छत्रपती टर्मिनसवरुन १५ सप्टेंबरला सुटणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसची प्रतिक्षायादी अवघ्या दीड मिनिटातच हजारापार गेल्याची बाब समोर आली आहे. तर १७ सप्टेंबरचे आरक्षण करण्यासाठी गेलेल्या प्रवाशांना सर्वच गाड्यांसमोर 'रिग्रेट' हा मेसेज येत आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या आरक्षणात गैरप्रकार होत असावेत, अशी शंका घेण्यास वाव आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे.


गणेशोत्सवासाठी गावी जाण्याचा निर्धार केलेले हजारो चाकरमानी तीन महिने आधीपासूनच गावी जाण्या-येण्याचे नियोजन करत असतात. त्यासाठी रात्रभर जागून कोकण रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. यंदा गणेशोत्सव १९ सप्टेंबर रोजी सुरु होत आहे. त्यामुळे त्याआधीच्या किमान दोन दिवसांचे म्हणजे १७ सप्टेंबर या तारखेचे १२० दिवस आधीचे आरक्षण शुक्रवारी खुले झाले. मात्र पहिल्याच दिवशी अवघ्या एक ते दोन मिनिटात आरक्षण पूर्ण झाले तर प्रतिक्षायादीचे लांबच्या लांब फलक लागले आहेत. हा प्रकार म्हणजे रेल्वेच्या आरक्षणात गैरप्रकार होत असण्याची शक्यता अधिक आहे.


रेल्वे तिकीटाची अवैध विक्री करणारे दलाल मोठ्या संख्येने तिकीटांचे आरक्षण करुन ते चढ्या दराने विक्री करत असल्याचा आजपर्यंतचा अनेकांचा अनुभव आहे. सर्वसामान्य प्रवासी सण-उत्सवाला गावी जात असतात त्यावेळीच दलालांकडून मोठ्या संख्येने आरक्षण करुन चढ्या दराने विक्री करण्याचे रॅकेट सुरु आहे. यामध्ये कोणाकोणाचे हितसंबंध गुंतले आहेत, या गैरप्रकारात कोणकोण सामील आहे, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. त्यामुळे या तिकीटाच्या आरक्षणांची मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वने चौकशी करावी. अशा रेल्वे दलालांवर नियंत्रण ठेवावे. तसेच कोकणच्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी गणेशोत्सव काळात अतिरिक्त रेल्वे गाड्या कोकणात सोडण्यात याव्यात, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात