नवीन पनवेल (प्रतिनिधी) : महाराष्ट्राची कुलदेवी म्हणजे लोणावळा येथील एकवीरा देवी. ९ मे रोजी पूजा साळवे व शैलेश शेंडगे नामक युजर्सनी सोशल मीडियाच्या माध्यमातून इन्सटाग्रामवर आई एकविराबद्दल आक्षेपार्ह विधान करून पोस्ट टाकली. त्यामुळे ठाणे, पालघर, मुंबई, रायगड येथील एकविरा देवीवर श्रद्धा असलेल्या भक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. अनेक एकविरा देवीच्या भक्तांनी या युजर्सवर कारवाई करण्याची मागणी केली असून, त्या संदर्भातील निवेदन संबंधित पोलीसस्टेशनमध्ये दिले आहे.
खारघरमधील वेसू देवी युवा मित्र मंडळातील कार्यकर्त्यांनी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे निवेदन खारघर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांना दिले. तसेच ठाण्यातून रूपेश तरे आणि वसईतून गणेश बाळकृष्ण पाटील यांनी या दोन भक्तजनांनी तक्रार दाखल केली. तसेच दोषीवर कारवाई करण्यासाठी पनवेल कोळीवाडा येथील कोळी बांधव एकत्र आले होते. त्यांनी कारवाई करण्यासाठी पनवेल शहर पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे. इंस्टाग्राम या समाजमाध्यमावर केलेले आक्षेपार्ह व वादग्रस्त विधान लक्षात घेऊन त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शहर पोलीस यांच्याकडे करण्यात आली आहे. लोणावळा येथील कार्ला गड निवासिनी असलेली एकवीरा देवीच्या दर्शनाला राज्यभरातूनच नव्हे, तर जगभरातून भाविक आणि पर्यटक दर्शनासाठी येत असतात.