
उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण
अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यात पारा दिवसेंदिवस वाढत चालल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. जिल्ह्यात मागील गेल्या काही दिवसांत उष्माघाताचे काही रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हाभरात उष्णतेचा पारा सरासरी ३७ ते ४१ अंश सेल्सिअसवर जात असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे उष्णतेच्या लाटेचा दरवर्षी सामना करावा लागणार असल्याने जिल्हा प्रशासनाकडून दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येत आहेत.
या उपाययोजनांमध्ये उष्म्याचा प्रभाव न पडणारे रस्ते, इमारतीचे बांधकाम करण्यास प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाचा आहे. रायगड जिल्ह्यात अशा प्रकारच्या उपाययोजना प्रथमच आखल्या जात आहेत. हवामान बदलामुळे रायगड जिल्हा उष्णता प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. वाढलेल्या उष्णतेत काळजी न घेतल्यास उष्माघाताचा धोका होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील दुपारचे तापमान ४१ अंश सेल्सिअसपर्यंत जात आहे. त्यामुळे वाढलेल्या तापमानामुळे दुपारच्या वेळेत प्रमुख शहरातील रस्ते ओस पडू लागले आहेत. वाढलेला उकाडा, त्यातून निर्माण होणाऱ्या आजारांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. वाढलेल्या तापमानाचा लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, आजारी नागरिकांना त्याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. याचबरोबर पशुपक्ष्यांनाही याचा त्रास जाणवू लागला आहे.
बदलती जीवनशैली, घरांची बदललेली रचना, आधुनिक बांधकाम साहित्य, झाडांचे कमी झालेल्या प्रमाणामुळे उष्णतेचा प्रकोप दरवर्षी कायम राहणार असल्याने यावर दिलासा मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागांना ‘उष्माघात नियंत्रण आराखडा’ तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. उष्माघातापासून उष्णतेची लाट अथवा उष्माघाताचा विचार करताना तापमानाव्यतिरिक्त हवेतील आर्द्रता, धुळीचे कण, हवेचे प्रदूषण या बाबी विचारात घेऊन जिल्ह्यातील भौगोलिक व वातावरणीय बाबींचा विचार करून याबाबतचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांचे म्हणणे आहे. दुपारी १२ ते ३. ३० या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे.
उष्माघात कसा ओळखावा चक्कर येणे, उलटी व मळमळ होणे, शरिराचे तापमान खूप वाढणे, पोटात कळा येणे, शरिरातील पाणी कमी होणे.
उष्णतेची लाट कशी ओळखावी तापमानाच्या निकषांनुसार सलग दोन दिवस डोंगरी भागात ३० डिग्री सेल्सियस, समुद्री किनारपट्टयात ३७ डिग्री सेल्सियस व समतल भूभागात ४० डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त तापमानाची नोंद होणे किंवा या विभागात सलग दोन दिवस हंगामातील सामान्य तापमानापेक्षा ४.५ डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त तापमानाची वाढ होणे, यापैकी कोणतीही एक नोंद आढळल्यास या भागामध्ये उष्णतेची लाट आहे असे समजावे.
उष्माघात होऊ नये म्हणून काय करावे तहान लागलेली नसली पाणी प्यावे, हलके पातळ सुती कपडे वापरावेत, बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट व चपलांचा वापर करण्यात यावा, प्रवास करताना पिण्याच्या पाण्याची बाटली सोबत घ्यावी, उन्हात काम करीत असलेल्या कामगारांनी डोक्यावर टोपी किंवा पांढरा रुमाल बांधावा. शरिरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओ.आर.एस.घ्यावे, घरी तयार करण्यात आलेली लस्सी, ताक, कैरीचे पन्हे, लिंबू पाणी इत्यादींचा नियमित वापर करण्यात यावा, अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.