रत्नागिरी (प्रतिनिधी) : सरकारी कर्मचाऱ्यांकडून कामावर केव्हाही या… केव्हाही जा… अशी स्थिती रत्नागिरीत सुरू आहे. विविध कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी देत नाहीत, तर ते ऑफलाइन पद्धतीने हजेरी लावून आपला पगार काढत आहेत. दर महिन्याला हजारो कोटी रुपये शासन यांच्या मानधनावरती खर्च करते; परंतु अधिकारी मात्र वेळेवर उपस्थित नसतात. तसेच अधिकारी रजेच्या अर्जाचेही मोठे गौडबंगाल निर्माण झाले आहे. बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी नसल्याने ऑफलाइन गैरहजर असण्याचा दिलेला अर्ज कालांतराने रद्द केला जात आहे.
शासकीय कार्यालयात कधीही जा, साहेब रजेवर आहेत… साहेब व्हीजिटवरती आहेत… या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी न होता ऑफलाइन पद्धतीने हजेरी होते. अशा अधिकाऱ्यांची हजेरी न घेता मुख्यमंत्र्यांनी हजेरी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. पालकमंत्र्यांकडून मिळणारी सूट यामुळे अनेक अधिकारी कर्मचारी सुस्तावल्याचे चित्र पहायला मिळत आहे. विशिष्ट कार्यालयांचे अनेक कर्मचारी शासकीय वेळेत कार्यालयात उपस्थित नसतात. तसेच शासकीय कार्यालयामध्ये सकाळी येण्याची आणि दुपारच्या जेवणाची तसेच संध्याकाळी ऑफिस सुटण्याची वेळ दिलेली नसल्याचा फायदा अनेकजण घेत आहेत. रत्नागिरी शहरातील आणि परिसरातील असणाऱ्या विविध शासकीय कार्यालयातील बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेतली जात नसल्याचा फायदा अनेकांना होत आहे. तसेच बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी नसल्याने रजेवर असणाऱ्या अधिकाऱ्यांची चांगलेच फावत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून रजेचा टाकलेला अर्ज दिवसभरात वरिष्ठांनी न विचारल्यास तो रद्द करुन ऑफलाइन पद्धतीने मस्टवरती सह्या केल्या जातात. अशा व्यक्तींवरती कोणत्याही प्रकारे कारवाई होताना दिसत नाही.
रत्नागिरीतील अडीचशे ते तीनशे कार्यालयात हा सावळा गोंधळ सुरू असून याकडे मुख्यमंत्र्यांनी कठोर निर्देश देताना बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी आणि पगार अस्तित्वात आणणे गरजेचे आहे. त्यासाठी आयस्कॅनर लावणे गरजेचे आहे. आयस्कॅनरच्या माध्यमातून हजेरी घेतल्यास त्यामध्ये कोणत्याही प्रकारची खाडाखोड किंवा गैरप्रकार येत नाही. अनेक कंपन्यांमधून याचा वापर केला जातो; परंतु शासकीय कार्यालयातून मात्र त्याला खो घातला जात आहे.
रजिस्टरवरही अनेक कर्मचारी नोंदच करत नाहीत. दुपारी जेवायला घरी गेलेला कर्मचारी अधिकारी झोपा काढून चहा पिण्याच्या वेळेवर ऑफिसमध्ये येतो हे थांबण्यासाठी आय स्कॅनर बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात होणे गजरेचे आहे. त्यामुळे कामात टंगळमंगळ करणारे आणि रजेचा अर्ज देऊन नंतर पुन्हा हजेरी हजर असल्याचे दाखवणाऱ्यांवर अंकुश येण्यास मदत होईल.