Sunday, July 21, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरघरकुल बांधकामाच्या मजुरीपासून लाभार्थी वंचित

घरकुल बांधकामाच्या मजुरीपासून लाभार्थी वंचित

अधिकाऱ्यांची दिरंगाई घरकुल लाभार्थ्यांच्या मुळावर

मोखाडा (वार्ताहर) : सर्वांना हक्काचे व पक्कं घर बांधून मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत असून, या योजनेच्या माध्यमातून घरकुल बांधकामासाठी लाभार्थ्यांला १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान व २० हजार रुपये स्वत:च्या घरकुल बांधकामावर रोजगार हमी योजनेतून मजुरी दिली जाते; परंतु जिल्हा ग्रामीण विकास विभागाचे अधिकारी पाटील यांच्या अनास्थेमुळे तालुक्यातील जवळपास पन्नास लाभार्थ्यांना हक्काच्या मजुरीचे पैसे मिळालेले नाहीत.

तालुक्यातील अनेक गाव-पाड्यांतील आदिवासी कुटुंबे आजही गरीब परिस्थितीमुळे राहण्यासाठी हक्काचे पक्कं घर बांधू शकलेले नाहीत, त्यामुळे या आदिवासी कुटुंबांना हक्काची पक्की घरे मिळावीत यासाठी शासन स्तरावर पंतप्रधान आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई घरकुल योजना आदी घरकुल योजना राबविण्यात येत आहेत. या घरकुल बांधकामासाठी खर्च दिला जातो, जेणेकरून घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना स्थानिक ठिकाणीच रोजगार उपलब्ध होईल व स्थलांतरास काही प्रमाणात आळा बसेल़ या चांगल्या हेतूने ही पंतप्रधान आवास योजना मोखाडा तालुक्यात राबविली जात आहे, परंतु याच घरकुल योजनेला पालघर जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास विभागाच्या अधिकाऱ्यांची नजर लागल्याने अनेक घरकुल योजनेचे लाभार्थी घरकुलाचा शेवटचा हप्ता व रोजगार हमी योजनेतून मिळणारी मजुरी मिळण्यापासून गेल्या चार ते पाच महिन्यांपासून वंचित राहिले आहेत.

घरकुल बांधकामावर रोजगार हमी योजनेतून काम केल्याचा वर्क कोड दिसत नसल्याने घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यांवर घरकुलाचा शेवटचा हप्ता व मजुरीचे अनुदान जमा करता येत नसल्याचे प्राथमिक कारण पुढे आले आहे. परंतु पावसाळा सुरू होण्यास काही आठवड्यांचा कालावधी शिल्लक राहिला असून, पावसाळ्यापूर्वी घरकुलाचे काम पूर्ण होणार नसल्याने घरकुल लाभार्थ्यांकडून जिल्हा ग्रामीण विकास अधिकारी धनंजय पाटील यांच्या विरोधात रोष व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामीण विकास अधिकारी धनंजय पाटील यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.

घरकुलाचा शेवटचा हप्ता व रोजगार हमी योजनेची मजुरी मिळावी यासाठी मी डिसेंबर महिन्यापासून पालघर जिल्हा ग्रामीण विकास कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहे. उद्या जमा होतील…परवा होतील… अशी उत्तरे जिल्हा ग्रामीण विकास अधिकारी धनंजय पाटील हे गेल्या चार महिन्यांपासून देत आहेत, परंतु आजपर्यंत मला पैसे मिळालेले नाहीत. पावसाळा तर काही आठवड्यांवर आला आहे, जर अनुदानाचे पैसे मिळाले नाहीतर आम्ही करायचं काय?
– जयराम वाघ, (घरकुल लाभार्थी पोशेरा)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -