Tuesday, July 16, 2024
Homeक्रीडाIPL 2024मुंबईच्या फलंदाजांना रोखण्याचे गुजरातचे लक्ष्य

मुंबईच्या फलंदाजांना रोखण्याचे गुजरातचे लक्ष्य

आयपीएलच्या १६व्या हंगामाची प्ले ऑफ प्रवेशाच्या दिशेने कूच

मुंबई (वृत्तसंस्था) : आयपीएलचा १६वा हंगाम आता प्ले ऑफ प्रवेशाच्या दिशेने कूच करत आहे. त्यामुळे अंतिम चार संघांत पोहोचण्यासाठी स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे. शुक्रवारी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स हे दोन तगडे संघ आमने-सामने येणार आहेत. मुंबईचे फलंदाज सध्या चांगलेच फॉर्मात असून त्यांना रोखण्याचे आव्हान गुजरातसमोर आहे. त्यामुळे मुंबईची फलंदाजी विरुद्ध गुजरातची गोलंदाजी असा थेट सामना होण्याची शक्यता अधिक आहे.

आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील साखळी फेरीतील सामने आता शेवटच्या टप्प्यात आले आहेत. दिल्लीचा अपवाद वगळता उर्वरित ९ संघामध्ये प्लेऑफच्या स्थांनासाठी कडवी झुंज पाहायला मिळत आहे. शुक्रवारी मुंबईविरुद्धचा सामना गुजरातने जिंकल्यास ते थेट प्ले ऑफ मध्ये प्रवेश करतील. अंतिम चार संघांमध्ये प्रवेश करणारा तो पहिला संघ ठरेल. तर दुसरीकडे या सामन्यात बाजी मारल्यास मुंबईचा संघ गुणतालिकेतील आपले स्थान अधिक बळकट करेल. त्यामुळे त्यांनाही या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. कारण उर्वरित संघांचे गुण मुंबईच्या जवळपासच आहेत. यंदाच्या हंगामात मुंबईच्या संघाने निराशाजनक सुरुवात केली. फलंदाजांचे अपयश हेच मुंबईच्या खराब कामगिरीचे कारण ठरत होते. परंतु त्यानंतर मात्र स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला सूर गवसला. त्याला इशान किशन, नेहल वधेरा यांची साथ मिळत आहे. टीम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन हे धाकड फलंदाजही मुंबईला अधूनमधून तारत आहेत. त्यामुळे एकवेळ कमजोर वाटणाऱ्या मुंबईच्या संघाची फलंदाजीच आता त्यांचे बलस्थान झाले आहे. त्यामुळे या धडाकेबाज फलंदाजांना झटपट बाद करण्याचे लक्ष्य गुजरातसमोर असेल. दुसरीकडे गतविजेत्या गुजरातचा संघ ११ पैकी ८ सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानी बेताब बादशहासारखा विराजमान आहे. स्पर्धेची सुरुवात दणक्यात करणाऱ्या या संघाला दिल्लीने मात्र धक्का दिला. १३० धावांचे लक्ष्य गुजरातसारख्या तगड्या संघाला पार करता आले नाही. त्यामुळे तारे जमिनीवर आल्यासारखी गुजरातची अवस्था झाली. मात्र त्यानंतर राजस्थान आणि लखनऊला लोळवत गुजरातने आपले मोठेपण सिद्ध केले. त्यांच्या विजयी हॅटट्रिकच्या आड लयीत असलेला मुंबईचा संघ आहे. गुजरातचा गोलंदाजी ताफा चांगलाच फॉर्मात आहे. त्याच बळावर त्यांनी सर्वाधिक विजय मिळवले आहेत. मोहम्मद शमी, राशिद खान, हार्दिक पंड्या, मोहित शर्मा, नूर अहमद असा तगडा गोलंदाजी अॅटॅक त्यांच्या ताफ्यात आहे. हे गोलंदाज प्रतिस्पर्धी संघाच्या नाकी नऊ आणत आहेत. मुंबईसमोर या गोलंदाजांना सामोरे जाण्याचे आव्हान आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -