Wednesday, March 26, 2025
Homeसंपादकीयरविवार मंथनमन करा रे प्रसन्न

मन करा रे प्रसन्न

  • दृष्टिक्षेप: अनघा निकम-मगदूम
मन नकारार्थी विचारांनी भरलेले असलं, तर त्याचा परिणाम होतोच. म्हणूनच सकारात्मक विचार करण्यासाठी शिकले पाहिजे. ही सकारात्मकता आपणच शोधायची असते, त्यातून जगण्याची प्रेरणा घ्यायची असते. तशी शिकवण देणारे गुरू आपल्याकडे संत, साहित्य यांच्या रूपाने अनेक आहेत.

शरीर दहा इंद्रियांनी भरलेले आहे, असे म्हटले तर मन हे अकरावे इंद्रिय आहे आणि हेच इंद्रिय आपले आयुष्य नियंत्रित करत असते. जे मनात तेच अनेकदा कृतीत घडत असते. मन कसले विचार करत त्यावर हे सगळं निश्चित होत जातं. म्हणूनच ‘मन जाता हैं तो जाने दे मत जाने दे शरीर’ असे संत वाक्य आहे. ते काय उगीच असेल का?

बाह्यमन आणि मनाच्याही मागे असलेले एक मन घेऊन आपण जगत असतो. आजूबाजूला घडणाऱ्या आणि आपल्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक छोट्यातल्या छोट्या घटनेची नोंद आपलं बाह्य आणि अंतर्मन घेत असतं आणि आपल्या आयुष्यावर त्याचा खूप मोठा परिणाम होतो. हा परिणाम इतका टोकाचा असतो की, कधी तो आयुष्य घडवतो, तर कधी बिघडवून म्हणजे कधी-कधी संपवूनसुद्धा टाकतो. एखाद्याकडून प्रेरणा मिळावी, काम किंवा शब्द मनात भिडले की, मनसुद्धा त्याच ऊर्मीत धावू लागतं. मन आनंदित होतं, पण कुणाचे शब्द लागले, काही गोष्टी खटकल्या की, मनात त्या घर करून बसतात आणि त्यातून जगण्याची ऊर्मी हरवूनसुद्धा जाते, जगावंसं सुद्धा वाटत नाही, इतका मोठा प्रभाव हा मनावरील होणाऱ्या परिणामांनी होतो.

आपलं आयुष्य अशाच परिणामांनी घडत असतं. आपलं व्यक्तिमत्त्व असंच घडतं असतं. आपलं बाह्य आणि अंतर्मन आपलं आयुष्य घडवत असतात. म्हणूनच अनेकांनी सांगितलं आहे, चांगला विचार करा, सकारात्मक विचार करा. जग बदललं आहे. एका क्षणात अनेक घटना घडत असतात. त्यात काळालाही मागे टाकेल, असा जीवनाचा वेग वाढला आहे. क्षणार्धात आयुष्य बदलत आहे. या वेगाच्या आणि काळाच्या स्पर्धेत अनेक विपरित घटना घडत असतात. मनुष्याच्या भौतिक सुखाच्या हव्यासात मूल्ये, नीतिमत्ता हरवून गेली आहे. हीच मूल्ये आणि नीतिमत्ता जीवनावर परिणाम करत असतात. मात्र तिचेच अवमूल्यन होत असल्याने आणि नकारार्थी घटना सातत्याने वाढत असल्यानेच मानवी जीवनावर त्याचा परिणाम होत आहे.

पण ज्या सुख नावच्या गोष्टीसाठी हे सगळं घडत आहे, ते एकदा मिळालं की, उपभोग घेता येईल का? अशी परिस्थिती आहे. अशा वेळी मन नियंत्रित हवे, ते नकारार्थी विचारांनी भरलेले असलं, तर त्याचा परिणाम होतोच. म्हणूनच सकारात्मक विचार करण्यासाठी शिकले पाहिजे, खऱ्या अर्थाने शिकले पाहिजे आणि तशी शिकवण देणारे गुरू आपल्याकडे संत, साहित्य यांच्या रूपाने अनेक आहेत. अगदी नामस्मरण करणे म्हणजेच मनाची सकारात्मक विचारांची मशागत करण्यासारखे आहे. म्हणूनच समर्थ रामदास स्वामींनीसुद्धा मनाचे श्लोक लिहिले आहेत, मनाला नियंत्रित केले, त्याला शिस्त लावली, तरच आयुष्य मार्गी लागते म्हणूनच ‘मन करा रे प्रसन्न!’

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -