Saturday, July 20, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सदानी बना, महादानी बना, वरदानी बना

दानी बना, महादानी बना, वरदानी बना

  • प्रासंगिक : नूतन रवींद्र बागुल (ब्रह्माकुमारी गामदेवी)

मनुष्यप्राणी जेव्हा जीवनात केवळ स्वतःसाठी झिजतो तेव्हा ते म्हटले जाते सामान्य जीवन. पण जेव्हा देह होतो चंदनाचा असे म्हटले जाते, अर्थात मनुष्य आपल्या परोपकारी वृत्तीमुळे, कृतीमुळे सतत दुसऱ्यांच्या कामी येतो, तेव्हा ते असते असामान्य जीवन. खरे पाहता मनुष्य जीवनाची इमारत ही सत्कर्मांच्या बळावरच उभी असते. दान हे देखील सत्कर्माचे एक उत्कृष्ट स्वरूपच आहे.

ऐसी कळवळ्याची जाती ।। करी लाभाविण प्रीती।।
दुसऱ्यांच्या व्यथेला, वेदनेला जाणून संसाररूपी उन्हाने तप्त झालेल्या लोकांसाठी प्रेमरूपी, वात्सल्यरूपी सावली देणारं झाड जरूर बनावं. ही भावना केवळ संवेदनशील व्यक्तीच्या हृदयात उत्पन्न होते. त्यावेळी मनाला करुणतेचा स्पर्श होतो, त्यातून जी सेवा घडते तेच दानाचे प्रकट रूप होय.
श्रीमद् भगवद्गीता देखील सांगते, दान हा एक दैवी गुण आहे. महाभारत म्हणते –
अद्रोहः सर्वभूतेषु कर्मणा मनसा गिरा।
अनुग्रहस्थ दानं च एष धर्मः सनातनः।
अर्थात कोणत्याही जीवाचा मत्सर करू नये. सर्वांवर कृपा करावी व सर्वांना ही चांगल्या गोष्टीचे दान द्यावे, हाच सत्पुरुषांचा सनातन धर्म आहे. निरपेक्ष वृत्तीने केलेले दान हे सात्त्विक दान म्हटले जाते. जे दान परतफेडीची अपेक्षा ठेवून किंवा संकुचित वृत्तीने दिले जाते ते राजसिक दान म्हटले जाते व अपात्र व्यक्तीला अनादरासहित दिले जाणारे दान हे तामसिक दान म्हटले जाते.

एक मात्र खरे दानाचा गाजावाजा मात्र नसावा. या हाताने दिलेले दान त्या हातालाही कळू दिले जाऊ नये याला म्हणतात, उत्तम दान. एक सुविचार आठवतो. तुम्ही या विशाल जगतासाठी जे कराल ते कधीही फुकट जाणार नाही आणि हृदय ओतून द्याल तर त्याची किंमतच करता येणार नाही. कारण खरा आनंद हा केवळ देण्यात असतो. म्हणून दानाची महती अगाध आहे.

हस्तस्य भूषणम् दानं सत्यं कंठस्य भूषणम्।
श्रोत्रस्य भूषणम् शास्र्ं भूषणैः की प्रयोजनम्।
या सुभाषिताचा अर्थ होतो – बंधूंनो, हाताचे भूषण दान आहे. कंठाचे भूषण सत्य बोलणं आहे. कानाचे भूषण शास्त्र म्हणजेच ज्ञान श्रवण करणं आहे आणि असे असेल, तर या नरदेहाला अलंकृत करण्यासाठी आणखी वेगळ्या कृत्रिम आभूषणाची काय बरी आवश्यकता? म्हणूनच प्रत्येकाने सतत दुसऱ्याला काहीतरी चांगलं देण्याची सवय लावलीच पाहिजे. देणारा तो देवता! कोणत्या देवी देवतांचे चित्र पाहा! त्यांच्या चित्रातूनच त्यांच्या चरित्राचे दर्शन घडते. प्रसन्न मुद्रा व आपल्या वरदानी हातांनी सदैव आशीर्वाद देण्यासाठीच ते जणूकटी बद्ध असतात.

या स्थूल जगात दान करता येण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. अन्नदान, जलदान, वस्त्रदान, रक्तदान, भूदान, गोदान, नेत्रदान, देहदान, यांना स्थूल दान म्हटले जाते. शुभ भावना, शुभकामना यांचा अंतर्भाव असलेले शांती व प्रेमाचे दान यास सूक्ष्म दान म्हटले जाते. संपूर्ण विश्व हे माझे कुटुंब आहे या भावनेमुळे विश्व कल्याणाची निरंतर तळमळ ज्यांना लागते ते या बहुमोल कार्यासाठी आपला बहुमोल समय प्रदान करतात, त्याला समयदान म्हटले जाते. महर्षी चरकांनी तर आरोग्यदानाला सर्वश्रेष्ठ दान म्हटले आहे. भुकेलेल्या व्यक्तीला अन्नाचे दोन घास भरवल्यास उपाशी व्यक्तीचा आत्मा संतुष्ट होऊन त्याच्या मुखाद्वारा आशीर्वादाचे बोल बाहेर पडतात.

आपल्या देशात दानाची थोर परंपरा ही प्राचीन काळापासून चालत आली आहे. महाभारतातील कर्ण म्हणजे दानशूरतेचा आदर्श. कर्णाचे जीवन त्यागाचे व औदार्याचे प्रतीक आहे. कुरुक्षेत्रावरील कौरव पांडवांच्या युद्धाचा प्रसंग आठवतो. अर्जुनाने सोडलेला अंजलीक बाण, त्याच्या प्रहाराने घायाळ झालेला कर्ण रक्ताच्या थारोळ्यात प्राणांतिक वेदनेने विव्हळत असलेला. सर्व योद्धे कर्णाच्या भोवती जमलेले. अगदी त्याचवेळी कोणी एक वृद्ध याचक युद्धात मारल्या गेलेल्या आपल्या पुत्राच्या अंत्यविधीच्या क्रियेसाठी पैशांची मदत मागण्यासाठी आलेला. त्या गरीब वृद्ध ब्राह्मणाकडे कुणीच लक्ष देत नाही. पण, कर्णाच्या कानी मात्र त्याही अवस्थेत त्याचा आवाज पडतो. स्वतःच्या आत्यंतिक दुःखद वेदनेला विसरून कर्ण आपला पुत्र चित्रसेन यास त्या याचकास बोलवण्यास सांगतो. रणभूमीवरची अंतिम अवस्था. अंतिम क्षण जवळ आलेला असतानाही देण्याची भावना त्याच्या मनात जन्म घेते. काय द्यावे हा विचार त्याच्या मनात फिरू लागतो. अधिक विचार करता त्याला आपल्या तोंडातील सोन्याचा दात आठवतो. चित्रसेनास तो दगड आणावयास सांगतो व आपल्या तोंडातील दात त्या दगडाने पाडण्याचा आदेश आपल्या पुत्राला देतो. पितृ इच्छेखातर नाईलाजाने का असेना चित्रसेन सांगितलेले कर्म करतो. कर्ण आपल्या अश्रुधारांनी रक्ताने माखलेला दात स्वच्छ धुऊन प्रसन्न मुद्रेने ब्राह्मणाच्या हाती ठेवतो.

मृत्यूच्या दारी असूनही गरजवंताला शक्य तेवढी व जमेल तेवढी मदत करावी, कोणासही रिकाम्या हाताने पाठवू नये, अशा अविनाशी विचारांचा धनी असणारा कर्ण हा भारतीय संस्कृतीतील भव्यता, उदारता, धीरोदात्तता, संवेदनशीलता, त्याग यांचे प्रतिनिधित्व करतो.

संत कबीर म्हणतात –
धन रहे ना जौबन रहे, रहे छाँव ना धाम।
कबीर जग में जस रहे, कर दे किसीका काम।
माणसांचे सुंदर आकर्षक शरीर, त्यांचे तारुण्य, त्यांचे प्रशस्त निवासस्थान, त्यांची कमावलेली धनसंपदा यापैकी शाश्वत चिरंतन टिकेल, असं काहीही नाही. त्यामुळे आपलं जीवन इतरांसाठी कसं मार्गदर्शक ठरू शकेल, यावर लक्ष केंद्रित करावं. सर्वजण यथाशक्ती दान करतातही. पण आपण केलेल्या दानाचा प्रभाव आपल्या जीवनावर कसा पडतो, हे नेमके माहीत आहे का? ईश्वरीय ज्ञानानुसार यथार्थ दान तेच असते ज्या दानाने देणारा व घेणारा या दोघांचाही जीवन चंद्रमा चढत्या कलेत प्रवेश करतो. थोडक्यात उभयतांचे जीवन सर्वकाळ सुखमय होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -