Wednesday, April 23, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यआपल्याला खड्ड्यात घालणारे लोक कसे ओळखायचे?

आपल्याला खड्ड्यात घालणारे लोक कसे ओळखायचे?

  • फॅमिली काऊन्सलिंग: मीनाक्षी जगदाळे

आपण खूपदा अनुभवतो की, आपली इच्छा नसताना पण आपण मनाविरुद्ध जावून वागतोय, आपल्याला न पटणारे निर्णय घेतो, अनेकदा आपल्या इच्छेविरुद्व आपणच झुकतो आणि पुढे जावून त्या निर्णयामुळे त्या त्या वेळच्या वागणुकीमुळे आपल्याला भविष्यात खूप पश्चाताप होतो. आपलं नुकसान होते, मनस्ताप होतो, आपण मानहानी आणि बदनामीला सामोरं जातो. असं का झालं? हा विचार आपण जेव्हा करतो, तेव्हा अनेकदा खूप उशीर झालेला असतो, वेळ निघून गेलेली असते. आपल्याला जाणीव होते की, आपलाच निर्णय चुकीचा होता, आपली कृती, काम, व्यवहार, वागणे, बोलणे, संगत काहीतरी चुकीचे झाले होते त्याचे हे परिणाम आहेत. आपण चुकीच्या विचारांच्या प्रभावात होतो, चुकीच्या माणसांशी सातत्याने संपर्क आल्यामुळे, दिशाभूल करणाऱ्या लोकांच्या संगतीत राहिल्यामुळे आपल्यावर ही परिस्थिती आलेली आहे.

अशा वेळी जर आपण भूतकाळात डोकावलं तर लक्षात येतं की, आपण कोणाच्या तरी सांगण्यावरून, चुकीचा सल्ला ऐकून, दबावाखाली अथवा स्वतःच्या इच्छेविरुद्व जावून काही गोष्टी केल्या, कोणाच्या तरी सांगण्याच्या, बोलण्याच्या आहारी जावून आपण निर्णय घेतला आणि आज त्याचे नकारात्मक परिणाम आपल्याला दिसत आहेत. आपण चुकलो आहोत, आपलं नुकसान झाले आहे किंवा आपल्याला त्यामुळे त्रास होतो आहे. त्यावेळी केलेले चुकीचे कृत्य कितपत गंभीर होते, चुकीचा निर्णय कितपत मोठा आणि परिणामकारक होता, यावर आपली आजची झालेली अवस्था अवलंबून असते. ज्यांचं ऐकून आपण हे निर्णय वेळोवेळी घेतले होते किंवा ज्यांच्या अमलात आपण होतो ती माणसं तर स्वतःच सगळं सांभाळून आहेत, त्यांचं कोणत्याही स्वरूपाचं नुकसान झालेलं नाही, त्यांचं काहीच बिघडलं नाही मग आपण कसं चुकलो, कुठे चुकलो?

अशा प्रकरणातून झालेलं नुकसान अनेकदा भरून न येणारे असते. आपल्या पूर्ण आयुष्याला कलाटणी देणारे असते अथवा आपल्याला खोलवर न भरून निघणाऱ्या मानसिक, भावनिक आर्थिक जखमा देणारी असते. भूतकाळात घडलेल्या गोष्टी तर आपण बदलू शकत नाही. पण भविष्यात आपल्याकडून चुका होणार नाही, याची आपण निश्चित काळजी घेऊ शकतो. यासाठी आपण पहिले हे लक्षात घेतले पाहिजे की, आपल्याला चुकीचा रस्ता दाखवणारे, चुकीचे निर्णय घ्यायला प्रवृत्त करणारे, अयोग्य सल्ले देणारे आपल्या आजूबाजूला कोण लोक आहेत? कोणाशी बोलताना असं जाणवतं, समजते की या व्यक्तीमुळे भविष्यात आपण गोत्यात येऊ शकतो अथवा आपल्याला ही व्यक्ती सांगते तसं वागल्यास खूप मोठी किंमत मोजावी लागू शकते. यासाठी आपण काही मुद्दे कटाक्षाने लक्षात घेणे आवश्यक आहे.

सर्वसाधारणपणे ज्या व्यक्ती आपल्याला चुकीचे आर्थिक व्यवहार करायला भाग पाडतात अथवा चुकीच्या आर्थिक व्यवहारात आपली साथ देतात त्यांना अजिबात जवळ करू नये. आपण जेव्हा आर्थिक अडचणीत येतो तेव्हा कोणीही आपल्याला मदत करत नसते. त्यामुळे आपली आर्थिक बाजू कोणाच्याही आहारी न जाता भक्कम ठेवणं अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्या व्यक्ती आपल्याला आपल्या कुटुंबापासून तोडण्याचा, दूर नेण्याचा प्रयत्न करतात, आपल्याला एकटं राहण्याचा, चांगल्या लोकांपासून लांब राहण्याचा सल्ला देतात त्यांच्यापासून सावध राहावे.

अशा व्यक्ती ज्या आपल्याला आपली कोणतीही स्थावर मालमत्ता, प्रॉपर्टी विकायचे सल्ले देतात त्यांना आयुष्यात थारा देणे योग्य नाही. ज्या तुम्हाला मोठ्या प्रमाणात कर्ज काढण्याचे सल्ले देतात, मोठे भांडवल गुंतवून अनुभव नसताना कोणताही उद्योग व्यवसाय सुरू करायला भरीस घालतात, त्यांच्यापासून सांभाळून राहावे. हातातले चांगले काम, चांगली नोकरी अथवा आपली सुरू असलेली रोजी-रोटी सोडून जे आपल्याला भलतंच काहीतरी करायला भाग पाडतात, मोठी परंतु खोटी स्वप्न दाखवतात, आपल्याला फक्त आश्वासने देतात, वचन देतात पण प्रत्यक्षात आपल्यासाठी काहीच करीत नाहीत अशा व्यक्ती घातक असतात.

ज्या व्यक्ती आपल्याला व्यसनाकडे नेतात, वाम मार्ग दाखवतात, अधिकाधिक वायफळ खर्च कोणत्याही कारणास्तव करण्यासाठी प्रवृत्त करतात, आपला प्रमाणापेक्षा जास्त आर्थिक गैरफायदा घेतात, आपल्या खर्चाला कुठेही लगाम घालायचा प्रयत्न करीत नाहीत, त्यांना आयुष्यात अजिबात थारा देऊ नये. ज्या व्यक्ती आपल्याला चुकीचे मित्र-मैत्रिणी, संगत यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करतात, कुटुंब, समाजाच्या प्रवाहाविरुद्ध जावून काही करायला भाग पाडतात, आपल्याला गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना जवळ करू नये.

ज्या व्यक्ती आपल्याला सतत ‘इमोशनल ब्लॅकमेल’ करून आपल्याकडून त्यांच्या मनासारखे घडवून आणतात, आपल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य आपले प्राधान्य यापासून आपल्याला परावृत्त करतात, आपले स्वतंत्र विचार हिरावून घेतात, सतत आपल्याला त्यांच्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतात, ते कधीच आपले हितचिंतक नसतात. ज्या व्यक्ती आपली कुटुंबात, समाजात, चारचौघांत मान खाली जाईल, असे आपल्यासोबत वागतात, आपली पत- प्रतिष्ठा जपू शकत नाहीत, ज्या आपली सामाजिक प्रतिष्ठा धोक्यात येईल, असे वर्तन करतात ते आपले कधीच नसतात. समाजात, कुटुंबात ज्यांच्यासोबत वावरताना आपल्याला लाज वाटेल, अथवा समाजात जे लोक सोबत असल्यामुळे आपली बदनामी होईल, त्यांना आवर्जून लांब ठेवावे. ज्या व्यक्तींच्या सहवासात राहिल्यामुळे समाजात आपली नाचक्की होते, आपल्या कुटुंबात ज्या व्यक्ती अप्रिय असतात, ज्यांच्यामुळे आपल्या जवळील व्यक्तींना त्रास होतो त्यांना आयुष्यात प्रवेश नसावा. अशा लोकांना अति जवळ करणं म्हणजे स्वतः कुटुंबाला दूर लोटण्यासारखं आहे.

ज्या लोकांना आपण चुकतोय, भरकटतोय हे समजून पण आपल्याला अडवत नाहीत, थांबवत नाहीत, ते कधीच आपले नसतात. जे आपल्याला जास्तीत जास्त चुका करू देतात, आपण चुकताना अलिप्त राहतात, आपल्याला परिणामांची जाणीव करून देत नाहीत, जे लोक वेळप्रसंगी आपल्या भल्यासाठी कटू बोलून पण आपली कानउघाडणी करत नाहीत, अशी लोकं फक्त आपली मजा बघत असतात. आपल्या चुकीच्या वागणुकीत, कृत्यात पण जे साथ देतात ते आपल्यासाठी त्रासदायक ठरतात. जे आपल्या चुका सतत झाकतात, आपल्या वाईट वर्तवणुकीत पण पाठराखण करतात, सगळ्याच परिस्थितीमध्ये आपल्यासोबत असल्याचा दिखावा करतात, आपल्या अवगुणांची वकिली आणि समर्थन करतात, आपल्या चुका सतत झाकतात, आपलं नुकसान होत असताना जे बघ्याची भूमिका घेतात, ते आपल्याला फक्त गोड बोलून, नाटकी वागून वेड्यात काढत असतात, असे लोक वाईट प्रसंगात पण आपल्यासोबत आहेत हा निव्वळ देखावा करून आपली पाठराखण करत राहतात. कारण त्यांना आपलं कोणत्याही स्वरूपाचं नुकसान झालं तरी काहीही देणं-घेणं नसते.

जे स्वतःकडे वाईटपणा घेऊन पण आपल्याला आपल्या भल्यासाठी कधीही चांगला सल्ला देत नाही, अशी लोकं खतरनाक सिद्ध होऊ शकतात. तोंडावर गोड बोलणारी, खोटं वागणारी, चुकीचा हेतू मनात आसखेली माणसं आपण जवळ करतो आणि त्यांच्या नादी लागून स्वतःच नुकसान करून घेतो. त्यामुळे आपल्याला वेळोवेळी हे पारखून घेणे खूप आवश्यक आहे की, कोणाचा किती प्रभाव आपल्या आयुष्यात असावा, कोणाच्या किती आहारी जावे आणि कुठे थांबावे.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -