५ धावांनी धक्कादायक विजय
अहमदाबाद (वृत्तसंस्था) : अमन हकीम खानच्या झुंजार अर्धशतकामुळे अवघ्या १३० धावा करूनही मोक्याच्या क्षणी घेतलेल्या विकेटमुळे दिल्लीने तगड्या गुजरातवर ५ धावांनी धक्कादायक विजय मिळवला. दिल्लीच्या विजयात इशांत शर्मा, खलिल अहमद आणि कुलदीप यादव या तिकडीची गोलंदाजी निर्णायक ठरली.
अवघ्या १३१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सच्या सलामीवीरांनी निराश केले. वृद्धीमान साहाने भोपळाही फोडला नाही, शुभमन गिलही ६ धावा करून माघारी परतला. विजय शंकर आणि डेव्हिड मिलर यांनीही निराश केले. त्यामुळे ३२ धावांवर ४ फलंदाज बाद अशी बिकट अवस्था तगड्या गुजरातवर आली. त्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने फलंदाजीची सूत्रे हाती घेत गुजरातला विजयी मार्गावर नेले. त्याला सुरुवातीला अभिनव मनोहरने साथ दिली. अभिनवला २६ धावा जोडता आल्या. अभिनव बाद झाल्यावर राहुल तेवतियाने पंड्याला साथ देत गुजरातला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. परंतु शेवटच्या षटकांत दिल्लीने केलेल्या अप्रतिम गोलंदाजीमुळे गुजरातला पराभवाचा चेहरा पहावा लागला. गुजरातला २० षटकांत ६ फलंदाजांच्या बदल्यात १२५ धावांपर्यंतच रोखण्यात दिल्लीला यश आले. दिल्लीच्या इशांत शर्मा, खलिल अहमद यांनी धावा रोखण्यासह प्रत्येकी २ विकेट मिळवल्या. तर कुलदीप यादवने ४ षटकांत अवघ्या १५ धावा देत एक विकेट मिळवली.
प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरूवात खराब झाली. त्यांचा सलामीवीर फिलिप सॉल्ट पहिल्या चेंडूवर बाद झाला. मोहम्मद शमीने त्याला भोपळाही फोडू दिला नाही. त्यानंतर दुसऱ्या षटकात राशिद खानने डेव्हिड वॉर्नरला २ धावांवर बाद केले. शमीचा धडाका काही थांबण्याचे नाव घेत नव्हता. तिसऱ्या षटकातही गुजरातला विकेट मिळवण्यात यश आले. ८ धावा करणाऱ्या रिले रुसोला शमीने माघारी धाडले. त्यानंतर मनिष पांडे प्रियम गर्ग यांनाही मैदानात थांबता आले नाही. अवघ्या २३ धावांवर दिल्लीचे सुरुवातीचे ५ फलंदाज बाद झाले होते.
अशा संकट काळात अक्षर पटेल आणि अमन खानने संघाचा डाव सावरला. दोघांनी सहाव्या गड्यासाठी ५० धावांची भागीदारी केली. अमन खानने संघातर्फे सर्वाधिक ५१ धावांची खेळी खेळली. त्याला अक्षर पटेल आणि रिपल पटेल या दुकलीने छान साथ दिली. अक्षरने २७ आणि रिपलने २३ धावांची भर घातली. या तिकडीच्या खेळीमुळेच दिल्लीने निर्धारित २० षटकांत ८ फलंदाजांच्या बदल्यात कशीबशी १३० धावांपर्यंत मजल मारली. गुजरातच्या मोहम्मद शमीने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने ४ षटकांत अवघ्या ११ धावा देत ४ विकेट मिळवल्या.