Monday, March 24, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखनैराश्यग्रस्त मविआचा मुंबईत थयथयाट

नैराश्यग्रस्त मविआचा मुंबईत थयथयाट

संविधान वाचविण्यासाठी आणि राज्यात सत्तेवर असलेल्या एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीसांच्या सरकारविरोधात संताप प्रकट करण्यासाठी ‘उबाठा’ सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षांच्या महाआघाडीने मुंबईत बीकेसीवर महाराष्ट्र दिनाला वज्रमूठ सभा योजली होती. छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे झालेल्या महाआघाडीच्या सभेनंतर मुंबईची सभा झाली. मोठा गाजावाजा करून झालेली महाआघाडीची शिवसेना- भाजप विरोधातील ही सभा कदाचित शेवटी असू शकेल, असे राजकीय भविष्यही काही अभ्यासकांनी व्यक्त केले होते. वज्रमूठ सभेत मुठी आवळून आणि हात उंचावून अगदी मोदी-शहांना इशारे देणारी भाषणे झाली. आपण कोणावर कोणत्या भाषेत टीका करीत आहोत, याचे भान विशेषत: उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विसरले असावेत. मुळात वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी)मधील एका लहानशा मैदानावर महाआघाडीची सभा योजली होती. पक्षाच्या वतीने शाखा-शाखांना बसेस भरून गर्दी जमविण्याचे टार्गेट दिले होते. प्रत्यक्षात अनेक बसेसमध्ये लोक जमवतानाही कठीण गेले. तीच भाषणे, तेच आरोप किती वेळा ऐकायचे, म्हणून लोकही कंटाळले आहेत. माझा बाप चोरला ही कॅसेट तर प्रत्येक सभेत वाजवली जात आहे. उद्धव ठाकरे, अजित पवार, जयंत पाटील, नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात अशा दिग्गजांनी हात उंचावून वज्रमूठ भक्कम असल्याचा आव आणला. पण प्रत्यक्षात या सर्वांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. शिंदे-फडणवीसांचे सरकार येऊन दहा महिने झाले, पण सरकार पडत नाही, बदल होत नाही, त्यातच अजित पवार आमदारांच्या गटासह भाजपशी जमवून घेणार म्हणून गेले काही दिवस रोज मथळे झळकत आहेत. त्यामुळे महाआघाडीच्या भवितव्याबाबत आणखीनच संभ्रम निर्माण होत आहे.

संविधान वाचविण्यासाठी म्हणे महाआघाडीची वज्रमूठ सभा, असा रस्त्यावरील फलकांवरून मोठा गाजावाजा केला गेला. प्रत्यक्षात बीकेसीच्या सभेत ज्या नेत्यांची भाषणे झाली त्यांनी कोणीही संविधान संकटात आहे, संविधान वाचविण्यासाठी आम्ही सारे एकत्र आलो आहोत असे कोणीही सांगितले नाही. मग ‘संविधान बचाव’ असे वर्णन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेचा आधार या सभेसाठी कशासाठी घेण्यात आला? आपली सत्ता गेली म्हणून प्रत्येक सभेत उबाठा सेना मिंधे सरकार म्हणत शिंदे-फडणवीसांवर टीका करीत आहे. एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, ते तुम्हाला आवडत नसतील, तर विधानसभेत संख्याबळाने त्यांना चीतपट करून दाखवा. पण त्यांना मिंधे म्हणणे हा मुख्यमंत्रीपदाचा व महाराष्ट्रातील जनतेचा अवमान आहे. शिंदे-फडणवीस हे उदार व दिलदार मनाचे आहेत. म्हणूनच पोलिसांनी अजून मिंधे, गद्दार असे हिणवणाऱ्यांवर अजून गुन्हे दाखल केलेले नाहीत.

मुंबईची अवहेलना व मुंबईचे वस्त्रहरण थांबविण्यासाठी वज्रमुठीचा ठोसा मारा, असे आवाहन पक्षप्रमुखांनी केले. एवढेच नाही तर अमित शहा यांना महाराष्ट्राची जनता जमीन दाखवून देईल, असा इशाराही त्यांनी दिला. मी मातोश्रीत थांबणार, जनतेने अमित शहांना जमीन दाखवावी, असे त्यांचे सांगणे आहे. गेल्या काही सभांमधून ते जाहीरपणे सांगतच आहेत, आता माझ्याकडे तुम्हाला काही देण्यासारखे नाही, पण तुम्ही लढत राहा,… जेव्हा सत्तेवर होते, तेव्हा कुणाला भेटत नव्हते. शिवसैनिकांचे काही भले केले, त्यांना रोजगार दिला, निदान शाखा तरी भक्कम केल्या किंवा पक्ष संघटनेला ऊर्जा दिली, असे कधी घडले नाही. मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल याची कॅसेट ते पुन्हा वाजवत आहेत, पण अशा गुळगुळीत झालेल्या कॅसेटचा लोकांवर काही परिणाम होत नाही. राजकीय स्वार्थासाठी मुंबईचे लचके तोडणार अशी वेळोवेळी आवई उठवली जाते व आपणच मुंबई वाचवत आहोत, असे ते सांगत असतात.

तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी आपण मुख्यमंत्री असताना बारसूची जागा केंद्राला प्रस्तावित केली, अशी कबुलीच उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून दिली. मग तेच ठाकरे आता दुटप्पी का भूमिका घेत आहेत, म्हणे जनतेला मान्य असेल तरच प्रकल्प करावा असे ते सांगत आहेत. मग त्यांनी केंद्राला लिहिलेल्या पत्रात तसे स्पष्ट का म्हटले नाही? केंद्राला पत्र पाठवताना त्यांनी शरद पवारांशी सल्लामसलत केली होती का? हेही ते सांगत नाहीत. बारसूबाबत पवारांची भूमिका वेगळी आणि ठाकरेंची भूमिका वेगळी ही महाघाडीत मतभिन्नता नाही का? सर्वात कहर म्हणजे, चीनच्या राष्ट्राध्यक्षांना हिम्मत असेल तर ईडीची नोटीस पाठवा, अशी अजब मागणी ठाकरे यांनी मोदी सरकारकडे केली. अडीच वर्षे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसलेल्या व्यक्तीला ईडीची नोटीस कोणाला पाठवली जाते, हे कळत नसेल तर त्यांच्या क्षमतेविषयी काय बोलावे? आपल्याबद्दल भाजपमधील काहीजण वाट्टेल ते बोलतात, असे म्हणताना मोदींनी त्यांना आवारावे अशी अपेक्षा व्यक्त करतात. विरोधी पक्षाच्या मोर्चावर पोलिसांच्या लाठ्या चालवायच्या नाहीत असा सल्ला शिवसेनाप्रमुखांनी युतीचे सरकार आल्यावर दिला होता, अशी त्यांनी आठवण सांगितली. मग कंगना राणावतच्या घरावर बुलडोझर चालवताना, केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यावर पोलीस बळाचा वापर करताना, ज्येष्ठ संपादक अर्णव गोस्वामी यांना घरातून फरफटत नेऊन त्यांना अटक करताना शिवसेनाप्रमुखांच्या संस्काराची ठाकरे यांना सत्तेवर असताना आठवण का झाली नाही? वज्रमूठ सभेत सर्वच नेत्यांनी राणा भीमदेवी थाटात भाजप व शिवसेनेच्या विरोधात भाषणे केली, पण चोवीस तासांच्या आतच शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली, हा योगायोग म्हणावा काय?

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -