
देहराडून : चारधाम यात्रा (Chardham Yatra 2025) येत्या ३० एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे. या यात्रेसाठी मागील महिन्यापासूनच यात्रेकरुंची नोंदणीप्रकिया सुरु झाली आहे. आतापर्यंत १८ लाखांहून अधिक यात्रेकरूंनी नोंदणी केली आहे. यामध्ये ६० टक्के नोंदणी ऑनलाईन केली असून ४० टक्के ऑफलाईन नोंदणी करण्यात आली आहे. मात्र ऑनलाईन बुकींगदरम्यान स्कॅमर्सचा सुळसुळाट झाला आहे. स्कॅमर्स चारधाम यात्रेकरू आणि पर्यटकांना लक्ष्य करत त्यांची मोठी फसवणूक (Online Booking Scams) करत असल्याचे उघडकीस आले आहे.

बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आणि १० पेक्षा जास्त ...
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने एका अलर्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे. या फसवणुकीत, व्यावसायिक दिसणाऱ्या पण बनावट वेबसाइट, सोशल मीडिया प्रोफाइल आणि व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून विविध सेवांचा दावा केला जात आहे. यामध्ये केदारनाथसाठी हेलिकॉप्टर बुकिंग, चारधाम यात्रेकरूंसाठी गेस्ट हाऊस-हॉटेल बुकिंग, ऑनलाइन टॅक्सी आरक्षण, सुट्टीचे पॅकेज आणि धार्मिक पर्यटन यांचा समावेश आहे. या पोर्टलद्वारे पैसे भरल्यानंतर, जेव्हा त्यांना सेवा मिळत नाही, तेव्हा लोकांना कळते की त्यांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने लोकांना वेळीच सतर्क केले असून सावधानतेचा इशारा दिला आहे. (Chardham Yatra Scam)
त्याचबरोबर I4C ने नमूद केले आहे की, हे घोटाळे विशेषतः धार्मिक प्रवासाच्या हंगामात, जसे की मे-जूनमधील चार धाम यात्रा किंवा इतर तीर्थक्षेत्रांच्या मोसमात वाढतात. या काळात तीर्थयात्री आणि पर्यटक मोठ्या संख्येने प्रवासाची योजना आखतात, आणि जलद आणि स्वस्त सेवांच्या शोधात ते या फसव्या ऑफर्सना बळी पडतात.
असे करा फसवणूकीतून संरक्षण :-
- कोणत्याही बुकिंगसाठी पेमेंट करण्यापूर्वी वेबसाइटची प्रामाणिकता तपासा.
- गुगल, फेसबुक किंवा व्हॉट्सअॅपवरील प्रायोजित किंवा अज्ञात लिंक्सवर क्लिक करू नका. या लिंक्समागे फसव्या वेबसाइट्स असण्याची शक्यता असते.
- बुकिंगसाठी फक्त सरकारी वेबसाइट्स किंवा विश्वासार्ह ट्रॅव्हल एजन्सींचा वापर करा. खोट्या ऑफर्सच्या आकर्षणाला बळी पडू नका.
- जर तुम्हाला फसवणुकीचा संशय असेल, त्वरित राष्ट्रीय सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर (www.cybercrime.gov.in) तक्रार नोंदवा किंवा १९३० या हेल्पलाइनवर संपर्क साधा.
- व्यावसायिक दिसणाऱ्या वेबसाइट्सवर आंधळा विश्वास ठेवू नका, आणि पेमेंट करण्यापूर्वी सेवेची खात्री करा. व्हॉट्सअॅप किंवा सोशल मीडियावरून बुकिंग करताना स्रोताची पडताळणी करा.