Tuesday, December 3, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलकरिअरमधील वाटा-वळणे

करिअरमधील वाटा-वळणे

पालकांनी राजरस्त्याने एसी गाडीतून मुलांना पुढे नेऊन सोडण्याचा प्रयत्न जरूर करावा. पण, त्याच वेळी आडवाटेचे रस्ते, चढाचे रस्ते, जंगल वाटा किंवा नवीन पायवाटा यांची ओळख तरी करून द्यावी.

  • विशेष : डॉ. श्रीराम गीत

विविध रस्ते आयुष्यात प्रत्येकाच्या समोर येत असतात. कधी चढाचा रस्ता असतो वा सपाटीचा. उताराचा असतो किंवा आडवळणाचा. जंगलातला असतो, पायवाटेचाही असतो. काही अनोळखी असतात, तर काही रुळलेल्या वाटावरून जाणारे. काही रस्त्यांवर मागाल ती मदत उपलब्ध असते. म्हणजे हॉटेलचे खाणे-पिणे, विश्रांतीला छानसा ढाबा, गरजेनुसार वाटचालीसाठी विविध पद्धतीची वाहने सुद्धा. हात वर केला, तर एखाद्या दुचाकीवर दिवसा लिफ्ट मिळू शकते. रात्रीची वेळ असेल, तर स्लीपर कोचची रातराणीपण उपलब्ध असते. बऱ्या घरचे असाल, तर एसी कारमध्ये ममा – पप्पा तुम्हाला पोहोचवायला तयारच असतात.

कोणता रस्ता, का निवडायचा?

हा लेख वाचताना सुरुवात केली असेल, त्यांना खचितच एसी कारने प्रवास करण्याचा मोह होईल, यात शंका नाही. परीक्षा पण संपलेल्या. पुढच्या वर्षीचे प्रवेश कुठे व कसे घ्यायचे, याविषयी घरात जोरात चर्चा सुरू. वरचे लिहिलेले सर्व रस्त्यांचे वर्णन त्या संदर्भात आहे. ते जितके केजीच्या प्रवेशासाठी आहे, तसेच दहावीनंतरच्या कॉलेजसाठी पण लागू पडते. इतकेच काय बारावीनंतरचा प्रवेश कुठे व कसा घ्यायचा किंवा मिळवायचा याबद्दलसुद्धा याच गोष्टीतून रस्ता सुरू होतो. एवढेच काय ज्यांच्या हाती यंदा पदवी येणार आहे त्यांना सुद्धा हे लागू पडू शकते.

‘रस्ते निवडीचे निकष’

कोणीही सहजपणे वाहने जाणारा मदत मिळणारा, गरजेनुसार स्वतःच्या वाहनाने पोहोचता येणारा रस्ता निवडणार आहे, सांगायला माझी गरज नाही. पायवाटेने जाण्याची वा स्वतःची पायवाट रुळवण्याची दगदग वा इच्छा सहसा कोणीही व्यक्त करत नसतो. असा हा नेहमीचा रस्ता निवडला, तर मग काय काय होते? रस्त्याला भरपूर गर्दी तर असणारच. रातराणी पाहिजे असेल तर त्याच्यासाठी रिझर्वेशन लागणार. ते नाही मिळाले तर दुप्पट पैसे देऊन घ्यावे लागणार. लिफ्ट देणारा भेटला तरी तुमचे गंतव्य स्थान व त्याने सोडण्याचे ठिकाण वेगवेगळे असणार. ममा आणि पप्पा, त्यांची एसी गाडी हे भाग्य सहसा नशिबात नसते.

रस्त्यातला ट्राफिक जाम, एखाद्या चौकात तीन-चार वेळेला सिग्नलला थांबायला लागले तर होणारी चिडचिड आठवा.

या साऱ्याचा प्रवेशाशी संबंध काय?

एसी गाडीतून केलेला प्रवास म्हणजे इंटरनॅशनल स्कूलला घेतलेली केजीची अॅडमिशन. शाळेत जायचे, पैसे द्यायचे आणि घरी यायचे. चला दहावीपर्यंत आता कसलीच कटकट नाही. एखाद्या टाय-अप किंवा इंटिग्रेटेड कॉलेजमध्ये अकरावीसाठी मिळवलेला प्रवेश. कुठे त्या कॉलेजमध्ये जा? क्लासमध्ये जा? एकाच ठिकाणी सगळे सुखात उपलब्ध. प्रवेशाची सुद्धा कटकट नाही. उलटे आमच्याकडे प्रवेश घ्या म्हणून त्यांचेच फोन सतत येतात.

बारावीनंतर चांगल्या कॉलेज प्रवेशासाठी रांगेत उभे राहण्यापेक्षा बीबीए करून टाकू तेही खासगी विद्यापीठातच. स्वायत्त संस्थेतच इंजिनीअरिंगला जाऊ, म्हणजे सीईटीची कटकटच नाही. नंतर एमएससाठी परदेशी जायचे ठरले आहेच, असे म्हणणाऱ्यांचे हे ठरलेले रस्ते असतात. पण, हे सारे करत असताना ‘स्पर्धा’, हा विषय संपूर्णपणे टाळला जातो. त्याकडेच विद्यार्थी व पालकांचे सातत्याने लक्ष एकवटलेले राहते. आयुष्यात स्पर्धा ही अटळ असते. ती टाळलेला मुलगा जेव्हा पदवीधर होतो, नोकरीला लागतो, काम करायला सुरुवात करतो, त्यावेळी पुन्हा ती नव्याने समोर उभी ठाकते. स्पर्धेमध्येच खऱ्या अर्थाने प्रत्येकाचा कस लागत असतो.

बीबीए झाल्यावर एमबीए प्रवेश परीक्षेकरिता, इंजिनीयर बनल्यावर मुलाखतीमध्ये, विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना तोंड देताना पालकांनी अलगद आणून पोहोचवलेली मुले अपयशाची पहिली चव चाखतात. त्याची वयाच्या एकविशीपर्यंत कधीच ओळख झालेली नसते. स्पर्धेला तोंड कसे द्यायचे, हे प्रत्येकाने शिकायलाच हवे. तिला टाळून आयुष्यात कोणालाच पुढे जाता येत नाही. कारण, पुढे जायचे असेल, तर कोणाला तरी मागे टाकावेच लागते. करिअरमध्ये प्रगती करत असताना कायमच पिरॅमिडचे वरचे टोक खुणावत असते. सुरुवात तर पायापासून करायची असते. इथे जिंकणे किंवा हरणे असा विषय नसून टिकून राहण्यासाठी अनेक गुणांची गरज असते. पहिला म्हणजे चिवटपणा. दुसरा कौशल्ये वाढवणे. तिसरा सतत नवीन शिकत राहणे. अपयशाला तोंड कसे द्यायचे म्हणजेच आयुष्य हे ज्याला कळते तोच पिरॅमिडच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचतो.

पालकांनी राजरस्त्याने एसी गाडीतून मुलांना पुढे नेऊन सोडण्याचा प्रयत्न जरूर करावा. पण, त्याच वेळी आडवाटेचे रस्ते, चढाचे रस्ते, जंगल वाटा किंवा नवीन पायवाटा यांची ओळख तरी करून द्यावी. यातील प्रत्येक वाटेचा अनुभव वेगळा असतो. जंगलात रस्ता लक्षात ठेवावा लागतो, नाहीतर माणूस हमखास चुकतो. पायवाटेवर चालताना पाय मुरगळण्याची शक्यता असते. आई-वडील नेहमीच पाठीशी असतात. पण, मुले जेव्हा नोकरी-व्यवसायात लागतात, तेव्हा आई-वडील कधीच उपयोगी पडत नाहीत. न आवडणारे काम, न आवडणारा पगार, न आवडणारे सहकारी, नकोसा वाटणारा बॉस आणि फक्त हवे असलेले प्रमोशन, पोझिशन या साऱ्याची सांगड आडवाटेनी, वाटावळणांनी रस्ता घेणाऱ्याला छान घालता येते. आयुष्याचा जोडीदार मिळाला तरी रस्त्याची वाटचाल करताना हे लक्षात ठेवावेच लागते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -