Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीउद्धव ठाकरे झालेत वैफल्यग्रस्त!

उद्धव ठाकरे झालेत वैफल्यग्रस्त!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंड ते पचवू शकत नसल्याची आमदार प्रविण दरेकर यांची टीका

मुंबई : उद्धव ठाकरेंचे भाषण वैफल्यग्रस्त असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंड ते पचवू शकत नसल्याची टीका भाजपचे नेते आणि आमदार प्रविण दरेकर यांनी केली आहे. महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर केलेल्या टीकेला प्रविण दरेकरांनी चोख प्रत्युत्तर दिले.

दरेकर म्हणाले, हिंदुत्वाची भूमिका मांडताना उद्धव ठाकरे हे मी अजूनही हिंदुत्व सोडले नसल्याचे म्हणतात, पण ज्यावेळी सोनिया गांधींच्या मांडीला मांडी लावून बसलात त्याचवेळी तुम्ही बाळासाहेबांचे हिंदुत्व सोडले आहे. अखेर बाळासाहेबांनीच स्पष्ट केले होते की, ज्या दिवशी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसायची वेळ येईल तेव्हा मी शिवसेना पक्षाचं दुकान बंद करेन. मग तुम्ही सांगा की काँग्रेसशी हातमिळवणी हाच बाळासाहेबांचा विचार होता का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंना डिवचले आहे.

तसेच माणसं मोठी करणारी लोकं सोबत आहेत मोठी झालेली गेली असं ठाकरेंनी सांगितलं पण उद्धव ठाकरेंनी एका शिवसैनिकाला किंवा एकनाथ शिंदे यांना त्याचवेळी मुख्यमंत्री का केलं नाही, याउलट स्वत:कडे पद घेऊन मुलालाही मंत्री केलं असल्याचं दरेकरांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना मिळणाऱ्या रक्कमेची तुलना करुन पहा, तुम्हाला समजेल देवेंद्रजींनी शेतकऱ्यांना काय दिलंय. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी एक रुपयांत विम्याची तरतूद फडणवीसांनी केल्याचं त्यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरेंकडून वारंवार गद्दार असा उल्लेख केला जात आहे. पण मागील निवडणुकांमध्ये भाजपशी युती करुनच एवढ्या जागा शिवसेनेने निवडून आणल्या आहेत. ती मतं भाजप सेनेची आहेत. जनतेने काँग्रेस राष्ट्रवादीविरोधात भाजप-सेनेला मतदान केलं होतं. पण तुम्ही सत्तेसाठी भाजपशी युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसलात, मग गद्दार कोण आहे? असा सवालही त्यांनी यावेळी ठाकरेंना केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -