- नॉस्टॅल्जिया: श्रीनिवास बेलसरे
कधीतरी राम येईल, रावणाचा नि:पात करून आपली सुटका करेल, या आशेवर वाट पाहून थकलेल्या सीतेला युद्धाच्या बातम्या कळत होत्या. उद्या रावणाचे आणि रामाचे युद्ध होणार आहे हे कळल्याने तीही बैचेन आहे. इतके दिवस मोठ्या कष्टाने धरून ठेवलेला धीर सुटायची वेळ आली आहे. आजची रात्र युगापेक्षा मोठी भासते आहे.
कोणतीही सरकारी ऑर्डर नव्हती. कुठेही पोलीस दिसत नव्हते. तरीही काश्मीरपासून कन्याकुमारी आणि गुजराथपासून बंगालपर्यंत देशभर कर्फ्यू लागला होता! तसा तो तब्बल वर्षभर लागतच होता! ती ताकद होती एक महान दिग्दर्शकाच्या कलानिष्ठेची! स्व. रामानंद सागर यांची! तेच लावत होते दर रविवारी देशभर कर्फ्यू! आणि या कर्फ्यूचा संबंध थेट रामाच्या नावाशी असूनही केंद्रातले, रामाचे अस्तित्वच न मानणारे, सरकार त्याला अजिबात विरोध करू शकत नव्हते! आठवले ना १९८७-८८चे ते भारलेले दिवस?
रामानंद सागर यांची टीव्ही मालिका ‘रामायण’ दूरदर्शनवर सुरू होती. ‘श्री’ मत कहो उसे!’ अशी अरविंद त्रिवेदी यांच्या दमदार आवाजातली आरोळी, आकाशात एकमेकाला भिडणारे रंगीबेरंगी बाण आणि त्यांचे, रवींद्र जैन यांनी शोधून काढलेले विचित्र पण खरे वाटणारे आवाज. कुमार सानू, कविता कृष्णमूर्ती, अनुराधा पौडवाल, महेंद्र कपूर, सुरेश वाडकर, महंमद अझीझ, नितीन मुकेश, स्वत: रवींद्र जैन, अरुण दांगले, चंद्राणी मुखर्जी अशा अनेक गायकांनी गायलेली शुद्ध हिंदीतली अप्रतिम, अर्थपूर्ण गाणी सर्वांना परिचयाची झाली होती.
जयदेव यांनी लिहून संगीत दिलेले गीत “सीता राम चरित अति पावनस.., मधुर सरस अरू, अति भावन…” घराघरात वाजत होते. मालिका सुरू होताच पडद्यावर येणारा स्व. अशोक कुमारजींचा पडदा व्यापणारा आश्वासक चेहरा, क्वचित स्वत: रामानंद सागरजींचे शांत स्वरातले, सस्मित, संक्षिप्त पण मनाला सहज पटणारे एखादे स्पष्टीकरण, सगळे सर्वांना अगदी सवयीचे झाले होते!
स्व. सागरजींनी मालिकेतले अतिभव्य सेट्स, सुमधुर संगीत, पात्र निवड, संवाद, भजने… सगळेच इतके परिपूर्ण ठेवले होते की, फक्त आनंद घ्यावा, मन प्रसन्न व्हावे आणि ‘ही मालिका अशीच अखंड सुरू राहू दे’ अशी प्रार्थना मनात आपोआप उमटावी असे व्हायचे! अगदी शेवटच्या भागातले एक गाणे इतर गाण्यांसारखेच मोठे सुंदर होते. तिथे कवीच्या सामर्थ्याचा कस लागला होता.
युद्ध जवळजवळ संपत आलेले आहे. रावणाकडचे सर्व नामांकित योद्धे धारातीर्थी पडले आहेत. रामाच्या सेनेतील अनेक वीरसुद्धा मरण पावले आहेत. आता दुसऱ्या दिवशी खुद्द श्रीराम आणि रावणाचेच युद्ध अटळ आहे! त्या अंतिम युद्धाच्या आदल्या रात्री रावण त्याच्या दालनात अस्वस्थपणे येरझाऱ्या घालतो आहे. त्या प्रसंगावरचे हे गीत स्व. रवींद्र जैन यांनी रचले, गायले आणि त्याला संगीत दिले होते.
मंदोदरी तिच्या संभाव्य वैधव्याच्या कल्पनेने शयनगृहात अस्वस्थ आहे, श्रीराम त्यांच्या कुटीत विचारमग्न पहुडले आहेत आणि सीता अशोक वनात अश्रू ढाळते आहे. त्या सबंध पार्श्वभूमीवर ऐकू
येणारे हे गीत श्रोत्यांच्या डोळ्यांत जवळजवळ पाणीच आणते –
यही रात अंतिम… यही रात भारी…
बस एक रातकी, अब कहानी हैं सारी…
आजची रात्र रावणाच्या जीवनाची, मंदोदरीच्या सौभाग्याची, शेवटची रात्र आहे. त्याचे सगळे भाऊ, जीवलग युद्धात मारले गेले आहेत. राक्षस वंशात आता तो एकटाच उरला आहे. अंगीभूत अहंकारामुळे तो दाखवत नसला तरी ‘उद्या काय होणार’ याची चिंता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसते आहे –
नहीं बंधू-बांधव, न कोई सहायक,
अकेला है लंका में, लंकाका नायक.
सभी रत्न बहुमूल्य रणमें गंवाए,
लगे घाव ऐसे की भर भी न पाए,
दशानन इसी सोचमें जागता हैं…
ये जो हो रहा उसका परिणाम क्या हैं,
ये बाज़ी अभी तक, न जीती ना हारी,
यही रात अंतिम…
इकडे मानव रूपात अवतार घेतलेल्या परमेश्वराला, श्रीरामाला, लक्षात येतेय की, माणसाच्या जीवनात त्याला किती दु:खे भोगावी लागत असतात. अंतिम विजय जरी सत्याचा होणार असला तरी मर्त्य मानवाला किती दिव्यातून जावे लागते! या युद्धात निर्दोष माणसांच्या झालेल्या मृत्यूचे दु:खही रामाला सतावते आहे.
हो भगवान मानव तो समझेगा इतना,
कि मानव के जीवनमें संघर्ष कितना,
विजय अंततः धर्मवीरोंकी होती,
पर इतना सहज भी नहीं है ये मोती,
बहुत हो चुकी युद्धमें व्यर्थ हानी,
पहुँच जाये परिणामतक अब कहानी,
वचन पूर्ण हो, देवता हों सुखारी
यही रात अंतिम…
पतीव्रतांच्या यादीत जिचे नाव प्रात:स्मरणीय मानले गेले आहे, त्या बिचाऱ्या मंदोदरीच्या मनातही भय दाटून आले आहे. उद्याचे युद्ध निर्णायक असणार! म्हणजे उद्या सीतामाई आणि माझ्यातल्या एकीला नक्की वैधव्य येणार! रावणाची बाजू तर पापाची आहे. त्याला उद्या श्रीरामाला शरण तरी जावे लागेल किंवा मरण तरी पत्करावे लागेल! ‘…आणि रावणाचा स्वभाव तर टोकाचा अहंकारी! तो नक्की मरणच स्वीकारणार, उद्या माझे सौभाग्य संपणार!’ या कल्पनेने मंदोदरी दु:खात बुडाली आहे…
समरमें सदा एकही पक्ष जीता,
जयी होगी मंदोदरी, या कि सीता.
किसी मांगसे उसकी लाली मिटेगी,
कोई एकही कल सुहागन रहेगी,
भला धर्म से पाप कबतक लड़ेगा…
या झुकना पड़ेगा, या मिटना पड़ेगा..
विचारोंमें मंदोदरी हैं बेचारी,
यही रात अंतिम…
कधीतरी राम येईल, रावणाचा नि:पात करून आपली सुटका करेल, या आशेवर वाट पाहून थकलेल्या सीतेला युद्धाच्या बातम्या कळत होत्या. उद्या रावणाचे आणि रामाचे युद्ध होणार आहे हे कळल्याने तीही बैचेन आहे. इतके दिवस मोठ्या कष्टाने धरून ठेवलेला धीर सुटायची वेळ आली आहे. रामाच्या वियोगातल्या आजवरच्या रात्री भयाण होत्या. पण आजची रात्र एखाद्या युगापेक्षा मोठी भासते आहे. विजयी होऊन राम आपली मुक्तता करायला येईल त्या आधीच आपण ‘धीर सुटून मरून तर जाणार नाही ना?’ अशी भीती तिला सतावते आहे –
ये एक रात मानो युगोंसे बड़ी हैं,
ये सीता के धीरजकी अंतिम कड़ी हैं
प्रतीक्षा का विष और कितना पिएगी,
बिना प्राणके देह कैसे जियेगी?
कहे रोमरोम अब तो राम, आ भी जाओ…
दिखाओ दरस अब न इतना रुलाओ,
कि रो रोके मर जाए सीता तुम्हारी,
यही रात अंतिम…
परवाच झालेल्या रामनवमीने, रामातच आनंद शोधणाऱ्या त्या महान दिग्दर्शकाची तीव्रतेने आठवण झाली! त्यांचा तो मंद स्मित करणारा चेहरा डोळ्यांसमोर तरळला… त्यातून जागा झाला
हा नॉस्टॅल्जिया!