- स्वयंसिद्धा: प्रियानी पाटील
अनेक विहिरी गावागावांत प्रत्येकाच्या घराशेजारी… कुंपणात, बागांमध्ये दिसून येतात… पण उन्हाळा आला की, त्या आटून जातात आणि पाणी-पाणी करायची वेळ येते. अनेक ठिकाणी तर बोअर वेल ज्या ठिकाणी होत्या, त्या समूळ जाऊन जागा सपाट झाल्या आहेत.
भर उन्हात जेव्हा घशाला कोरड पडते तेव्हा गुलमोहर दिमाखात ताजा टवटवीत होऊन फुलारलेला असतो. पायवाटा धुळीने माखलेल्या असतात. तेव्हा केवळ कातळच नाही तर ती धूळ, मातीही अनवाणी पायांना चटके देऊन जाणारी असते. वेदनेने जीव विव्हळतो तेव्हा केवळ डोळ्यांतून अश्रूच नाही, तर घामाच्या धाराही वाहू लागलेल्या असतात. विहिरी आटून जातात तेव्हा एखादा झरा खळखळून आपलं अस्तित्व जागृत करणारा असतो. पाण्याचं दुष्काळी स्वरूप भर उन्हात स्त्रीयांना काही ठिकाणी वणवण करायला लावतं.
याच वणवणीला कंटाळून काही ठिकाणी मग विहिरी खणल्या जातात. पाण्याचा दुष्काळ थांबवण्यासाठीचे प्रयत्न केले जातात. काही ठिकाणी बोअर वेलचे प्रयत्न केले जातात. या ठिकाणी कधी चांगलं पाणी मिळतं, पण काही ठिकाणी प्रयत्न फसतात. ऑइली, गढूळ पाणी वापरण्याजोगेही ठरत नाही. सारे प्रयास पाण्यासाठी असलेले दिसून येतात.
पण, उन्हाळा आल्यावरच पाण्याच्या दुष्काळाची होणारी जाणीव पाहता, बाकी आठ-नऊ महिने आपण झोपून असतो का? हा प्रश्न पडतो. भर उन्हात घरांची कामं करताना दुष्काळी रूप भकास करून जातं. विहीर तेव्हाच खणावी ही कल्पना डोक्यात येऊन जाते.
एका गावात असाच मोठा दुष्काळ पडला आणि गावाच्या कातळी भागात एक मोठी विहीर खणावी, अशी कल्पना गावातील लोकांच्या डोक्यात आली. या भागात पाणी चांगलं लागेल या कल्पनेने त्या ठिकाणी विहीर खणली जाऊ लागली. पाणी चांगलंच लागणार म्हणून विहीर खणत खणत अगदी खोलवर गेली. नजर पोहोचणार नाही, अशा ठिकाणी पाण्याचा झरा सापडला. आता विहीर तुडुंब भरणार म्हणून सारे आनंदले. याच विहिरीचे पाणी आता साऱ्या गावाला मिळणार आणि साऱ्या गावाचा पाण्याचा प्रश्न सुटणार म्हणून साऱ्यांना आनंद झाला.
पण ही विहीर नेमकी कुठे आहे? कशी आहे? हे पाहण्याचा मोह काहीजणांना आवरला नाही. त्यांनी त्या ठिकाणी जाण्यासाठी एक दिवस ठरवला आणि ते गेले. मात्र त्या कातळी भागात जाताना उन्हाची एवढी दमछाक झाली की, उन्हामुळे घशाला कोरड पडली. गावासाठी खोलवर खणलेली विहीर पाहिली तेव्हा त्यांच्या डोळ्याचं पारणं फिटलं पण तहान काही भागली नाही. त्यांनी त्या विहिरीत पाणी किती आहे ते पाहिलं आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. घशाला लागलेली कोरड अजूनच वाढली. विहिरीत डोकावून पाहिलं तेव्हा कळलं, नजरही पोहोचू शकणार नाही, इतकी खोल विहीर खणली गेली आहे, मात्र या विहिरीच्या तळाशी थेंबभर पाणीही नाही.
जे पाणी आपणास मिळून गावाची तहान भागणार आहे ती विहीर कुठे आणि कशी आहे ते पाहायला आपण आलो… त्या विहिरीत पाणी अजिबातच नाही हे पाहून त्यांचा जीव कळवळला. शिवाय एवढ्या उन्हातून आपण पायपीट करत आलो हे पाहून ते तहानेने अजूनच अस्वस्थ झाले. काय करावं? तहान तर इतकी लागली की, समोर विहीर असूनही त्याचा काही उपयोग नाही. घशाला लागलेली कोरड पाहून ती मंडळी पुन्हा माघारी फिरली. जिथे विहिरीत पाणी नाही त्या विहिरीचा गावासाठी उपयोगच काय? म्हणून मग पश्चाताप करायची वेळ येऊन ठेपली.
अशा अनेक विहिरी गावागावांत प्रत्येकाच्या घराशेजारी… कुंपणात, बागांमध्ये दिसून येतात… पण उन्हाळा आला की, पाणी-पाणी करायची वेळ येते. अनेक ठिकाणी बोअर वेल ज्या ठिकाणी होत्या, त्या समूळ जाऊन जागा सपाट झाल्या आहेत. उन्हाळा आला की, गर्मी वगैरे त्रास आहेच, पण पाण्याचा दुष्काळ ही समस्या फार गंभीर असून ठिकठिकाणी महिला वर्गाला होणारा त्रास हा दरवर्षीचा असल्याचा दिसून येतो. त्यामुळे शुष्क विहिरी पावसाळ्यात तुडुंब भरलेलं रूप नजरेत साठवण्यापेक्षा उन्हाळ्यात विहिरी आटणार नाहीत आणि महिलांची पाण्यासाठीची वणवण होणार नाही किंवा ती कशी थांबेल यावर उपाययोजना करता येण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक ठरू शकेल.